थायलंड, मलेशिया, इंडोनेशियामध्ये पूराचा तडाखा, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू

0
थायलंड

थायलंडच्या दक्षिण भागातील आणि शेजारी राष्ट्र मलेशियामधील पुराचे पाणी कमी होऊ लागल्याने, अनेक दिवसांपासून अडकलेल्या लोकांचे स्थलांतर करण्याच्या आशा वाढल्या आहेत. अशातच, गुरुवारी थायलंडमधील बचावकर्त्यांनी या लोकांपर्यंत खाद्यपदार्थांचे पार्सल पोहचवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली. दरम्यान, इंडोनेशियातील चक्रीवादळाच्या तडाख्यात आतापर्यंत 28 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आठवडाभर सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरामुळे, थायलंडमध्ये किमान 33 आणि मलेशियामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक स्थलांतर केंद्रांमध्ये जमा झाले असून, काही लोक 2 मीटर (7 फूट) उंचीपर्यंतच्या पाण्याने वेढले गेल्यामुळे, त्यांचा इतरांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता.

थायलंडचे सरकारी प्रवक्ते सिरिपोंग अंगकासाकुलकीत, यांनी नेशन टीव्हीला सांगितले की, “ही वेळेविरुद्धची शर्यत आहे” “दूरसंचार सेवा खंडित झाल्यामुळे बचाव पथके सॅटेलाईट-इंटरनेटवर अवलंबून राहून, खाद्यपदार्थांचे पार्सल देण्यासाठी ड्रोन वापरण्याची तयारी करत आहेत,” असेही ते म्हणाले.

“आपल्याला त्यांना मदत करायलाच हवी,” असे म्हणत, गुरुवारी आणखीनही बऱ्याच लोकांना वाचवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मदतकार्याला वेग

पुराचे पाणी कमी होत असल्यामुळे, थायलंड आणि मलेशियातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना, मदत पोहोचवणे आणि लोकांना जलमय झालेल्या घरातून बाहेर काढणे काहीसे सुलभ झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पुरामुळे दक्षिण थायलंडमधील नऊ प्रांतांमध्ये जवळपास 3 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत. सर्वात जास्त प्रभावित झालेल्या हात याय शहरातून 3,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, ज्यात काही गंभीररित्या आजारी लोकांचा समावेश आहे, ज्यांना बुधवारी अंशतः पाण्याखाली गेलेल्या रुग्णालयातून हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले होते.

व्यावसायिक केंद्र असलेल्या या शहरात विक्रमी पाऊस झाला, जो शुक्रवारी 335 मिमी (13 इंच) इतका नोंदवला गेला. गेल्या 300 वर्षांतील एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस होता, ज्यामुळे हजारो लोक घराच्या छतावर अडकून पडले होते.

थायलंडने बुधवारी मदत कार्यांना गती दिली, जेव्हा लष्कराने अन्न, औषधे आणि लहान बोटी पोहोचवण्यासाठी किमान 20 हेलिकॉप्टर, विमाने आणि ट्रकचे ताफे तैनात केले आणि बोटी तसेच जेट-स्की देण्यासाठी सार्वजनिक आवाहनही केले.

देशाची एकमेव विमानवाहू नौका ‘चकरी नरूबेट’ देखील हवाई मदत, अन्न आणि औषधे पुरवण्याचे कार्य करत आहे.

उष्णकटिबंधीय चक्रीवादळ

इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रा प्रांतात, एका उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलन झाले, ज्यात किमान 28 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आपत्ती एजन्सीने सांगितले की, वीज खंडित झाल्यामुळे तसेच पूल आणि घरांचे नुकसान झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

कोम्पास टीव्हीने दाखवलेल्या दृश्यांमध्ये, टेकडीवरील जमीन घसरून घरांसमोर साचताना दिसत होती, तर 1 मीटर (3.5 फूट) पेक्षा जास्त उंच पाण्याचा प्रवाह येऊन मलबा आणि झाडांच्या फांद्या वाहून नेताना दिसत होता.

हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आग्नेय आशियातील सध्याच्या हवामानातील अत्यंत तीव्र घटना, या दोन सक्रिय प्रणालींच्या परस्परक्रियेमुळे उद्भवू शकतात: फिलिपिन्समध्ये आलेले कोटो चक्रीवादळ आणि मलाक्का सामुद्रधुनीत झालेली सेनयार चक्रीवादळाची असामान्य निर्मिती.

जागतिक तापमानवाढ उष्णकटिबंधीय वादळांना अधिक ऊर्जा देत असल्याने, ते वारंवार अशा तीव्र घटना घडवून आणू शकतात.

अलीकडील पूर हा, फिलिपाइन्स आणि व्हिएतनाममध्ये तडाखा दिलेल्या प्राणघातक चक्रीवादळे आणि मुसळधार मान्सून पावसाच्या मालिकेनंतर आला आहे, ज्यामुळे इतरही भागांत पूर वाढले आहेत.

स्थलांतर सुरू

मलेशियातील सात राज्यांमध्ये पूर आल्यामुळे, अअधिकाऱ्यांच्या मते 34,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून, सुमारे 500 मलेशियन नागरिक अजूनही थायलंडच्या हात याय या पर्यटन स्थळी अडकले आहेत.

छोट्या वाहनांना पूरपाण्यातून मार्ग काढणे शक्य नसल्याने, काही मलेशियन नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी कंटेनर लॉरीचा वापर करण्यात आला, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी गुरुवारी संसदेत दिली.

सर्वात लहान राज्य असलेल्या पर्लिसमधील, गॉन कासिम यांनी सांगितले की, ‘वाढलेल्या पाण्यामुळे त्या त्यांच्या भातशेतीच्या मध्यभागी असलेल्या घरात अडकल्या होत्या.’

“पाण्याचा प्रवाह समुद्रासारखा भासत होता,” असे या 73 वर्षीय स्थलांतरित महिलेने सांगितले.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत हात याय येथील बचाव पथके, अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत होती. बचाव कार्यासाठी अधिक बोटी आल्यानंतर, जोरदार प्रवाह आणि उथळ पाण्याचे आव्हान झेलत, त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.

70 वर्षीय क्रित्चावत सोथियानंथकुल, हे आपल्या घरात पाणी कसे वाढत गेले याचे वर्णन करत असताना, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते त्यांच्या कुत्र्यासोबत मदतीची वाट पाहत बसून होते.

“आम्हाला छतावरून खाली उतरून बोटीत बसवले, आणि नंतर एका स्पोर्ट्स हॉलमधील तात्पुरत्या निवारा केंद्रात नेले. मला माझ्या पाळीव कुत्र्याला उचलून ट्रकमध्ये चढवावे लागले,” असे वर्णन त्यांनी केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleनवीन इंजिन MRO सुविधेसह, भारताच्या एअरोस्पेस क्षेत्रात फ्रान्सचा विस्तार
Next articleभारताने लिबियात राजदूत पाठवून, तेल मुत्सद्देगिरीला दिली बळकटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here