‘हमास’ लष्कराचा उपप्रमुख इस्त्राईलच्या हल्ल्यात ठार

0
हमासच्या लष्कराचा उपप्रमुख मरवान इस्सा याचे संग्रहित छायाचित्र.

मरवान इस्सा: ‘मोस्ट वॉन्टेड’ ‘शॅडो मॅन’चा हवाईहल्य्यात खात्मा

दि. १२ मार्च: हमास या दहशतवादी संघटनेच्या लष्कराचा उपप्रमुख मरवान इस्सा हा इस्त्राइल संरक्षण दलाच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्राईलकडून याची खातरजमा करण्याचे प्रयत्न सुरु असून, हे वृत्त खरे असल्यास, इस्सा हा गाझापट्टीत हमास-इस्त्राईल युद्धाला सुरुवात झाल्यापासून इस्त्राईलच्या हल्ल्यात ठार झालेला आत्तापर्यंतचा हमासचा सर्वांत मोठा नेता आहे. इस्सा याला इस्त्राईलने ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले होते.

गाझापट्टीत गेल्यावर्षी सात ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यात इस्त्राईली नागरिक मोठ्याप्रमाणात मृत्युमुखी पडले होते. त्याचा बदला घेण्यासाठी इस्त्राईलच्या सैन्याने गाझापट्टीत हमासच्या तळांवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात आत्तापर्यंत हजारो नागरिक ठार झाले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातही हे हल्ले थांबविण्यास इस्त्राईलने नकार दिला आहे. या विषयी माहिती देताना इस्राईलच्या संरक्षणदलाचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हागारी यांनी सांगितले, की शनिवारी रात्री गुप्तचरांकडून, इस्सा हा मध्यगाझातील अल-नुसैरीयत या निर्वासित छावणीमध्ये लपून बसला आहे, अशी ठाम माहिती आम्हाला मिळाली. या माहितीच्या आधारे आम्ही या छावणीवर हल्ला केला. या हल्य्यात इस्सा ठार झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याची खातरजमा अद्याप करण्यात येत आहे. ‘शॅडो मॅन’ म्हणून ओळखला जाणारा इस्सा कधीही कोणत्याच आघाडीवर दिसत नसे, त्यामुळेच त्याला हे टोपणनाव प्राप्त झाले होते. तो हमासच्या ‘इझ्झ अल दीन-अल-कासीम’ या लष्कराचा उपप्रमुख होता.

इस्सा आणि हमासचा आणखी एक नेता गाझामधील शस्त्रसाठा व त्याचे व्यवस्थापन पाहत होते. त्यांच्यासह इतर महत्त्वाचे दहशतवादी नेतेही या भूमिगत छावणीमध्ये होते. त्याची माहिती मिळाल्यावरून शिन बेत या इस्त्राईलच्या लष्करी तुकडीने या छावणीवर हवाईहल्ला केला. त्यात इस्साचा मृत्यू झाला, असे हागारी यांनी म्हटले आहे. पॅलेस्टाईनच्या लष्कराने या हवाई हल्ल्याची माहिती दिली असली, तरी हल्ला झाला त्या वेळी इस्सा तेथे होता का, याची पुष्टी मात्र त्यांनी केली नाही. ‘इस्साच्या मृत्यूची पुष्टी करणारी ठाम माहिती अद्याप आमच्या हाती आलेली नाही,’ असे इस्त्राईलचे कॅबिनेट मंत्री चिली ट्रोपर यांनी ‘चॅनेल-१३’  या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘या हल्ल्यात इस्सा खरोखरच मारला गेला असेल, तर ही इस्त्राईलचे संरक्षण दल आणि ‘शिन बेत’ यांची मोठी उपलब्धी असेल. इस्सा हा एका अर्थाने हमासचा लष्करप्रमुखच होता, असेही त्यांनी सांगितले.

 

विनय चाटी


Spread the love
Previous articleचिनी टेहेळणी नौका भारतीय किनारपट्टीनजीक आढळली
Next article‘गाझा’तील युद्धामुळे दहशतवाद वाढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here