जनरल सुंदरजी स्मृति व्याख्यानात लष्करप्रमुखांचे प्रतिपादन
दि. ०१ मे: आधुनिक युद्धाचे स्वरूप पाहता अत्याधुनिक, चपळ, तंत्रज्ञानस्नेही व आत्मनिर्भर लष्कर असणे, ही प्राथमिकता आहे आणि त्याचदृष्टीने दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराचा आंतर्बाह्य कायापालट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली, असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथील माणेकशॉ केंद्रात चौथ्या जनरल सुंदरजी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी ते बोलत होते.
भारताचे माजी लष्करप्रमुख व आघाडीचे लष्करी विचारवंत जनरल के. सुंदरजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लष्कराच्या मेकेनाइज्ड इन्फन्ट्री सेंटर अँड स्कूल (एमआयसी अँड एस) आणि सेंटर फॉर लॅण्ड वॉरफेअर स्टडीज (सीएलएडब्ल्यूएस) यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. देशाचे तेरावे लष्करप्रमुख व लष्करी विचारवंत असलेल्या जनरल सुंदरजी यांना ‘यांत्रिकीकृत पायदळ रेजिमेंटचे जन्मदाते’ असेही संबोधले जाते. या प्रसंगी जनरल पांडे यांनी जनरल सुंदरजी यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित केले. युध्दक्षेत्राचे डिजिटलीकरण, माहिती आधारित युध्दकौशल्य, तंत्रज्ञानाचा समावेश, पारंपरिक युद्धनीती आणि सेनादलांची रचना आधी विषयांत जनरल सुंदरजी यांच्याकडे असलेली दूरदृष्टी अत्यंत महत्त्वाची होती. त्यांचे हे विचार ‘व्हिजन २१००’ मध्ये प्रतिबिंबित झाले आहेत, असे ते म्हणाले. भारतीय लष्करात सध्या महत्त्वाचे फेरबदल होत आहेत. हे फेरबदल प्रागतिक विचारप्रक्रियेच्या आधारे केले जात आहेत. लष्कराने केवळ स्वतःमध्ये बदल करण्याचा विचार केला नाही, तर या बदलांची वेगाने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही केला, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी या वेळी राष्ट्रीय सुरक्षा धोरण या विषयी आपले विचार मांडले. जनरल सुंदरजी यांच्याबरोबर काम करताना आलेले अनुभवही त्यांनी नमूद केले. लष्कराचे माजी उपप्रमुख व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांनी ‘भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण: जनरल सुंदरजी यांचे विचार’ या विषयावर आपले मत व्यक्त केले.
विनय चाटी