इंजिन पार्टच्या उत्पादनासाठी रोल्स-रॉईसचा भारत फोर्जसोबत नवा करार

0

ब्रिटनची इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी रोल्स-रॉईसने, भारतीय संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी भारत फोर्जसोबत आपल्या अत्याधुनिक ‘पर्ल 10X इंजिनसाठी’ फॅन ब्लेड्स तयार करण्याचा नवा करार केला आहे. या माध्यमातून दोन्ही कंपन्यांमधील दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत होणार असून, भारताची जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीतली भूमिका अधिक बळकट होईल.

या नव्या उपक्रमांतर्गत, भारत फोर्ज आपले विद्यमान उत्पादन कार्यक्षेत्र, ज्यात आधीपासूनच ‘पर्ल 700’ इंजिनसाठीचे घटक समाविष्ट आहेत, ते आता पर्ल 10X इंजिनसाठीही विस्तारित करणार आहे. हा करार जर्मनीतील डालेव्हिट्झ येथील रोल्स-रॉईसच्या प्रकल्पामध्ये औपचारिकरित्या करण्यात आला असून, 2030 पर्यंत भारतातून दुहेरी सोर्सिंग करण्याच्या रोल्स-रॉईसच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

रोल्स-रॉईस इंडिया;s ट्रान्सफॉर्मेशनचे ईव्हीपी शशी मुकुंदन, यांनी सांगितले की “भारतामध्ये प्रगत उत्पादन क्षमता विकसित करण्याच्या आमच्या बांधिलकीला हा करार अधिक बळकट करतो.”

“विविध जागतिक भागीदारी ‘मेक इन इंडिया’ सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी कशा सुसंगत राहू शकतात आणि एकाच वेळी लवचिक जागतिक पुरवठा साखळीला कशाप्रकारे चालना देऊ शकतात, हे या भागीदारीतून स्पष्ट होते,” असेही ते म्हणाले.

भारत फोर्ज, जी कल्याणी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे ती, 2020 पासून रोल्स-रॉईसची विश्वासार्ह पुरवठादार राहिली आहे. या कंपनीने ‘पर्ल 700’ इंजिन प्रोग्रामसाठी महत्त्वाचे मशीन घटक पुरवले आहेत. 2024 मध्ये, कंपनीने पहिले ‘झिरो-डिफेक्ट’ फॅन ब्लेड तयार करून आपले अचूक अभियांत्रिकी कौशल्य आणि उत्पादन क्षमतेचे जागतिक प्रदर्शन केले. आता नव्या करारामुळे 18,000 पाउंडपेक्षा जास्त थ्रस्ट देणारे ‘पर्ल 10X इंजिन’ कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सामाविष्ट झाले आहे.

भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक- अमित कल्याणी म्हणाले की, “रोल्स-रॉइससोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा करार केवळ उत्पादन सातत्याचे प्रतीक नाही, तर तांत्रिक क्षमतांमधील प्रगतीचे आणि भविष्याभिमुख एरोस्पेस नवकल्पनांसाठीच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे द्योतक आहे.”

‘पर्ल 10X’ इंजिनाची वैशिष्ट्ये

‘पर्ल 10X’ हे रोल्स-रॉईसच्या पर्ल मालिकेतील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे, जे खास अल्ट्रा-लाँग-रेंज बिझनेस जेट्स (लांब पल्ल्याच्या व्यावसायिक विमानांसाठी) डिझाईन करण्यात आले आहे. या इंजिनमध्ये कार्यक्षम अ‍ॅडव्हान्स2 कोअर आणि उच्च कार्यक्षमतेची लो-प्रेशर सिस्टम एकत्रित सामाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे उत्तम थ्रस्ट आणि इंधन कार्यक्षमता प्राप्त होते.

भारत फोर्ज, ही सध्या पर्ल इंजिन मालिकेसाठी फॅन ब्लेड्स तयार करणारी एकमेव भारतीय कंपनी आहे. यावरून हे स्पष्ट होते की, भारताची जागतिक स्तरावरील विशेष एरोस्पेस घटक उत्पादन क्षमता झपाट्याने वाढत आहे.

ही भागीदारी, रोल्स-रॉईसच्या भारतामधील 90 वर्षांहून अधिक जुन्या वारशाला आणखी बळकट करते. सध्या 1,400 हून अधिक रोल्स-रॉइस इंजिन्स भारतीय सशस्त्र दलांच्या विविध विमानांमध्ये वापरात आहेत. तसेच, भारतभरातील 4,000 हून अधिक अभियंते, पुरवठादार आणि सेवा प्रदाते रोल्स-रॉईसच्या सशक्त परिसंस्थेशी जोडलेले आहेत.

ही नवीन भागीदारी, दोन्ही कंपन्यांच्या औद्योगिक संबंधांना अधिक दृढ करणाच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. या माध्यमातून नेक्स्ट-जनरेशन विमानांसाठी आवश्यक असलेल्या हाय-प्रिसीजन सोल्युशन्सचे सह-उत्पादन केले जाईल. जागतिक विमान उद्योग आता टिकाऊ आणि कार्यक्षम इंजिन तंत्रज्ञानाकडे वळत असल्याने, अशा प्रकारच्या भागीदाऱ्या एरोस्पेस उत्पादनाच्या भविष्याचे रूप बदलण्यात निर्णायक भूमिका बजावतील.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleOperation Sindoor: Redefining India’s Deterrence and the Nuclear Threshold
Next articleहॅकर्सचा विमानतळाच्या स्पीकर्सवर कब्जा; हमासची स्तुती, ट्रम्प यांच्यावर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here