इराणला धडा शिकवणे हाच आमच्या प्रतिहल्ल्याचा उद्देश – इस्रायल

0
इराणच्या तेहरानमधील एका रस्त्यावर 15 एप्रिल 2024 रोजी इराणी क्षेपणास्त्रांचे चित्र असलेला इस्रायलविरोधी फलक (रॉयटर्सकडून माजिद असगरीपूर/डब्ल्यूएएनए [पश्चिम आशिया वृत्त संस्था])

जेरुसलेमः मागील आठवड्याच्या शेवटी इराणकडून झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलकडून लवकरच प्रतिहल्ला करण्यात येणार असून त्यामागे इराणला दहशत बसावी हा उद्देश असेल असे एका वरिष्ठ खासदाराने मंगळवारी सांगितले.

“आम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागेल, असे नेसेट फॉरेन अफेअर्स आणि डिफेन्स कमिटीचे अध्यक्ष युली एडलस्टाइन म्हणाले. “आम्ही प्रतिक्रिया दिली हे इराणी जनता समजून घेईल. आणि मला प्रामाणिकपणे आशा आहे की तो त्यांच्यासाठी एक धडा असेल की, तुम्हाला ते शक्य आहे म्हणून तुम्ही सार्वभौम देशावर हल्ला करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

“मला आशा आहे की अशा प्रकारची हाणामारी सुरू ठेवणे आपल्या हिताचे नाही हे त्यांच्या लक्षात येईल”, ते पुढे म्हणाले, “युद्ध सुरू करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, कारण आम्ही सूडबुद्धीने वागत नाही.”

काउंटर-स्ट्राइकचे नियोजन करताना इस्रायलला पाश्चात्य देशांचा युद्धाला असलेला विरोध, इराणविरूद्ध कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांमुळे हवाई दलाला निर्माण होणारा धोका आणि अर्ध्या वर्षाहून अधिक काळ चाललेल्या गाझा हल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज या मुद्द्यांचाही विचार करावा लागेल.

एडलस्टीन यांनी सांगितले की लक्ष्य काय असावे यावर अजूनही चर्चा सुरू आहे. परंतु “आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय निकष विचारात घेतो” आणि इस्रायलने जाणूनबुजून कधीही कोणत्याही नागरिकांना लक्ष्य केलेले नाही,” असे ते म्हणाले.

शनिवारी रात्री शेकडो पायलटविरहित कामिकेझ विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या मदतीने इराणने इस्रायलवर केलेला तो पहिला थेट हल्ला होता. इस्रायल अमेरिका, ब्रिटिश, फ्रेंच आणि जॉर्डनच्या सैन्याने बहुतांश क्षेपणास्त्रांचा नाश केला.

इराणच्या बचाव फळीला रोखण्यासाठी इस्रायलने लढाऊ विमाने आणि उंचावरील अवरोधक यांचा वापर केला. एडलस्टीन यांनी सांगितले की, यासाठी “खूप मोठी रक्कम” खर्च झाली मात्र ती स्वसंरक्षणाच्या दृष्टीने गुंतवणूक म्हणून आवश्यक होती. इराणी हल्ल्यांमध्ये एक इस्रायली मुलगी जखमी झाली आणि तर हवाई तळाचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

दमास्कसमधील आपल्या दूतावासाच्या आवारात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे दोन सेनाधिकारी आणि अनेक इतर अधिकारी ठार झाले. या घटनेचा बदला म्हणून इराणने हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे स्पष्ट केले. इस्रायलने मात्र 1 एप्रिलच्या या हल्ल्याची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही.

चॅनल 13 कडून करण्यात आलेल्या टीव्ही सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 29 टक्के इस्रायली नागरिक इराणवर तात्काळ हल्ला करण्याचे समर्थक असून, 37 टक्के नागरिकांच्या मते काही काळाने हल्ला करावा तर 25 टक्के नागरिकांचा अशा कृतीला विरोध आहे.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)

 

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here