पेरूमध्ये खाण कामगारांवर हल्ले; हिंसाचाराचा उद्रेक

0
खाण कामगारांवर

पेरूतील स्थानिक अधिकारी आणि एका खाण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला उत्तर पेरूच्या पाताझ जिल्ह्यात अनौपचारिक खाण कामगारांवर झालेल्या हल्ल्यामध्ये किमान तीन जण ठार झाले. अँडियन देशात लहान स्तरावर सोन्याचे उत्खनन करणाऱ्या कामगारांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांच्या मालिकेतील ही ताजी घटना आहे.

पोडेरोसा या खाण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचे सुरक्षा कर्मचारी त्या भागात गेले असता, त्यांना गोळ्या लागून मृत अवस्थेत पडलेले तीन जण आढळून आले. हे लोक बेकायदेशीरपणे खनिज उत्खननासाठी तेथे घुसले असावेत, असेही कंपनीने नमूद केले.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी कोणाचेही अपहरण झाले नसल्याचे किंवा कोणीही बेपत्ता नसल्याचे सांगितले आहे. त्यांचे हे विधान, पाताझचे महापौर आल्डो मारिनो यांच्या टेलिव्हिजनवरील विधानाशी पूर्णत: विसंगत आहे. मारिनो यांनी स्थानिक चॅनेलला सांगितले होते की, पोलिसांनी सात जण बेपत्ता असल्याची नोंद केली आहे.

मारिनो म्हणाले की, “आसपासच्या अन्य लोकांकडून मिळालेल्या अहवालांनुसार मृतांची संख्या अधिक असू शकते.”

स्थानिक फिर्यादींनी सोशल मीडियावर नमूद केले की, त्यांना घटनास्थळी 11 रिकामी काडतुसे सापडली असून त्यांनी तपास सुरू केला आहे. तर, पोडेरोसा कंपनीने सांगितले की पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी या हल्ल्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही आणि सरकारी अधिकारी टिप्पणीसाठी उपलब्ध नव्हते.

सोन्याचे उत्खनन आणि बेकायदेशीर कारवाया

पाताझ हे पेरूचे मुख्य सोने उत्पादन करणारे क्षेत्र बनले आहे, याचे मुख्य श्रेय लहान स्तरावरील कामगार किंवा अनौपचारिक खाणींना जाते, ज्या ‘REINFO’ नावाच्या तात्पुरत्या सरकारी परवान्यांतर्गत चालवल्या जातात.

मात्र, बेकायदेशीर खाण कामगारांकडून हजारो परवान्यांचा गैरवापर केला जातो. पोलीस आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या मते, हे कामगार गुन्हेगारी टोळ्यांशी हातमिळवणी करून इतर खाण कामगारांचे उत्पादन हिसकवतात.

पेरू सरकारने डिसेंबरमध्ये REINFO परवान्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली, जी गेल्या दशकातील पाचवी मुदतवाढ आहे. जुलैमध्ये, सरकारने 50,000 हून अधिक लहान स्तरावरील खाण कामगारांना या योजनेतून वगळले (ही संख्या निम्म्याहून अधिक आहे) आणि औपचारिक प्रक्रियेसाठी फक्त 30,000 पेक्षा काहीसे जास्त कामगार कायम ठेवले.

पेरूने 2024 मध्ये, 15.5 अब्ज डॉलर मूल्याच्या सोन्याची निर्यात केली, जी मागील वर्षी नोंदवलेल्या 11 अब्ज डॉलरच्या तुलनेत मोठी झेप आहे. स्थानिक उद्योग आणि देशाच्या आर्थिक वॉचडॉगच्या अंदाजानुसार, यातील सुमारे 40% सोने बेकायदेशीर स्त्रोतांद्वारे आलेले आहे.

गुन्हेगारी टोळ्यांनी या भागात आपले नियंत्रण वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, गेल्यावर्षी मे महिन्यात याच जिल्ह्यात 13 खाण कामगार मारले गेल्याचे पोलिसांनी नोंदवले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजन्मदर वाढवण्यासाठी चीनचा नवा फंडा; कंडोम, गर्भनिरोधकांवर कर लागू
Next articleगतवर्षातील अस्थिरता सावरत, 2026 मध्ये समतोल साधण्याकडे भारताचा कल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here