मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनी सुरुवातीला बेलारूस मार्गे पलायन करण्याचा प्रयत्न केला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दावा केल्याप्रमाणे युक्रेनमा र्गे नाही, असे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी स्पष्ट केले आहे.
युक्रेनने हल्लेखोरांना सीमा ओलांडण्यासाठी सध्याच्या युद्धक्षेत्रातून एक मार्ग उपलब्ध करून दिला होता असा आरोप पुतीन यांनी केला आहे. युक्रेन सरकारने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
पुतीन यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे लुकाशेन्को यांच्या मते, बेलारूस आणि रशियन सुरक्षा दलांनी या हल्लेखोरांना पकडण्यासाठी समन्वयाने कृती केली आहे.
“म्हणूनच ते बेलारूसमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. त्यांनी सुरक्षा दलांना सीमेवर बघितले आणि म्हणून ते मागे वळून युक्रेन – रशियन सीमेजवळील भागात गेले. पुतीन आणि मी एक पूर्ण दिवस झोपलो नाही. आमच्यात सतत संवाद होत होता,” असे त्यांनी बेल्टा या सरकारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या सगळ्या प्रकारात आपला सहभाग असल्याच्या वृत्ताचे युक्रेनने जोरदार खंडन केले असले आणि इस्लामिक स्टेट गटाच्या संलग्न संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी गेल्या आठवड्यात मॉस्कोतील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांचा हात होता, या पुतीन यांच्या भूमिकेचा रशियन अधिकाऱ्यांनी पुनरुच्चार केला आहे.
अटक केलेले संशयित “कट्टरपंथी इस्लामवादी” होते हे कबूल केल्यानंतरही फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस किंवा एफएसबीचे प्रमुख अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या यामागे युक्रेनचा संबंध असल्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. अर्थात यासाठी त्यांनी कोणतेही पुरावे मात्र दिलेले नाहीत.
असा हल्ला होऊ शकतो अशी सूचना अमेरिकेने आधीच केली होती हे कबूल केल्यानंतरही, गेल्या दोन दशकांत रशियाच्या भूमीवर झालेल्या या सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यात पाश्चात्य हेरगिरी संस्थांचा सहभाग असू शकतो, असा आरोप बोर्तनिकोव्ह यांनी केला आहे.
याबाबत कोणताही तपशील न देता बोर्तनिकोव्ह म्हणाले “आम्हाला विश्वास आहे की कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी या हल्ल्याची तयारी केली असली तरी पाश्चात्य देशांच्या विशेष सेवांनी त्यांना मदत पुरवली होती आणि युक्रेनियन विशेष सेवांचा त्यात थेट सहभाग होता.”
आयएसशी संलग्न असलेल्या संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यामागे हाच गट असल्याची खात्रीलायक माहिती आमच्याकडे असल्याचे अमेरिकन गुप्तचरांनी सांगितले. मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉल या ठिकाणी हल्लेखोरांनी 139 लोकांची हत्या केली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार , सुमारे 90 लोक रुग्णालयात दाखल असून, त्यापैकी दोन मुलांसह 22 जणांची प्रकृती गंभीर आहे.
पिनाकी चक्रवर्ती
एपीकडून मिळालेल्या इनपुट्सह