बुरखा प्रकरणी ऑस्ट्रेलियन सिनेटर आठवडाभरासाठी निलंबित

0

सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या नवीन प्रयत्नांचा एक भाग म्हणून संसदेत बुरखा घालून आल्यामुळे ऑस्ट्रेलियन सिनेटर पॉलिन हॅन्सन यांना एका आठवड्यासाठी चेंबरमधून निलंबित करण्यात आले आहे.

पॉलिन यांच्या या कृतीचा सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी तात्काळ निषेध केला. यानंतर लगेचच त्यांच्याविरुद्ध औपचारिक निषेध प्रस्ताव मांडण्यात आला ज्यात मुस्लिम ऑस्ट्रेलियन लोकांचा अनादर केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली.

स्थलांतरविरोधी वन नेशन पक्षाच्या क्वीन्सलँडच्या प्रतिनिधी हॅन्सन यांनी सोमवारी संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर देशभरात बंदी घालणारा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. सिनेटने हे विधेयक मांडायला परवानगी देण्यास नकार दिला, गेल्या काही वर्षांत त्यांनी मांडलेले अशाच प्रकारचे आणखी काही प्रस्ताव याआधीही फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे सिनेटच्या या आधीच्या भूमिकेशी आताचा निर्णय सुसंगत असाच होता. विधेयक रोखल्यानंतर काही वेळातच, हॅन्सन पुन्हा काळा बुरखा घालून सभागृहात दाखल झाल्या ज्यामुळे सहकारी सिनेटरनी त्यांचा निषेध केला आणि कामकाज तात्पुरते थांबवले.

न्यू साउथ वेल्समधील मुस्लिम खासदार, ग्रीन्स सेनेटर मेहरीन फारुकी यांनी या कृत्याचा “उघडपणे दिसणारा वर्णद्वेष” म्हणून निषेध केला. फारुकी यांना हॅन्सनकडून गेल्या वर्षी वांशिक भेदभावाला सामोरे जावे लागल्याचे फेडरल कोर्टात आढळून आले होते. याच्याविरोधात सध्या सत्ताधारी असणाऱ्या हॅन्सन यांनी अपील केले आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या स्वतंत्र सिनेटर फातिमा पेमन यांनीही या संपूर्ण प्रकारावर टीका केली. हा प्रकार ‘अपमानास्पद’ असल्याचे म्हणत हॅन्सन यांनी कायदा बनवण्याऐवजी चेंबरचा वापर चिथावणी देण्यासाठी केल्याचा आरोप केला.

मंगळवारी, सिनेटमध्ये सरकारचे नेतृत्व करणाऱ्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी निषेध प्रस्ताव मांडला जो 55-5 मतांनी मंजूर झाला. प्रस्तावात म्हटले आहे की हॅन्सन यांचे वर्तन म्हणजे “लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर बदनाम करण्याचा आणि त्यांची थट्टा करण्याचा” आणि “मुस्लिम ऑस्ट्रेलियन लोकांचा अनादर करण्याचा हेतू” होता. वोंग म्हणाले की हॅन्सन यांचे अशा प्रकारचे वर्तन हा एक पॅटर्न आहे, त्यांनी असा युक्तिवाद केला की त्या “अनेक दशकांपासून निषेध म्हणून पूर्वग्रहदूषित वर्तन करत आल्या आहेत” आणि असेही म्हटले की हा स्टंट “ऑस्ट्रेलियन सिनेटच्या सदस्याच्या लायकीचा नाही”.

चेंबरने हॅन्सन यांच्या निलंबनाला एका आठवड्यासाठी पाठिंबा दिला कारण त्यांनी आदेश मिळाल्यानंतरही बुरखा काढण्यास नकार दिला. यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांना कामकाजात व्यत्यय आणण्यास भाग पाडले गेले. तात्पुरत्या निलंबनामुळे त्यांना या काळात सिनेटच्या कामकाजात भाग घेता येणार नाही.

हॅन्सन यांनी नंतर फेसबुकवर आपल्या कृत्याचा बचाव करताना लिहिले, “जर त्यांना मी ते घालू नये असे वाटत असेल तर – बुरखा बंदी घाला.” त्यांनी मुस्लिम चेहरा झाकण्यावरील निर्बंधांसाठी बराच काळ मोहीम चालवली आहे, भूतकाळात त्यांनी आपल्या मोहिमेबद्दल बोलताना ही गोष्ट सार्वजनिक सुरक्षितता आणि सामाजिक एकतेसाठी धोका असल्याचे वर्णन केले होते. सोमवारच्या घटनेत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत दुसऱ्यांदा बुरखा घातला आहे; 2017 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अशाच बंदीची वकिली करताना असे केले होते.

इमिग्रेशन आणि बहुसांस्कृतिकतेवरील हॅन्सन यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वाद निर्माण झाला आहे. 2016 मध्ये सिनेटला दिलेल्या आपल्या पहिल्या भाषणात, त्यांनी इशारा दिला होता की ऑस्ट्रेलियाला “मुस्लिमांनी दलदलीत ढकलण्याचा” धोका आहे, 1996 मध्ये प्रतिनिधी सभागृहात केलेल्या आपल्या पहिल्या भाषणाचाच तो प्रतिध्वनी होता ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की देशाला “आशियाई लोकांद्वारे दलदलीत टाकण्याचा” धोका आहे. दोन्ही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर व्यापक टीका झाली परंतु त्या त्यांच्या राजकीय ओळख आणि वन नेशनच्या व्यासपीठाचे केंद्रबिंदू बनल्या आहेत.

या ताज्या संघर्षातून ऑस्ट्रेलियामध्ये वंश, धर्म आणि राष्ट्रीय ओळख या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या तणावाचे स्पष्टीकरण मिळते.

हॅन्सन यांनी त्यांच्या कृती सार्वजनिक सुरक्षेबाबतच्या दीर्घकाळ चालणाऱ्या मोहिमेचा भाग म्हणून मांडल्या आहेत, परंतु बहुतेक सिनेटरनी त्यांच्या निषेधाची पद्धत आणि त्यातून दिलेला संदेश यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार कायदेशीर हस्तक्षेपाऐवजी धार्मिक प्रथेची थट्टा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. त्यांचे निलंबन तात्काळ लागू झाले आहे. मात्र त्यांच्या पक्षाने असे सूचित केले आहे की त्या सभागृहात परतल्यानंतर चेहरा झाकण्याच्या निर्बंधांवरील वादविवाद पुढे सुरू ठेवतील.

टीम स्ट्रॅटन्यूज
(विविध वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleSwavlamban 2025: Rajnath Singh Says India Moving into Golden Era of Defence Innovation
Next articleभारताची निळी अर्थव्यवस्था जहाजबांधणी उद्योगावर अवलंबून: संरक्षणमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here