चिनी हॅकर्सचा अमेरिकन अधिकाऱ्यांवर सायबर हल्ला, व्हेनेझुएला घटनेचा वापर

0
सायबर

सायबर सुरक्षा संशोधकांच्या मते, ‘मस्टँग पांडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनशी संबंधित सायबर हेरगिरी गटाने, व्हेनेझुएलाच्या थिमवर आधारित फिशिंग ईमेल्सद्वारे, अमेरिकेच्या सरकारी आणि धोरणकर्त्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. वॉशिंग्टनने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर लगेचच ही मोहीम राबवण्यात आली.

5 जानेवारी रोजी, एका सार्वजनिक मालवेअर विश्लेषण सेवेवर “US now deciding what’s next for Venezuela” या शीर्षकासह एक घातक झीप फाईल अपलोड झाल्याचे, ‘ऍक्रोनिस थ्रेट रिसर्च थ्रेट रिसर्च युनिट’ मधील तज्ज्ञांच्या निर्दशनास आले, त्यानंतर त्यांनी या संपूर्ण मोहिमाचा पाठपुरावा केला. हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या मालवेअरचा समावेश असलेल्या या फाईलचे तांत्रिक दुवे आधीच्या ‘मस्टँग पांडा’ या हॅकर्स गटाच्या मोहिमांशी जुळले, ज्यावरून तिच्या उगमस्थानाची पुष्टी झाली.

भूराजकीय घडामोडींचा जलद वापर

संशोधकांनी सांगितले की, 3 जानेवारी रोजी अमेरिकेची कारवाई सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, स्थानिक वेळेनुसार सकाळी 06.55 वाजता हे मालवेअर तयार करण्यात आले होते. दोन दिवसांनी या मालवेअरचा नमुना ऑनलाइन दिसून आला, त्याचवेळी मादुरो आणि त्यांची पत्नी सिलीया फ्लोरेस यांनी मॅनहॅटनमधील न्यायालयात अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र प्रकरणांतील आरोपांबाबत आपण दोषी नसल्याचे सांगितले.

‘ऍक्रोनिस’चे रिव्हर्स इंजिनिअर आणि मालवेअर विश्लेषक सुभजीत सिंघा यांनी स्पष्ट केले की, हे हॅकर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घटनेचा फायदा घेण्यासाठी वेगाने काम करत असल्याचे दिसून आले. “यापूर्वी मस्टँग पांडाने राबविलेल्या मोहिमांच्या तुलनेत या मोहिमेची गुणवत्ता कमी होती,” असे म्हणत; त्यांनी “हॅकर्स यावेळी घाईत होते,” असा उल्लेख केला

हे मालवेअर एकदा इन्स्टॉल झाल्यावर, ते ऑपरेटर्सना संवेदनशील डेटा चोरी करण्यास आणि हॅक केलेल्या सिस्टममध्ये दीर्घकाळ प्रवेश मिळवण्यास सक्षम करते. संशोधकांना शंका आहे की, हल्लेखोरांनी अमेरिकन सरकारी संस्था आणि धोरण-संबंधित संस्थांना लक्ष्य केले होते, तरीही त्यांनी कोणत्याही यंत्रणेत यशस्वीरित्या शिरकाव केला आहे की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

जबाबदारी आणि अधिकृत प्रतिसाद

अमेरिकेच्या न्याय विभागाने यापूर्वी ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ पुरस्कृत हॅकिंग गट म्हणून वर्णन केलेल्या ‘मस्टँग पांडा’चा रेकॉर्ड आहे की, ते लक्ष्यित व्यक्तींना माहिती उघड करण्यास भुलवण्यासाठी चालू घडामोडींचा वापर करतात. या गटाने आजवर जगभरातील सरकारी, संरक्षण आणि धोरणात्मक नेटवर्कमध्ये अनेक हेरगिरीच्या मोहिमा राबवल्या आहेत.

वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, “चीनने सातत्याने सर्व प्रकारच्या हॅकिंग क्रियाकलापांचा विरोध केला आहे आणि कायदेशीररीत्या त्यांचा मुकाबला केला आहे, चीन कधीही सायबर हल्ल्यांना प्रोत्साहन देणार नाही, पाठिंबा देणार नाही किंवा ते खपवून घेणार नाही. राजकीय हेतूंसाठी तथाकथित ‘चिनी सायबर धोक्यां’बद्दल चुकीची माहिती पसरवण्यास चीनचा ठाम विरोध आहे.”

दरम्यान, एफबीआयने या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleOperation Sindoor Razed Pakistan-Based LeT HQ, Admits Top Commander
Next articleघटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, चीनकडून जन्मदरवाढीच्या धोरणांचा विस्तार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here