नागरी उड्डयन क्षेत्रातील प्रशिक्षण देणार
दि. ०७ मार्च: नागरी उड्डयन क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षण देण्याबाबत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-मुंबई’ने (आयआयएम-एम) युरोपातील नागरी उद्यान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी ‘एअरबस’ बरोबर परस्परसहकार्य करार केला आहे. नागरी उड्डयन विषयात प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना या करारान्वये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यामतून येत्या काळात या विषयातील तज्ज्ञ देशांतर्गत प्रशिक्षण संस्थांमधूनच घडविण्यात येणे शक्य होणार आहे. आयआयएम-मुंबईचे संचालक मनोज. के तिवारी आणि ‘एअरबस’चे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मैल्लार्ड यांनी या सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.
या करारानुसार या क्षेत्रातील व्यावसायिकांना आयआयएम-मुंबई कमी कालावधीच्या प्रशिक्षण सत्रांद्वारे प्रशिक्षित करणार आहे. तर, प्रशिक्षणार्थींना ‘एअरबस’च्या ‘एअरबस बियॉंड’ या उपक्रमांतर्गत ‘एव्हिएशन लॉजिस्टिक्स,’ ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट,’ ‘ऑपरेशन्स एक्सलन्स,’ ‘कार्गो हॅण्डलिंग,’ आदी विषयांचे प्रशिक्षण मिळणार आहे, असे ‘एअरबस’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मैल्लार्ड यांनी या क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला. ‘ देशाच्या आर्थिक विकासासाठी कुशल मनुष्यबळ अतिशय गरजेचे आहे. ‘एअरबस’मध्ये आम्ही भारताच्या वाढत्या नागरी उड्डायन क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मदत करणार आहोत. आयआयएम मुंबईशी झालेल्या या करारामुळे भविष्यात हवाई प्रशिक्षणासंबंधी अधिक कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतील. त्यामुळे भारताच्या नागरी उड्डयन क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ देशातच उभे राहील,’ असे त्यांनी नमूद केले.
आयआयएम-मुंबईचे संचालक मनोज. के तिवारी यांनी हे सहकार्य अतिशय उत्साहजनक असल्याचे मत व्यक्त केले. ‘एअरबस’शी करण्यात आलेल्या या परस्परसहकार्य करारामुळे आम्ही अतिशय उत्साही आहोत. अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे. या करारामुळे नागरी उड्डयन क्षेत्रातील अनेक संधी उपलब्ध होतील व या व्यवस्थापन विषयक अभ्यास्क्रमाचाही विकास होईल, या करारानुसार आम्ही प्रशिक्षणार्थींना वर्गातील प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगात काम करण्याची संधी, असा ‘ब्लेंडेड’ अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे या क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्व भारतातूनच उभे राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
(अनुवाद: विनय चाटी)