युक्रेनियन सैन्याने डोनेट्स्कमध्ये रशियन सैन्यावर निशाणा साधला: झेलेन्स्की

0

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितले की, “कीव्हच्या सैन्याने, डोनेट्स्क भागात झालेल्या पूर्वेकडील आघाडीसोबतच्या लढाईत रशियन सैन्यावर मोठे हल्ले केले. युद्धाच्या सलग चौथ्या वर्षातही हा प्रदेश मुख्य रणभूमी म्हणून कायम आहे.”

झेलेन्स्की यांनी दिलेली माहिती, युक्रेनच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याच्या अहवालावर आधारित आहे. ही माहिती आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक दिवस आधी केलेले एक विधान यात पूर्ण विरोधाभास दिसून येतो. पुतिन यांनी वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की, “मॉस्कोच्या सैन्याने सर्व आघाडीच्या क्षेत्रामंध्ये धोरणात्मक पुढाकार घेतला आहे.”

रोज रात्री जारी केल्या जाणाऱ्या व्हिडीओ संदेशात झेलेन्स्की म्हणाले की, “त्यांनी वरिष्ठ कमांडर ओलेक्सांडर सिरस्की यांच्याशी जवळपास एक तास चर्चा केली, ज्यामध्ये डोब्रोपिलियामधील ऑपरेशन आणि युक्रेनच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यांनी त्या भागातील लष्करी हालचाली आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीविषयी चर्चा केली.”

झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, “डोब्रोपिलिया, जे पोक्रोव्हस्क या महत्त्वाच्या पुरवठा केंद्राच्या उत्तरेकडे आहे, तेथे युक्रेनने काही भागात आघाडी मिळवली आहे. हा भाग रशियाच्या पश्चिमेकडे सुरू असलेल्या आक्रमक मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.”

झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, “युक्रेनचे सैन्य इतर “सर्व दिशांनाही सक्षमपणे आपला बचाव करत आहे.” याशिवाय त्यांनी ईशान्य युक्रेनमधील कुपियान्स्क या पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या शहराचाही विशेष उल्लेख केला, जेथे गेल्या अनेक महिन्यांपासून रशियन हल्ले सुरू आहेत.

याव्यतिरिक्त, झापोरीझ्झिया प्रांतातील नोवोपाव्लिव्का परिसरातील परिस्थिती “गंभीर” असल्याचे झेलेन्स्की यांनी मान्य केले. मात्र, तिथे सुरू असलेल्या युक्रेनच्या सक्रिय संरक्षणात्मक कारवायांना चांगले यश मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युक्रेनियन सैन्य मागे हटत आहे: पुतिन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील सेंट पीटर्सबर्गजवळ तैनात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की, “रशियाने 2025 मध्ये युक्रेनमधील सुमारे 5,000 चौरस किलोमीटरचा (1,930 चौरस मैल) भूभाग पुन्हा ताब्यात घेतला आहे.”

पुतिन म्हणाले की, “सर्व आघाड्यांवरून युक्रेनियन सैन्य मागे हटत आहे आणि कीव्ह प्रशासन रशियन भूभागात खोलवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्या प्रयत्नांना यश येणार नाही.”

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले की, त्यांनी दक्षिण झापोरीझ्झिया भागातील नोव्होह्रीहोरीव्ह्का या गावावर नियंत्रण मिळवले आहे. हे जाहीर करणे, म्हणजे जवळपास रोजच नवीन गावांवर ताबा मिळवण्याच्या त्यांच्या मालिकेतील एक भाग आहे.

दरम्यान, दक्षिण युक्रेनमधील खेरसॉन प्रांताच्या राज्यपालांनी सांगितले की, “बुधवारी खेरसॉन शहर आणि आजूबाजूच्या भागांवर झालेल्या रशियन हल्ल्यांमध्ये तीन नागरिक मारले गेले.”

तसेच, रशियाच्या सीमेवर वसलेल्या उत्तर युक्रेनमधील सुमी प्रांताच्या राज्यपालांनी सांगितले की,
“विविध जिल्ह्यांमध्ये रशियन ड्रोन हल्ल्यांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपुढील वर्षी ब्रिटन पुन्हा झळकणार बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर
Next articleम्यानमार महोत्सवावरील लष्करी पॅराग्लायडरच्या बॉम्बहल्ल्यात 40 जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here