लुला यांच्या दौऱ्यापूर्वी, डोवाल आणि ब्राझीलचे लुईस यांच्यात धोरणात्मक चर्चा

0
डोवाल

शुक्रवारी, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नवी दिल्ली येथे, ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे विशेष सल्लागार आणि दूत- सेल्सो लुईस न्युनेस अमोरिम यांची भेट घेतली. भारत आणि ब्राझील यांच्यातील सहाव्या धोरणात्मक संवादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे समजते.

फेब्रुवारी 2026 मध्ये, ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासिओ लुला दा सिल्वा हे भारत दौऱ्यावर येणार असून, त्याआधी झालेली ही खास भेट लुला यांच्या दौऱ्याची तयारी दर्शवते.

त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात, ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन भारतात येतील, जे मंत्री आणि व्यवसायिक नेत्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या भेटीच्या आधी, भारत‑ब्राझील व्यापार निगराणी यंत्रणेची (India‑Brazil Trade Monitoring Mechanism) सातवी बैठक पार पडेल, तसेच संरक्षण उद्योग सहकार्य आणि पुरवठा साखळी सुरक्षेबाबत NSA अमोरिम आणि अजित डोवाल यांच्यामध्ये चर्चेची आणखी एक फेरी होईल. 

ब्राझीलचे भारतातील दूत केनेथ दा नोब्रेगा, StratNewsGlobal शी बोलताना म्हणाले की, “दोन्ही देशातील संरक्षण भागीदारी वाढवणे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील सहकार्याला बळकटी देणे आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार करणे, हे मुद्दे राष्ट्रपती लुला यांच्यासोबतच्या भारताच्या संवादात प्राधान्यक्रमाने हाताळले जातील. NSA अमोरिम यांची भेट, द्विपक्षीय संरक्षण भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी महत्वाची ठरेल.”

राष्ट्राध्यक्ष लुला यांचा भारत दौरा अशावेळी होतो आहे, जेव्हा भारत आपले व्यापार संबंधांचा विस्तार करण्यासाठी आणि जागतिक दक्षिण भागीदारांसोबत सहकार्य मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर ताण पडत असताना, भारत आणि ब्राझील – अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, संरक्षण उत्पादने, महत्त्वपूर्ण खनिजे आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर भर देत आहेत.

दोन्ही देश व्यापारातील तोटा कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, येथे 9 जुलै रोजी राष्ट्रपती लुला यांच्यासोबत झालेल्या चर्चेत हा विषय प्रामुख्याने मांडला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला, लुला यांनी पंतप्रधान मोदींसोबत फोनवरुन संवाद साधला होता, ज्यावेळी अमेरिकेचे टॅरिफ धोरण दोन्ही देशांना सर्वाधिक प्रभावित करत होते. त्यानंतर लुला यांनी सर्व BRICS नेत्यांची व्हर्चुअल बैठक बोलावली होती, ज्यामध्ये भारताकडून डॉ.एस. जयशंकर सहभागी झाले होते.

जागतिक पुरवठा साखळ्यांना गंभीर अस्थिरतेचा सामना करत असताना, ब्राझील स्वत:ला भारताचा विश्वसनीय संरक्षण भागीदार म्हणून सिद्ध करू पाहत आहे. स्वतःचे असे कोणते बाह्य धोके नसल्यामुळे, ब्राझील स्वतःला भारताचा संरक्षण क्षेत्रासंबंधी हार्डवेअर आणि अन्य घटकांचा एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून नावारुपाला आणण्याचा प्रयत्न करत आहे.

दोन्ही देश, ‘मर्कोसुर-भारत प्राधान्य व्यापार कराराचा’ विस्तार करण्यावरही भर देत आहे. या कराराचा उद्देश आहे- टॅरिफ सवलतींचा विस्तार करणे आणि बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करणे. ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर, या उपक्रमाला नवीन गती मिळाली असून, दोन्ही देश बाह्य व्यापार धक्क्यांना रोखण्यासाठी एक प्रभावी मार्ग म्हणून याकडे पाहत आहेत.

सोबतच, डिजिटल सहकार्याला देखील चालना दिली जात आहे. भारत आणि ब्राझील यांनी आपआपल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म्स- जसे की UPI आणि PIX, यांच्यातील तांत्रिक माहितीची देवाणघेवाण केली आहे. हा प्रयत्न BRICS च्या व्यापक आकांक्षांना प्रतिबिंबीत करतो, ज्यामध्ये SWIFT सारख्या पाश्चिमात्य नियंत्रणाखालील आर्थिक प्रणालीवर अवलंबून न राहता, स्वतःची वित्तीय पायाभूत रचना विकसित करण्याची आकांक्षा दडलेली आहे.

दोन्ही देशांच्या खाजगी क्षेत्रातील उत्साह देखील अलीकडे वाढताना दिसत आहे. मुंबईत झालेल्या ‘ब्राझील-भारत LIDE फोरम’मध्ये – भारत आणि ब्राझीलचे 120 हून अधिक औद्योगिक नेते एकत्र आले होते. याप्रसंगी त्यांनी स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधा, खाणकाम, औषधनिर्मिती आणि हवाई वाहतूक अशा विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीची शक्यता दर्शवली. “भारत ही ब्राझीलच्या उद्योग-व्यवसायांसाठी एक धोरणात्मक बाजारपेठ आहे. आता इच्छेला कृतीत बदलण्याची योग्य वेळ आली आहे” असे सूचक विधान, साओ पाउलोचे राज्यपाल आणि LIDE चे अध्यक्ष जाओ डोरिया यांनी यावेळी केले.

दोन्ही देशातील बळकट होत असलेली ही भागीदारी, BRICS मधील व्यापक प्रवाहाचे प्रतिबिंब आहे, जिथे सर्व सदस्य राष्ट्र, एकतर्फी शक्तींच्या व्यापार धोरणांसमोर पर्यायी व्यापार आणि आर्थिक यंत्रणांचा शोध घेत आहेत. सध्याच्या प्रशासनांतर्गत अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे हा गट स्थानिक चलन व्यापार,न्यू डेव्हलपमेंट बँक आणि नॉन-वेस्टर्न आर्थिक संदेश प्रणालीविषयीच्या चर्चांना गती देत आहे.

राष्ट्रपती लुला यांचा भारत दौरा, जो भारताच्या BRICS अध्यक्षा­पदाच्या काळात होण्याची शक्यता आहे, तो निश्चितच द्विपक्षीय संबंधाना नवी गती देईल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि ब्राझीलची- अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, औद्योगिक नवोन्मेष आणि तंत्रज्ञान सहकार्य यातील समान प्राधान्ये लक्षात घेऊन, फेब्रुवारी महिन्यात होणारी शिखर परिषद, दोन्ही बाजूच्या धोरणात्मक उद्दिष्टांना मूर्तरूप रूपांतरित करण्यासाठी एक महत्वाची संधी ठरू शकेल.

एका वरिष्ठ राजदूताच्या निरीक्षणानुसार, “लुला यांची ही भेट पूर्णपणे औपचारिक नाही. ही भेट, बदलत्या जगात आपल्या ब्राझीलसोबतच्या वाढत्या भागीदारीचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. भारत आणि ब्राझील यांची उद्दिष्टे एकमेकांना पूरक आहेत, आता वेळ आली आहे त्यांना एकत्रित करण्याची आणि नवी चालना देण्याची.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleImmense Opportunities For UK & Indian Defence Sector In Combat Air, Complex Weapons and Maritime Technologies: Jeremy Quin
Next articleBrazil’s Defence Minister Visits India to Boost Defence Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here