युक्रेन आणि रशिया 7 आठवड्यांनंतर पुन्हा तुर्कीमध्ये शांतता चर्चा सुरू करणार

0

कीवमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याला दुजोरा देत, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले की, युक्रेन आणि रशिया येत्या बुधवारी तुर्कीमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा करणार आहेत. गेल्या सात आठवड्यांतील ही पहिलीच शांतता बैठक आहे.

झेलेन्स्की यांनी या चर्चेच्या आदल्या दिवशी वाटाघाटींना अधिक गती देण्याचे आवाहनही केले.

‘पूर्णपणे विरोधी भूमिका’

रशियाच्या सरकारी TASS वृत्तसंस्थेनुसार, तुर्कीतील एका स्रोताने सांगितले की, ही चर्चा बुधवारी होणार आहे. RIA वृत्तसंस्थेनुसार, गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस ही चर्चा चालू राहील.

क्रेमलिनने सांगितले की, चर्चेच्या तारखेबाबत अद्याप पुष्टी मिळालेली नाही, पण दोन्ही बाजू युद्ध संपवण्याबाबत “पूर्णपणे विरोधी भूमिका” घेत आहेत.

झेलेन्स्की यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, “त्यांनी सोमवारी युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण परिषदेचे सचिव रुस्तेम उमेरोव यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा कैद्यांची देवाणघेवाण आणि रशियासोबत पुन्हा होणाऱ्या तुर्कीतील बैठकीच्या तयारीसाठी होती.”

“उमेरोव यांनी कळवले आहे की, बैठक बुधवारी होणार असून, त्यासंबंधीचा सखोल तपशील उद्या देण्यात येतील,” असे झेलेन्स्की म्हणाले.

उमेरोव हे यापूर्वी युक्रेनचे संरक्षणमंत्री होते आणि त्यांनी रशियासोबतच्या पहिल्या दोन चर्चा फेऱ्यांचे नेतृत्व केले होते.

सातत्याने हल्ले सुरु

यूक्रेनने अमेरिकेद्वारे केलेल्या तात्काळ युद्धविरामाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मात्र रशियाने स्पष्ट सांगितले आहे की, ‘युद्धविराम लागू करण्यापूर्वी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.’

गेल्या काही आठवड्यांत रशियन सैन्याने, युक्रेनच्या शहरांवर सातत्याने हल्ले सुरु ठेवले आहेत. सोमवारी रात्री क्षेपणास्त्र आणि शेकडो ड्रोन्सद्वारे युक्रेनवर हल्ला करण्यात आला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि पंधरा जण जखमी झाले. युक्रेननेही प्रत्युत्तरादाखल लांब पल्ल्याचे ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत.

झेलेन्स्की म्हणाले की: “आमच्याकडून चर्चेचा अजेंडा स्पष्ट आहे, ज्यात — युद्धकैद्यांची सुटका, रशियाने पळवलेल्या मुलांची परतफेड आणि नेत्यांची बैठक आयोजित करण्याच्या तयारीचा समावेश आहे.”

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली आहेत, त्यांनी झेलेन्स्की यांच्यासोबतच्या प्रत्यक्ष भेटीचे आव्हान यापूर्वी नाकारले होते.

पुतीन म्हणाले की, “ते झेलेन्स्की यांना कायदेशीर नेता मानत नाहीत, कारण युक्रेनमध्ये लष्करी कायदा लागू असतानाही त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर नवीन निवडणुका झालेल्या नाहीत.”

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले की, “आमच्याकडे एक मसुदा आहे, आणि युक्रेनकडूनही एक मसुदा देण्यात आला आहे. दोन्ही मसुद्यांवर मते मांडली जातील आणि चर्चा केली जाईल. सध्या हे दोन्ही मसुदे पूर्णपणे परस्परविरोधी आहेत.

युद्धविरामावर ठोस प्रगती नाही

युक्रेन आणि रशियामध्ये 16 मे आणि 2 जून रोजी इस्तंबूलमध्ये दोन चर्चा फेऱ्या झाल्या, ज्यातून हजारो युद्धकैद्यांची व मृत सैनिकांची देवाणघेवाण झाली.

तथापि, युद्धविराम किंवा सुमारे तीन वर्षांहून अधिक चाललेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी कोणतीही ठोस प्रगती झाली नाही. क्रेमलिनने सांगितले की, युक्रेनने त्याचे चार प्रदेश सोडून द्यावेत, जे रशियामध्ये समाविष्ट केल्याचे रशिया म्हणते.

ट्रम्प यांनी मागील आठवड्यात म्हटले की, जर त्याआधी युद्ध थांबवण्याचा कोणताही करार झाला नाही, तर ५० दिवसांत रशिया आणि त्याचे निर्यात खरेदी करणाऱ्या देशांवर नव्या निर्बंधांची घोषणा केली जाईल.

फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-नोएल बारो यांनी कीवमध्ये झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले की, “रशियाने तात्काळ युद्धविराम लागू करण्यास नकार दिला आहे आणि त्याच्या मागण्या ‘अत्यंत गैरसोयीच्या’ आहेत.”

त्यांनी सांगितले की, “चर्चा सुरू होणे आवश्यक आहे, पण अशा पायावर की जी दोन्ही पक्षांच्या हिताची असावी, कारण राजनय म्हणजे शरणागती नव्हे. राजनयाची सुरुवात ही राष्ट्रप्रमुख व सरकार प्रमुखांच्या पातळीवरील बैठकीनेच होते, ज्यासाठी वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अनेकदा आवाहन केले आहे.”

बारो म्हणाले की, “जर पुतीन यांनी युद्धविराम मान्य केला नाही, तर अजून कठोर निर्बंधांचे पॅकेज तयार केले गेले पाहिजे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article15 महिन्यांच्या विलंबानंतर अपाचे हेलिकॉप्टर लष्कर सामील होण्यास सज्ज
Next articleNavy and Coast Guard Set to Induct Made-in-India C295 Transport Aircraft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here