Ukraine: रशियाच्या ड्रोन हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू

0
रशियाचा पुन्हा युक्रेनवर निशाणा

युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी प्रदेशातल्या एका गावावर, सोमवारी रात्री रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात, 8 वर्षांचा लहान मुलगा आणि दोन प्रौढांचा मृत्यू झाल्याची माहिती, त्या भागाच्या लष्करी प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली.

“हा हल्ला वेगवेगळ्या कुटुंबांतील लोकांचे प्राण घेऊन गेला,” असे प्रशासनाने टेलीग्राम या मेसेजिंग अ‍ॅपवर म्हटले आहे.
“मृत पावलेले सर्वजण एकाच भागातील रहिवासी होते, जे हल्ल्याच्यावेळी आपापल्या घरी शांत झोपले होते. मात्र रशियन ड्रोन्सनी त्यांची झोप कायमचीच खंडित केली,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

रात्रीच्या वेळी झालेल्या या हल्ल्यांचे पूर्ण स्वरूप लगेच स्पष्ट झाले नाही.

रशियाकडून याबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. दोन्ही पक्ष सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याच्या असल्याच्या आरोपाचे खंडन करतात, मात्र वास्तवात फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या या युद्धात, आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनचा रशियावर पलटवार

दरम्यान, युक्रेनच्या ड्रोन्सनी मंगळवारी सकाळी, मॉस्कोबाहेरील एका बहुमजली निवासी इमारतीवर हल्ला केला, ज्यामध्ये लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाले, अशी माहिती TASS वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली.

मॉस्को प्रदेशाचे राज्यपाल आंद्रेई वोरोब्योव यांनी सांगितले की, ‘राजधानीच्या पश्चिमेस क्रास्नोगोर्स्क शहरात, इमारतीच्या 17व्या मजल्यावर ड्रोनमुळे आग लागली. जखमी झालेल्यांवर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.’

वोरोब्योव यांनी सांगितले की, ‘मॉस्कोच्या पश्चिमेकडील इतर दोन ड्रोन पाडण्यात आले.’

युक्रेनचे ड्रोन्स ताब्यात

मॉस्कोचे महापौर सर्जी सोब्यानीन यांनी सांगितले की, ‘रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने, दोन युक्रेनीयन ड्रोन शहराच्या दिशेने येत असतानाच अडवले.’

सोब्यानीन यांनी टेलीग्रामवर पोस्ट करत सांगितले की, “मध्यरात्रीनंतर पाडलेल्या एका ड्रोनचे अवशेष तपासले जात आहेत.
राजधानीकडे येणारा तिसरा ड्रोनही संध्याकाळीच परतवण्यात आला होता.”

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘मध्यरात्रीच्या 90 मिनिटांच्या कालावधीत 9 ड्रोन नष्ट करण्यात आले, त्यात कुर्स्क आणि ब्रायांस्क सीमावर्ती भागांतील ड्रोनही होते.’

हल्ल्यांमध्ये वाढ

अलीकडच्या काही महिन्यांमध्ये युक्रेनने रशियातील दूरवरच्या लष्करी तळांवरील ड्रोन हल्ले वाढवले आहेत.

या महिन्यात झालेल्या एका हल्ल्याला “ऑपरेशन स्पायडर वेब” असे नाव देण्यात आले, ज्यामध्ये युक्रेनच्या ड्रोनने रशियातील दीर्घ पल्ल्याच्या लष्करी विमानतळांना लक्ष्य केले.

दुसरीकडे, रशियाने देखील युक्रेनी शहरांवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. रविवारी रात्री, कीव आणि आजूबाजूच्या भागात झालेल्या रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)

+ posts
Previous articleDRDO-भारत फोर्ज निर्मित, CQB Carbine Weapon ला विशेष पसंती
Next articleDefence Ministry Approves Rs 2,000 Crore Emergency Procurement to Boost Army’s Counter-Terror Capabilities

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here