म्यानमार महोत्सवावरील लष्करी पॅराग्लायडरच्या बॉम्बहल्ल्यात 40 जणांचा मृत्यू

0
सोमवारी मध्य म्यानमारमध्ये एका उत्सवादरम्यान उपस्थित असलेल्या गर्दीवर लष्कराच्या एका पॅराग्लायडरने बॉम्ब टाकल्याने किमान 40 जणांचा मृत्यू झाला आणि 80 हून अधिक जण जखमी झाले, असे निर्वासित राष्ट्रीय एकता सरकारच्या प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितले.

थाडिंग्युट पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त सागाईंग प्रदेशातील चाउंग यू टाउनशिपमध्ये शेकडो गावकरी जमले होते तेव्हा लष्कराने हवाई बॉम्बस्फोट केला असा आरोप आयोजन समितीच्या सदस्याने पत्रकारांसमोर केला.

सुरक्षेच्या कारणास्तव नाव न सांगण्याची विनंती करणाऱ्या एका महिलेने स्पष्ट केले की हा मेळावा सांस्कृतिक उत्सव आणि जुंटाविरोधी निषेध अशा दोन्ही कारणांसाठी आयोजित करण्यात आला होता.

आकाशातून बॉम्बफेक

“आयोजकांनी लोकांना इशारा दिला आणि गर्दीतील सुमारे एक तृतीयांश लोक पळून जाण्यात यशस्वी झाले,” असे तिने एएफपीला सांगितले. “मग अचानक, एका मोटारवर चालणाऱ्या पॅराग्लायडरने सभेच्या अगदी वरती उड्डाण केले आणि गर्दीच्या मध्यभागी दोन बॉम्ब सोडले.”

तिने सांगितले की आयोजक निदर्शने लवकर संपवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पॅराग्लायडर दिसू लागले. आणि काही क्षणांमध्येच, परिसरात स्फोट झाले.

“पहिला बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी तिथेच जवळ जमिनीवर होतो. तो स्फोट माझ्या गुडघ्याजवळ झाला, पण माझ्याभोवती असलेले लोक मृत्युमुखी पडले,” असे आयोजकाने आठवून सांगितले.

स्थानिक साक्षीदारांनी हल्ल्यानंतरच्या विनाशाच्या दृश्यांचे वर्णन केले, ज्यामध्ये अनेकांचे मृतदेह ओळखता येऊ नयेत इतके विद्रूप झाले होते. “मुले पूर्णपणे फेकली गेली,” असे दुसऱ्या आयोजकाने एएफपीला सांगितले.

बॉम्ब टाकले गेले तेव्हा ही साक्षीदार तिथे उपस्थित नसली तरी, दुसऱ्या दिवशी ती अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिली आणि म्हणाली की घटनास्थळावर अजूनही अनेक देहांचे अवयव सापडत आहेत.

‘क्लेशदायक प्रकार’

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या हल्ल्याचा आणि लष्कराच्या पॅराग्लायडर वापराचा निषेध केला आहे. म्यानमारच्या सशस्त्र दलांकडून नागरिकांवर जाणूनबुजून केलेला हल्ला हा अत्यंत “क्लेशदायक प्रकार” असल्याचे वर्णन केले आहे.

बीबीसी बर्मीजच्या मते, लष्करी आयातीवर अंकुश लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांची संख्या एकीकडे कमी होत असताना जुंटा अशा हल्ल्यांसाठी पॅराग्लायडरचा वापर करण्याकडे अधिकाधिक वळत आहे.

गर्दी केवळ धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठीच नाही तर जुंटाच्या भरती कायद्याचा आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकांचा निषेध करण्यासाठी देखील जमली होती.

निदर्शकांनी आंग सान सू की आणि इतर राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी देखील केली.

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, 2021 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका आहेत.

टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की या निवडणुका मुक्त किंवा निष्पक्ष नसतील, त्याऐवजी त्या जुंटाने त्यांच्या राजवटीला वैध ठरवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न म्हणून घेतलेल्या असतील.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleयुक्रेनियन सैन्याने डोनेट्स्कमध्ये रशियन सैन्यावर निशाणा साधला: झेलेन्स्की
Next articleThe Great Fall Of China’s Defence Exports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here