अमेरिकेला धोका: ‘नॅशनल इंटेलिजन्स’च्या संचालक अर्वील हैनेस यांचा इशारा
दि. १२ मार्च: गाझापट्टीत इस्त्राईल व हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील दहशतवादी अमेरिका आणि इस्त्राईलविरोधात एकवटण्याची शक्यता असून, त्यामुळे जागतिक व अमेरिकाकेंद्रित दहशतवाद कैकपटीने वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स’च्या संचालक अर्वील हैनेस यांनी दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत अमेरिकेच्या संसदेच्या सभागृहासमोर (कॉंग्रेस) झालेल्या सुनावणीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
‘गाझामधील या संकटामुळे जगभरातील दहशतवादी अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहशतवादी हिंसाचारात वाढ होईल आणि त्याचा गंभीर परिणाम अमेरिका व इस्त्राईलच्या हितसंबंधांवर होईल, असे त्या म्हणाल्या. याबाबत भाष्य करणे तुर्त घाईचे ठरणार असले, तरी वर्तमानातील चिन्हे याच भवितव्याकडे निर्देश करीत आहेत असे हैनेस यांनी स्पष्ट केले. ‘गेल्यावर्षी सात ऑक्टोबरला इस्त्राईलवर झालेल्या हमासच्या हल्ल्यामुळे अल-कायदा व आयसीस या दोन दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर काम करणारे जगभरातील दहशतवादी गट अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी प्रेरित झाले आहेत. तर, इराणच्या पाठींब्याने काम करणारे दहशतवादी त्यांचा स्वतःचा अमेरिकाविरोधी ‘अजेंडा’ या निमित्ताने पुढे रेटतील.जगभरात वाढलेल्या ‘अँटीसेमिटिझम’ व ‘इस्लामफोबिक’ दहशतवादामुळे त्याची चुणूक आपल्याला दिसतच आहे,’ असेही त्यांनी या सुनावणीत सांगितले.
‘एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इस्त्राईलच्या सैन्याने ‘गाझा’मध्ये आत्तापर्यंत सुमारे तेरा हजार पॅलेस्टिनी दहशतवादी ठार केल्याचा दावा केला होता. मात्र, स्वतंत्र यंत्रणेमार्फत अद्याप त्याची पुष्टी होऊ शकली नाही. अमेरिकेकडे असलेल्या माहितीनुसार या संघर्षात आत्तापर्यंत तीस हजार नागरिक मारले गेले असावेत,’ असेही हैनेस यांनी सांगितले. अमेरिकेतील महत्त्वाच्या गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांची सिनेटच्या गुप्तचर समितीपुढे सुनावणी होणे, ही अतिशय दुर्मिळ घटना असते. या सुनावणीदरम्यान विविध गुप्तचर संस्थांचे प्रमुख जागतिक आव्हाने आणि संघर्षाची ठिकाणे याबद्दलचे आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या मतांवर आधारित वार्षिक अहवाल नंतर प्रकाशित केला जातो. हेरगिरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संस्थांसाठी हा अहवाल अतिशय महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.
विनय चाटी