पुलवामा, 2019 : सीआरपीएफचे 4 जवान शहीद
उरी, 2016 : लष्कराचे 17 जवान शहीद
मुंबई, 2008 : सुमारे 160 जण ठार
मुंबई साखळी बॉम्बस्फोट, 1993 : सुमारे 250 मृत्यू
अशी हृदयद्रावक घटनांची यादी न संपणारी आहे. दहशतवादी धोरण वारंवार अपयशी ठरत असले तरी, पाकिस्तानने अद्यापही ते सोडलेले नाही. जगभरातून तीव्र निषेध होत असला तर, भारतविरोधी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय व प्रशिक्षण देणे तसेच शस्त्रास्त्र आणि निधी पुरवठा करण्याचे पाकिस्तानने सुरूच ठेवले आहे. एवढे सर्व करूनही त्यांचा हेतू काही साध्य झालेला नाही. पाकिस्तानच्या छु्प्या युद्धाचे मुख्य लक्ष्य हे जम्मू आणि काश्मीरच राहिले आहे. घुसखोरांना भारतात पाठविणे, काश्मीर खोऱ्यातील निष्पाप तरुणांना कट्टरपंथी बनविणे, भारतविरोधात ऑनलाइन अपप्रचार करणे असे अनेक कुटिल डावपेच पाकिस्तानकडून सुरूच आहेत. एकूणच गेल्या तीन दशकांपासून हे सुरू आहे आणि हे करणाऱ्यांना याबाबत ना खेद ना खंत.
“दहशतवादी मॉड्युल्स, लाँच पॅड्स, अतिरेक्यांसाठी पूरक पायाभूत सुविधा अद्याप तिथे (एलओसीच्या पलीकडे) अस्तित्वात आहेत. जवळपास दर दुसऱ्या दिवशी कुठे ना कुठे तरी चकमक होतच असते. निश्चित आकडा माझ्या लक्षात नाही, पण या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत आम्ही 30 ते 35 अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे,” असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्ट्रॅटन्यूजला अलीकडेच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितले.
एलओसीवरील घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावून सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता अबाधित राखली आहे. “दगडफेक, आयईडी स्फोट, हातबॉम्ब फेकणे अशा घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एकूणच, पूर्वीपेक्षा आता परिस्थितीत खूपच सुधारणा झाली आहे, असे जनरल नरवणे यांनी स्ट्रॅटन्यूजचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांना सांगितले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये 2018 साली 417 दहशतवादी कारवायांची नोंद झाली होती, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने गतवर्षी 1 डिसेंबरला संसदेत दिली होती. त्यानंतर त्यात घट होऊन 2019 आणि 2020मध्ये अनुक्रमे 255 आणि 244 दहशतवादी घटनांची नोंद झाली, अशी माहिती राज्यसभेत लेखी उत्तरात देण्यात आली. तर, गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये 200 दहशतवादी कारवाया झाल्या. डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत 165 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला तर, 14 अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले.
स्ट्रॅटन्यूज ग्लोबलच्या टीमने जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील काही प्रकरणे आणि घटनांचा शोध घेतला. स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरची माहिती घेतली तसेच स्थानिकांशी संवादही साधला. शिवाय, सुरक्षा दलाने केलेल्या काही दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची यादीही पाहिली. त्यावरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होते.
रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न (23 सप्टेंबर 2021)
नियंत्रण रेषा ओलांडून बारामुल्ला जिल्ह्याच्या रामपूर सेक्टरमध्ये तीन अतिरेक्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावत लष्कराने या तिघांनाही कंठस्नान घातले. लष्करामार्फत नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, सादिक अहमद दार, तन्वर अहमद बट्ट आणि मोहम्मद अहमद वानी अशी त्या तीन अतिरेक्यांची नावे आहेत. यापैकी दार हा पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील कोजबंदी येथील रहिवासी आहेत. तर, बट्ट आणि वानी हे दोघेही जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याचे रहिवासी असून ते गेल्या सात ते आठ वर्षांपासून पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते.
या अतिरेक्यांकडून सेहत इंसाफ कार्ड (पाकिस्तान सरकारकडून देण्यात येणारा आरोग्य विमा) आणि तन्वीर अहमद बट्टच्या नावे असलेली दोन एटीएम कार्ड्स (ही दोन्ही कराचीत मुख्यालय असलेली यूबीएल या खासगी बँकेची आहेत) जप्त करण्यात आली. (खालील छायाचित्र)
याशिवाय, पाच एके रायफल्स, पाच पिस्तुल आणि 69 हातबॉम्बसह इतर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा हस्तगत करण्यात आला. ते सर्व पाकिस्तानी बनावटीचे आहेत. याव्यतिरिक्त, 10 हजार 300 रुपयांच्या पाकिस्तानी विविध चलनी नोटा, पाकिस्तानी मार्किंग असलेले खाद्यपदार्थही त्यांच्याकडे सापडल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. (त्याचे चित्र खाली दिले आहे.) जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांना पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये नेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर हिंसाचार घडवून आणण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रांसह पुन्हा भारतात घुसवले जाते, याची या सर्वांमुळे पुष्टी होते.
पुलवामातील दहशतवादविरोधी कारवाई (10 ऑक्टोबर 2020)
दादूरा येथे अतिरेकी असल्याची खात्रीलायक माहिती पुलवामा पोलिसांकडून मिळाल्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई केली. गावाला घेराव घालून घराघरात जाऊन शोध घेतला, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या शोधमोहिमेदरम्यान एका घरातून सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला व त्यात एक शिपाई जखमी झाला. सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात त्या घरात लपून बसलेले दोन अतिरेकी ठार झाले. तर, सुरक्षा दलांवर बॉम्ब फेकणाऱ्या अन्य एका अतिरेक्याला ताब्यात घेण्यात आले, हा अतिरेकी दोडाचा रहिवासी आहे. तर, ठार झालेल्यांपैकी एक अतिरेकी पाकिस्तानी नागरिक असून दुसरा पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी होता. त्यांच्याकडून दोन एके रायफल्स आणि 224 राऊंड्स जप्त करण्यात आले. (खालील छायाचित्र)
नागरोटातील टोलप्लाझा येथील कारवाई (31 जानेवारी 2020)
राष्ट्रीय महामार्ग 1ए वरील बन टोल प्लाझा येते पहाटे साडेपाचच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांनी श्रीनगरच्या दिशेने चाललेला एक ट्रक तपासणीसाठी रोखला. त्यावेळी ट्रकमध्ये लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्या भागात अशा प्रकारे पहिल्यांदाच घडले होते, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात तीन पाकिस्तानी अतिरेकी ठार झाले. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यासह त्यांच्याकडे तीन ‘थुराया’ सॅटेलाइट फोन हॅण्डसेट आणि तीन सीमकार्ड (अॅक्टिव्हेट नसलेली) सापडली. हॅण्डसेट्सचे विश्लेषण केले असता, ते पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये अॅक्टिव्हेट केल्याचे स्पष्ट झाले. (खालील छायाचित्र)
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंसाचार घडवताना स्थलांतरित कामगार, व्यापारी, गावाचे सरपंच, विशेष पोलीस अधिकारी अशांना लक्ष्य केले आहे. 2020-21मध्ये अतिरेकी हल्ल्यात 60हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आमच्या टीमच्या निष्कर्षांना लष्करप्रमुखांकडूनही पुष्टी मिळाली आहे. “सर्वसामान्यांना (सॉफ्ट एलिमेन्ट्स) लक्ष्य करण्याचा प्रकार वाढत चालला आहे. सर्वकाही सुरळीत नाही, अशी भावना निर्माण करण्याच्या हेतूने सर्वसामान्यांना टार्गेट केले जात आहे. असे प्रकार तुरळक जरी असले तरी, सर्वकाही सुरळीत नसल्याची भावना निर्माण करू शकतात,” असे जनरल नरवणे यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले.
सन 2019मध्ये कलम 370 हटवून जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधी मत बनविण्याचा पाकिस्तानने पुरेपूर प्रयत्न केले. पण त्यांच्या आधीच्या प्रयत्नांप्रमाणेच हे प्रयत्न देखील निष्फळच ठरत आहेत.
(अनुवाद : मनोज जोशी)