आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स: संस्थात्मक व कार्यपद्धतीचाही कायापालट
दि. ०५ एप्रिल: तंत्रज्ञान बदलातून आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच; संस्थात्मक व कार्यपद्धतीतील कायापलटाच्या माध्यमातून लष्कराला भविष्यदर्शी आणि नित्यसिद्ध करण्याचा निर्णय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’मध्ये घेण्यात आला.
भारतीय लष्कराच्या द्वैवार्षिक ‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’ला २८ मार्चअसून सुरुवात झाली होती. हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचा समारोप दोन एप्रिल रोजी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या बीजभाषणाने झाला. पहिल्या टप्प्यात लष्कराच्या विविध विभागीय मुख्यालयाचे प्रमुख (आर्मी कमांडर्स) त्याच्या मुख्यालयातून परिषदेत सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्प्यात नवी दिल्ली येथे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून परिषदेचे कामकाज झाले. या परिषदेत लष्कराला भविष्यदर्शी व नित्यसिद्ध करण्याच्या दृष्टीने करावयाच्या प्रयत्नाबाबत लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्त्वात चर्चा झाली. विशेष तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा लष्करकेंद्री कायापालट करून आत्मनिर्भरता मिळविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. लष्कराचे विद्यमान संस्थात्मक स्वरूप व कार्यपद्धतीत कायापालट करून ती अधिक भविष्यदर्शी, नित्यसिद्ध व आत्मनिर्भर करण्याचे नियोजन या परिषदेत करण्यात आले, असे लष्कराच्या पत्रकात म्हटले आहे. हे फेरबदल घडवून आणण्यासाठी लष्कराच्या ‘आर्मी डिझाईन ब्युरो’ची कार्यकक्षा वाढविणे व प्रत्येक विभाग मुख्यालयाच्या ठिकाणी त्याची स्वतंत्र कार्यालये सुरु करणे, याचाही निर्णय परिषदेत घेण्यात आला.
लष्कराच्या पत्रकात पुढे म्हटले आहे, की या विषयाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याबाबतही परिषदेत विचार करण्यात आला. त्याचबरोबर विविध चाचण्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे व चाचणी घेण्यासाठी तुकडीची नेमणूक करणे या बाबतही विचार करण्यात आला. चाचणी अधिक कार्यक्षम पद्धतीने घेण्यासाठी व त्याच्यातील सातत्य टिकून राहण्यासाठी व चाचणी निकषाबाबत अंतिम अहवाल तयार करण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. या पुढे लष्करासाठी खरेदी करण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून या उपकरणाची देखभाल, दुरुस्ती व इतर बाबींसाठी कायमस्वरूपी मदत मिळण्याबाबत खातरजमा करण्यात येईल व त्यानंतरच करार करण्यात येईल. कार्यपद्धतीत अधिक सुलभता व सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी समन्वय वाढविण्यात येईल, असे निर्णयही या परिषदेत घेण्यात आले.
सामरिकदृष्ट्या काही महत्त्वाचे निर्णयही या परिषदेत घेण्यात आले. लष्कराच्या युद्धासरावासाठी स्वतंत्र रचना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अशा सरावासाठी शत्रू सैन्यासारखे काम करेल असे एक संघटन उभारण्याचा व त्या माध्यमातून खरी युद्धसदृश परिस्थिती निर्माण करून त्यामाध्यमातून लष्करी सराव करण्याची संभावना तपासण्याचा विचारही परिषदेत करण्यात आला. तंत्रज्ञानक्षम व भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास सज्ज लष्कर उभारण्यासाठी विद्यमान धोरणाचा फेरआढावा घेण्याचेही ठरविण्यात आल्याचे पत्रकात पुढे म्हटले आहे. या वेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या क्षमतावृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर व नविनतेवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनीही या परिषदेला संबोधित केले. तिन्ही अधिकाऱ्यांनी सैन्यदलातील समन्वय व एकत्रित काम करण्याची गरज प्रतिपादित केली, असे लष्कराच्या पत्रकात म्हटले आहे.
रविशंकर