युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले की रशियाबरोबरचे युद्ध अखेरीस संवादाने संपण्याची आशा आहे. मात्र त्यासाठी कीव मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या दोन संभाव्य उत्तराधिकाऱ्यांना ते लवकरच एक योजना सादर करणार आहेत.
एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना झेलेन्स्की यांनी सांगितले की रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनने तीन आठवड्यांपूर्वी केलेली घुसखोरी हा त्या योजनेचा एक भाग होता, पण त्यात आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांबरोबर इतर गोष्टींचाही समावेश होता.
“या योजनेचा मुख्य मुद्दा रशियाला युद्ध संपवण्यास भाग पाडणे हा आहे. आणि मला तसं व्हावं असं वाटतं-(मला खात्री आहे की ते होईल) कारण ते युक्रेनसाठी न्याय्य असेल,” अशी टिप्पणी त्यांनी फेब्रुवारी 2022 पासून रशियाने पूर्ण ताकदीनिशी सुरू केलेल्या युद्धाबद्दल बोलताना कीवमध्ये पत्रकारांसमोर केली.
त्यांनी पुढील निर्णयाबाबत अधिक माहिती दिली नाही, पण या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवार कमला हॅरिस तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही आपण चर्चा करू असे झेलेन्स्की यांनी सांगितले.
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी सप्टेंबरमध्ये आपण अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी बायडेन यांची भेट घेण्याची तयारी करत असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले.
त्यांच्या या वक्तव्यांवरून असे सूचित होते की आंतरराष्ट्रीय शांतता शिखर परिषदच्या फॉलोअपकडे ते चर्चेसाठीचा मुख्य संभाव्य मंच म्हणून बघत आहेत कारण यामध्ये रशियाचे प्रतिनिधी हवे असा युक्रेनचा आग्रह आहे.
जूनमध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या पहिल्या शांतता शिखर परिषदेत रशियाला वगळण्यात आले, तर इतर अनेक शिष्टमंडळांना युक्रेनच्या शांतताविषयक दृष्टीकोनाने आकर्षित केले. ग्लोबल साऊथकडूनही युक्रेनला पाठिंबा मिळण्याची शक्यता असली तरी जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनवर मात्र त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी 19 ऑगस्ट रोजी सांगितले की युक्रेनने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क प्रदेशात सीमापार घुसखोरी सुरू केल्यानंतर चर्चा करण्याचा प्रश्नच उरत नाही.
गेल्या आठवड्यात कीव दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि युक्रेनच्या संघर्षावर लवकर, कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याचे समर्थन केल्याचे त्यांना सांगितले.
रशियाला युद्धाच्या कोणत्याही तडजोडीमध्ये युक्रेनला अशा अटी घालायच्या आहेत ज्या कीव्हला अस्वीकार्य वाटतील असे झेलेन्स्की यांना ठामपणे वाटते.
पुतीन यांच्या मते, कोणत्याही कराराची सुरुवात युक्रेनने “प्रत्यक्षातील वस्तुस्थिती” स्वीकारल्यापासून होणे आवश्यक आहे. त्यामुळे रशियाकडे युक्रेनचे चार प्रदेश तसेच क्रिमियाचा मोठा भाग असेल. तर युक्रेनचे म्हणणे आहे की आता रशियाच्या कुर्स्क प्रदेशाच्या 1,200 चौरस किलोमीटरपेक्षा (463 चौरस मैल) जास्त भागावर त्याचे नियंत्रण आहे.
“पुतीन यांच्याशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, आजचा संवाद तत्वतः रिकामा आणि अर्थहीन आहे कारण त्यांना राजनैतिक मार्गाने युद्ध संपवायचे नाही”, असे झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याशिवाय कुर्स्क प्रदेशातील हल्ल्यामुळे युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी आणि भूभागाचा मोठा भाग सोडून देण्यासाठी रशियाशी तडजोड करण्याचे आवाहन करणाऱ्या जगभरातील सरकारांची संख्या आता कमी झाली आहे असेही झेलेन्स्की म्हणाले
झेलेन्स्की यावेळी पुतिन यांची थट्टा करत म्हणाले की त्यांनी(पुतीन) स्वतः च सांगितले आहे की रशियाच्या स्वतःच्या प्रदेशाच्या संरक्षणापेक्षा युक्रेनियन जमीन ताब्यात घेण्यास आपण प्राधान्य देत आहोत.
त्यांनी कुर्स्क प्रदेशाकडे पत्रकारांचे लक्ष वेधले जेथे युक्रेनने 100 वसाहतींवर कब्जा केल्याचा दावा केला आहे, तर रशियन सैन्याने पूर्व डोनेस्तक प्रदेशात हळूहळू पुढे जात आहे.
युक्रेन देशांतर्गत शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात प्रगती करत असून त्याने देशांतर्गत तयार केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेतली असल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.
युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांनी हात वर केल्यामुळे, त्यांच्यात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता फारच कमी आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)