चीनचा तैवानच्या ‘साय-ऑप्स’ पथकावर आरोप; माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर

0

चीन आणि तैवानमध्ये समुद्रधुनीच्या मुद्द्यावरूनलवाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी चिनी पोलिसांनी कठोर पावले उचलत, तैवानच्या ‘साय ऑप्स’ (Psychological Operations) अर्थात ‘लष्करी मनोवैज्ञानिक’ पथकातील 18 अधिकाऱ्यांवर ‘फुटीरतावादी’ प्रचार-प्रसाराचा आरोप केला आहे. तसेच, त्यांची माहिती देणाऱ्यास 1,400 डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर केले आहे. तैवानने आपली संरक्षण क्षमता वाढवण्याची जाहीर शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चीनने त्यांच्यावर ‘फुटीरतावादी’ प्रचार केल्याचा आरोप केला आहे.

लोकशाही पद्धतीने चालणारे तैवान हे आपलेच क्षेत्र आहे असे चीन मानतो, परंतु तैपेईमधील सरकारचा यावर तीव्र आक्षेप आहे. दरम्यान, चीनने तैवान विरुद्ध लष्करी आणि राजकीय दबाव वाढवला आहे.

‘फुटीरतावादी कृत्ये भडकावण्याचा कट’ 

तैवान सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला तैवानच्या अगदी समोर असलेल्या, झियामेन (Xiamen) या चिनी शहरातील सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितले की, “हे 18 जण तैवानच्या लष्कराच्या “मनोवैज्ञानिक लष्करी युनिट”चे मुख्य सदस्य आहेत. विभागाने त्यांची छायाचित्रे, नावे आणि तैवानचे ओळखपत्र क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.”

सुरक्षा विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, “हे युनिट अपप्रचार करणे, गुप्तचर माहिती गोळा करणे, मनोवैज्ञानिक युद्ध आणि प्रचार प्रसारित करणे यांसारखी कामे हाताळते.”

“फार पूर्वीपासून त्यांनी फुटीरतावादी कृत्ये भडकावण्याचा कट रचला होता,” असे ब्युरोने म्हटले असून, त्यांना अटक करण्यास मदत करणाऱ्या माहितीसाठी 10,000 युआन (अंदाजे $1,401.74 डॉलर्स) पर्यंतचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

‘या युनिटने चीनची बदनामी करण्यासाठी वेबसाइट्स सुरू केल्या, फुटीरतावाद भडकवण्यासाठी प्रक्षोभक गेम्स तयार केले, लोकांची दिशाभूल करण्यासाठी बनावट व्हिडिओ सामग्री तयार केली, ‘वैचारिक घुसखोरी’ करण्यासाठी अवैध रेडिओ चालवले आणि ‘बाह्य शक्तींच्या’ संसाधनांचा वापर करून जनमतावर प्रभाव टाकला,’ असे राज्य सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने एका स्वतंत्र अहवालात म्हटले आहे.

‘वाँटेड नोटीस’ केवळ प्रतिकात्मक

या मुद्द्यावर, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तैवानचे गुप्तचर अधिकारी उघडपणे चीनला भेट देत नसल्यामुळे आणि चीनच्या न्यायव्यवस्थेचे तैवानवर कोणतेही अधिकार क्षेत्र नसल्यामुळे, याप्रकरणी जारी केलेली वॉन्टेड नोटीस केवळ प्रतिकात्मक आहे.

शुक्रवारी, राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी तैवानचे संरक्षण वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले, आणि चीनने हे बेट बळकावण्यासाठी बळाचा वापर करणे सोडून द्यावा असे आवाहनही केले. चीनने यावर संताप व्यक्त करत, लाई यांना त्रास देणारे आणि संघर्ष करणारे नेते म्हटले.

यावर्षी जूनमध्ये, चीनने अशाच संशयित 20 जणांच्या अटकेसाठी असेच बक्षीस जाहीर केले होते, हे 20 जण तैवानचे लष्करी हॅकर्स असल्याचे बीजिंगचे म्हणणे होते. तैवानने ती धमकी फेटाळून लावत, ‘अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही’ असा स्पष्ट इशारा दिला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleफ्रान्समध्ये राजकीय उलथापालथ, लेकोर्नू पुन्हा पंतप्रधानपदी
Next articleFirst Flight of Tejas Mark 1A Aircraft Set to Fly on October 17

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here