2023 मध्ये, 59 देशांमधील सुमारे 28.2 कोटी लोकांना उपासमारीची तीव्र झळ पोहोचली असून युद्धग्रस्त गाझाला अतितीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला आहे असे, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संकटावरील जागतिक अहवालातून दिसून आले आहे.
या अहवालानुसार, 2022 मध्ये जगातील 2 कोटी 40 लाखांहून अधिक लोकांना अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे गाझा पट्टी आणि सुदानमधील अन्नसुरक्षेची परिस्थिती खराब झाली. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो तोरेरो यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी उपासमारीचे प्रमाण निश्चित केले असून यामध्ये पाच देशांतील 7 लाख 05 हजार लोक पाचव्या टप्प्यात आहेत, जो उच्च (अधिक भयावह) मानला जातो.
2016 मध्ये जागतिक अहवाल प्रसिद्ध व्हायला सुरूवात झाल्यापासून या अहवालात नमूद करण्यात आलेली उपासमारीने ग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे असा दावाही मॅक्सिमो तोरेरो यांनी केला आहे.
दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि मालीमध्ये हजारो लोक उपासमारीने ग्रस्त असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी (UN)दिली आहे. गाझामधील 11 लाख तर दक्षिण सुदानमधील 79हजार जनतेची परिस्थिती जुलैपर्यंत पाचव्या टप्प्यात पोहोचेल (अधिक भयावह होईल) असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. याशिवाय तिथे तीव्र स्वरूपाचा दुष्काळही पडू शकतो असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
त्याशिवाय 2016 मध्ये नोंदवलेल्या भूकग्रस्तांच्या संख्येच्या तुलनेत या अहवालात चार पटीने वाढ झाली आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, तीव्र दुष्काळाचा सामना करणारे 80 टक्के म्हणजे साधारणपणे 5 लाख 77 हजार लोक एकट्या गाझामध्ये आहेत. तिथे भूक ही गोष्ट सर्वात जास्त भीतीदायक स्थितीला पोहोचली आहे.
अन्न संकटावरील या ताज्या जागतिक अहवालानुसार, हवामानातील तीव्र बदल आणि बिकट होत गेलेली आर्थिक परिस्थिती हे घटक देखील कारणीभूत आहेत. त्यामुळे तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करणाऱ्यांची संख्या 2022च्या तुलनेत 2 कोटी 40 लाखांनी वाढली.
या वर्षीचा काहीसा ‘निराशाजनक’ वाटणारा हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्था, युरोपियन युनियन तसेच सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांना एकत्र आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय आघाडीसाठी तयार करण्यात आला आहे.
2023 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युक्रेनसह 17 देशांमध्ये परिस्थिती सुधारली आहे ही एकच सकारात्मक गोष्ट या अहवालात आढळून आली आहे.
आराधना जोशी
(संयुक्त राष्ट्रांच्या मीडिया इनपुट्सह)