व्यवस्थापन आणि प्रशिक्षणातील त्रुटींबाबात DGCA कडून एअर इंडियाला इशारा

0

भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA), एअर इंडियाला स्ट्रेस व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासंबंधी सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला आहे, असे रॉयटर्सने पुनरावलोकन केलेल्या सरकारी सूचनांतून स्पष्ट झाले आहे.

एअर इंडियाने यावर्षी आणि गेल्यावर्षी, या त्रुटी राहिल्याचे DGCAला स्वतःहून गेल्या महिन्यात कळवले होते. त्यानंतर काही दिवसांतच DGCA कडून हा इशारा देण्यात आला होता, जेव्हा कंपनीच्या Boeing 787 Dreamliner विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाला होता.

23 जुलै रोजीच्या चार सरकारी सूचनांमध्ये, सुरक्षा अनुपालनातील सातत्यपूर्ण अपयशाबद्दल एअर इंडियावर टीका करण्यात आली आहे. या आधीही अशा अनेक इशाऱ्यांचे उल्लंघन झालेले आहे. नियामक कारवाईमध्ये दंड आकारण्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यासारख्या उपायांचा समावेश असू शकतो.

यामध्ये एकूण 29 उल्लंघनांचा उल्लेख आहे — ज्यात वैमानिकांना अनिवार्य विश्रांती न देणे, सिम्युलेटर प्रशिक्षणाच्या नियमांचे पालन न करणे, उंचावर असलेल्या विमानतळासाठी आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव, तसेच अपूर्ण केबिन क्रू असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे.

एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, “पूर्वीच्या वारंवार इशाऱ्यांनंतरही अनुपालन निरीक्षण, क्रू नियोजन आणि प्रशिक्षण व्यवस्थापन यामधील प्रणालीगत त्रुटी अद्यापही न सुटलेल्या आहेत.”

त्यात पुढे असेही म्हटले आहे की, “अशा उल्लंघनांची पुनरावृत्ती दर्शवते की प्रभावी नियंत्रण यंत्रणा निर्माण करण्यात आणि अंमलात आणण्यात अपयश आले आहे.”

एअर इंडियाने निवेदनात म्हटले की, या नोटीसेस गेल्या वर्षभरात स्वेच्छेने केलेल्या खुलाशांशी संबंधित आहेत आणि कंपनी DGCAला यावर उत्तर देईल.

“आम्ही आमच्या क्रू आणि प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत,” असे कंपनीने नमूद केले.

DGCAने Reuters कडून टिप्पणीसाठी पाठवलेल्या विनंतीला उत्तर दिलेले नाही.

तपास आणि इशारे

अहमदाबादमधील अपघातानंतर एअर इंडियावर तीव्र लक्ष ठेवले जात आहे, जो गेल्या दशकातील सर्वात भीषण विमान अपघात ठरला आहे.

प्राथमिक अहवालानुसार, टेकऑफनंतर इंधन नियंत्रण स्विचेस जवळजवळ एकाच वेळी फिरवले गेले, ज्यामुळे कॉकपिटमध्ये गोंधळ निर्माण झाला. एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले की त्याने इंधन का बंद केले, तेव्हा दुसऱ्याने उत्तर दिले की त्याने तसे काही केलेच नाही, असा उल्लेख अहवालात आहे.

यापलीकडे, युरोपियन युनियनच्या विमान वाहतूक संस्थेने यावर्षी जाहीर केले की, ‘ती एअर इंडियाच्या- एअर इंडिया एक्सप्रेस या बजेट सेवा विभागाची चौकशी करणार आहे,’ कारण Reuters ने अहवाल दिला होता की, कंपनीने Airbus A320 च्या इंजिन भागांची वेळेवर अदलाबदल केली नव्हती.

मे 2024 मध्ये, भारतीय नियामक संस्थेने असेही उघड केले की, एअर इंडियाने तीन Airbus विमाने उड्डाणासाठी वापरली होती, जरी त्या विमानांवरील आपत्कालीन उपकरणांची तपासणी वेळेवर झालेली नव्हती.

हा अपघात आणि नोटीसांमुळे टाटा समूहासाठी अडचणी वाढल्या आहेत. टाटांनी 2022 मध्ये, सरकारकडून एअर इंडियाचे मालकी हक्क घेतले होते, जेणेकरून ती कंपनी जागतिक दर्जाची विमान सेवा म्हणून पुन्हा उभारता येईल.

या आठवड्यात पाठवलेल्या सरकारी नोटीसांमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून इशारे दिले आहेत, ज्यात कंपनीचे फ्लाइट ऑपरेशन्स डायरेक्टर पंकुल माथूर आणि प्रशिक्षण संचालक अमर भाटिया यांचा समावेश आहे.

एका नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘जून 2024 मध्ये दोन आणि जून 2025 मध्ये एका वैमानिकासाठी ‘साप्ताहिक विश्रांतीच्या उल्लंघनाचा प्रकार’ निदर्शनास आला होता. मात्र त्या वैमानिकांनी किती जास्त वेळ काम केले, हे नमूद करण्यात आलेले नव्हते.

दुसऱ्या नोटीसमध्ये सांगण्यात आले की, मागील वर्षी दोन वैमानिकांनी सिम्युलेटर प्रशिक्षण घेतले होते, पण त्यांनी ठराविक वेळेत उड्डाण सुरू केले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये एका वैमानिकाने काठमांडू येथून विशेष सिम्युलेटर प्रशिक्षण न घेता उड्डाण केले, असेही एका नोटीसमध्ये म्हटले आहे. काठमांडू हे उंच पर्वतीय भागात वसलेले विमानतळ असून त्याची रनवे टेबल-टॉप प्रकारची आहे, जिच्या शेवटास तीव्र उतार असतो.

या संदर्भात, विमान अपघात चौकशी ब्युरोचे माजी कायदेतज्ज्ञ विभूती सिंह म्हणाले, “हे अत्यंत धोकादायक आहे, कारण काठमांडूसारख्या विमानतळासाठी पूर्व प्रशिक्षण अत्यावश्यक असते… कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकांना मार्गदर्शक पुस्तिका पाहण्याइतका वेळही मिळणार नाही.”

नोटीसांमध्ये हेही नमूद करण्यात आले आहे की, April आणि मे 2024 दरम्यान झालेल्या चार आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आवश्यक 15 केबिन क्रूंपैकी कमी कर्मचारी होते, आणि केबिन सुरक्षा टीम नियमांचे वारंवार उल्लंघन करत आहे, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “एअर इंडिया गोष्टी गृहीत धरत आहे अशी आम्हाला भीती वाटते,” आणि “आम्ही त्यांना आधीही अनेक इशारे दिले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने याच आठवड्यात संसदेत माहिती दिली की, गेल्या 6 महिन्यांत एअर इंडियाला 9 नोटीस पाठवण्यात आल्या. 2023 मध्ये, 23 प्रकरणांमध्ये नियम उल्लंघनासाठी विमान कंपन्यांना दंड किंवा इशारे देण्यात आले, ज्यापैकी 11 प्रकरणे एअर इंडिया समूहाशी संबंधित होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia-UK व्यापार कराराला उद्योग संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा
Next articleआर्थिक युद्धासाठी अमेरिकेची तयारी नाही: मरीन कॉर्प्सचा अहवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here