भारत–व्हेनेझुएला चर्चेत, डिजिटल तंत्रज्ञान आणि महत्वपूर्ण खनिजांवर भर

0

26 नोव्हेंबर रोजी, नवी दिल्ली येथे झालेल्या 5व्या भारत–व्हेनेझुएला परराष्ट्र कार्यालयाच्या सल्लामसलतीनंतर, भारत आणि व्हेनेझुएलाने अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध विस्तारण्याचे संकेत दिले.

या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान, भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव (ईस्ट) पी. कुमारन आणि व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री तातियाना जोसेफिना पुग मोरेनो यांनी भूषविले. डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधनिर्मिती, व्यापार विविधीकरण, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी, विकास सहकार्य आणि नागरी संबंध अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर यावेळी लक्ष केंद्रित करण्यात आले.

या बैठकीचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) प्रणालीवर आधारित चाचणी प्रकल्प सुरू करण्याचा व्हेनेझुएलाचा निर्णय जाहीर करण्यात आला. हे चाचणी प्रकल्प आरोग्य, शिक्षण, कृषी आणि डिजिटल पेमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये लागू केले जातील, ज्यासाठी आधार, डिजीलॉकर आणि UPI यांसारख्या भारतीय प्लॅटफॉर्म्समध्ये व्हेनेझुएलाच्या आवश्यकतांनुसार फेरबदल केले जातील.

माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान उपमंत्री राउल हर्नांडेझ, यांच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या नवी दिल्ली दौऱ्यानंतर हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यावेळी, त्यांनी भारतीय समकक्षांसोबत डिजिटल ओळख, सेवा वितरण आणि फिनटेक ॲप्लिकेशन्सवर चर्चा केली होती. तसेच या भेटीदरम्यान, व्हेनेझुएलाच्या संस्थांकरिता अ‍ॅग्रीस्टॅक आणि हेल्थस्टॅकच्या कस्टमाइज्ड आवृत्त्यांचे फ्रेमवर्क तयार करण्यासाठी UIDAI, NISG, NeGD, AI BHASHINI आणि NPCI सारख्या एजन्सींसोबत तांत्रिक चर्चा झाली.

आरोग्य आणि औषधनिर्मिती सहकार्यालाही चर्चेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले. दोन्ही देशांनी सध्याच्या सहकार्याचा आढावा घेतला, ज्यातून हे स्पष्ट झाले की, भारताने 2024-25 मध्ये व्हेनेझुएलाला सुमारे 110 दशलक्ष डॉलर्स किमतीची औषधे पुरवली, ज्यामुळे व्हेनेझुएलाच्या वार्षिक गरजेपैकी 40 टक्क्यांहून अधिक गरज पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय औषध कंपन्यांची कोणतीही थकबाकी नसल्याची पुष्टी केली.

चर्चांमध्ये, जैवतंत्रज्ञान, लसी-संबंधित उपक्रम आणि जागतिक अडथळ्यांमुळे प्रभावित झालेल्या वैद्यकीय पुरवठा साखळ्या स्थिर करण्यासाठी उपाययोजना यासह पुढील सहकार्याच्या व्याप्तीवर चर्चा करण्यात आली. भारताने नियमित व्यावसायिक शिपमेंट्स आणि अत्यावश्यक औषधांच्या आपत्कालीन पुरवठ्याद्वारे व्हेनेझुएलाला पाठिंबा देण्याच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला.

व्यापार आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा मुद्दा आर्थिक चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या महत्वपूर्ण चर्चा, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी, विशाखापट्टणम येथे झालेल्या CII भागीदारी शिखर परिषदेदरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि व्हेनेझुएलाचे पर्यावरण खाण विकास मंत्री हेक्टर सिल्वा यांच्यातील अलीकडील द्विपक्षीय संवादावर आधारित होत्या.

व्हेनेझुएलाने महत्त्वपूर्ण खनिजे, खाणकाम तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भागीदारीमध्ये सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. भारताने भारत–व्हेनेझुएला संयुक्त समिती यंत्रणा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्याची शेवटची बैठक सुमारे दहा वर्षांपूर्वी झाली होती. याशिवाय, व्हेनेझुएलामधील ओएनजीसीची (ONGC) सातत्यपूर्ण उपस्थिती अधिक सखोल सहकार्यासाठी महत्वाची असल्याचे, भारताने यावेळी अधोरेखित केले.

भारताने आवाहन केले की, व्हेनेझुएलाने ‘इंडियन फार्माकोपियाला’ मान्यता देण्यावर विचार करावा, ज्याद्वारे नियामक प्रक्रिया सुलभ होऊन औषध व्यापार वाढू शकेल. दोन्ही देश द्विपक्षीय वाणिज्य विविधीकरण करण्याच्या मार्गांचा शोध घेत असल्याने, मोटारगाड्या, इंजिनिअरिंगसंबंधी उपकरणे आणि औद्योगिक पुरवठा साखळ्यांमधील संभाव्य सहकार्यावरही अतिरिक्त चर्चा झाली.

कृषी आणि विकास सहकार्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये AgriStack सारखे आगामी DPI पायलट व्हेनेझुएलाला शेती नोंदींचे आधुनिकीकरण, पीक डेटा व्यवस्थापन सुधारणे आणि कृषी सेवांपर्यंतची पोहोच वाढविण्यात कशी मदत करू शकतात यावर चर्चा करण्यात आली.

दोन्ही देशांनी, भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) फ्रेमवर्क अंतर्गत, क्षमता-निर्माण उपक्रमांसह विकास भागीदारी कार्यक्रम, तसेच कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल प्रशासन प्रशिक्षण यांचा विस्तार करण्यावरही चर्चा केली.

सांस्कृतिक आणि नागरी देवाणघेवाण हे द्विपक्षीय संबंधांतील महत्त्वाचे घटक असल्याचा, पुनरूच्चार करण्यात आला. दोन्ही शिष्टमंडळांनी शैक्षणिक सहकार्य, युवा देवाणघेवाण आणि संस्थात्मक भागीदारीच्या भूमिकेवर जोर दिला, तसेच व्हेनेझुएलामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाच्या योगदानाची नोंद घेतली.

‘बहुपक्षीय समन्वय’ हा देखील चर्चेच्या अजेंड्याचा एक भाग होता, ज्यात व्हेनेझुएलाच्या BRICS सदस्यत्वासंबंधी स्वारस्याचा समावेश होता, ज्यावर भारताद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या पुढील BRICS शिखर परिषदेत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांनी बहुपक्षीय मंचांवर समन्वय वाढवण्यास आणि साऊथ-टू-साऊथ सहकार्य मजबूत करण्याच्या, तसेच आंतरराष्ट्रीय पोहोच वाढवण्याच्या उद्देशाने संवाद सुरू ठेवण्यावर सहमती दर्शविली.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleमोदींची आगामी ओमान-जॉर्डन भेट, व्यापार आणि संपर्क वाढीवर केंद्रित असेल
Next articleहाँगकाँगमध्ये भयानक अग्नितांडव; 44 जणांचा मृत्यू, 300 हून अधिकजण बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here