भारताने रशियाचे राज्य शस्त्रास्त्र निर्यातदार रोसोबोरोनेक्सपोर्ट (RoE) सोबत, $248 मिलियन डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली असून, या करारामुळे T-72 युद्ध रणगाड्यांच्या ताफ्यासाठी अधिक शक्तिशाली इंजिन खरेदी करणे सोपे झाले आहे, अशी माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केली.
1970 च्या दशकात भारतीय लष्करात प्रथमच समाविष्ट करण्यात आलेले T-72 टँक्स, नेहमीच लष्करी ताफ्याचा मजबूत कणा राहिले आहेत. सध्या या श्रेणीतील जवळपास 2,500 रणगाडे लष्कराच्या सेवेत असून, 780 हॉर्सपॉवर (HP) इंजिनांवर ते चालवले जात आहेत. मात्र या नवीन करारानुसार, टँक्सची इंजिन्स 1,000 HP सह अपग्रेड केली जातील. युद्धभूमीची गतिशीलता आणि आक्रमक क्षमता वाढवणे हे या कृतीमगचे उद्दिष्ट असल्याचे, संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
या करारानुासार, अवडी-चेन्नई येथील सरकारी मालकीच्या ‘आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (हेवी व्हेईकल फॅक्टरी) या फॅक्टरीमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण (T0T) केले जाईल. यामुळे इंजिन्सचे स्थानिक एकत्रीकरण आणि परवानाधारक उत्पादनाची प्रक्रिया सुलभ होईल आणि भारताच्या ‘मेक इन इंडिया‘ उपक्रमाला बळकटी मिळेल. तसेच परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होईल.
Strengthening its tank fleet, Ministry of Defence has signed a $248M deal with Rosoboronexport, Russia, to procure 1000 HP engines for T-72 tanks, upgrading their current 780 HP engines. This will significantly enhance battlefield mobility and offensive capability. The deal… pic.twitter.com/kGi6LBEv29
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) March 7, 2025
भारतीय सैन्याने 2,400 च्या आसपास T-72 टँक्सचा आणि 1,300 T-90S ‘भीष्म’ टँक्सचा लष्करी ताफ्यात समावेश करून, आपली शस्त्रागार क्षमता लक्षणीयरित्या वाढवली आहे. ज्यापैकी 1,657 टँक रशियन परवान्याखाली हेवी व्हेइकल्स फॅक्ट्रीत तयार केले जात आहेत. याशिवाय, सैन्याने अपग्रेड केलेले 118 अर्जुन मार्क-1A टँक देखील यात सामाविष्ट करुण घेण्यात आले आहेत, ज्यामुळे मागील दशकात समाविष्ट केलेले 124 अर्जुन टँक्सच्या संख्येत वाढ झाली आहे. लष्कराची ऑपरेशनल तयारी अधिक सक्षम करण्यासाठी, ‘प्रोजेक्ट झोरावर’ अंतर्गत 354 स्वदेशी लघु टँक देखील ताफ्यात सामील करुन घेण्याची तयारी सुरु आहे. हे टँक्स खास करुन अतिशय उंच भूभागावरील युद्धासाठी तयार करण्यात आले आहेत.
भारत नेहमीच रशियावर आपला मुख्य संरक्षण पुरवठादार म्हणून अवलंबून राहिला आहे. तथापि, युक्रेनमध्ये सुरु असलेल्या रशियाच्या युद्धामुळे त्याच्या संरक्षण करारांची पूर्तता करण्यात काही अडचणी येत आहेत, ज्यामुळे भारताने महत्त्वपूर्ण लष्करी खरेदीसाठी पश्चिमी पुरवठादारांचा विचार सुरू केला आहे.
टीम भारतशक्ती