Thursday, March 5, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi भारताच्या लष्करी आधुनिकीकरणावर बीजिंगची नजर; पीएलएचा IMDO वर भर

भारताच्या लष्करी आधुनिकीकरणावर बीजिंगची नजर; पीएलएचा IMDO वर भर

0

वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तणाव कायम असतानाच, नवी दिल्लीच्या अचूक युद्धतंत्रावर (प्रिसिजन वॉरफेअर) आणि बहु-आयामी (मल्टी-डोमेन) कारवायांच्या दिशेने होणाऱ्या स्थिर हालचालींवर बीजिंग बारकाईने लक्ष ठेवून आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (PLA) स्वतःच्या ‘इंटेलिजेंट गाइडेड मल्टी-डोमेन ऑपरेशन्स’ (IMDOs) या महत्त्वाकांक्षी संकल्पनेवर भर देत आहे.

‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ (ORF) द्वारे, अलीकडे आयोजित करण्यात आलेल्या एका संवाद सत्रातून हे व्यापक मूल्यमापन समोर आले आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे दिग्गज आणि चिनी तज्ज्ञांनी, आतापर्यंत पीएलएने आपल्या ‘इंटेलिजेंट वॉरफेअर’च्या सिद्धांताला प्रत्यक्ष युद्धक्षमतेत बदलण्यात किती प्रगती केली आहे आणि यात कुठे त्रुटी राहिल्या आहेत, याचा आढावा घेतला.

हा केवळ हिमालयीन सीमेवरील धोरणात्मक फायद्याचा प्रश्न नाही, तर चीन खरोखरच प्रदीर्घ संघर्षात वर्चस्व गाजवू शकेल, अशी जमीन, आकाश, समुद्र, अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रांसह एक ‘AI-सक्षम’ युद्ध प्रणाली समाकलित करू शकतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे.

पाश्चात्य MDO कडून – चीनच्या ‘इंटेलिजेंट गाइडेड’ मॉडेलकडे

विश्लेषणात्मक चौकट मांडताना, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीकांत कोंडापल्ली यांनी पाश्चात्य ‘मल्टी-डोमेन ऑपरेशन्स’ (MDO) आणि पीएलएचा विकसित होत असलेला दृष्टीकोन यातील स्पष्ट फरक अधोरेखित केला.

त्यांनी असा युक्तिवाद केला की, पाश्चात्य MDO मुख्यत्वे कार्यात्मक आणि धोरणात्मक स्तरावर विविध क्षेत्रांमधील कारवायांच्या समन्वयावर लक्ष केंद्रित करते. याउलट, चीनचा विचार अधिक सखोल असून, तो युद्धाकडे केवळ सैन्यदल किंवा प्लॅटफॉर्ममधील लढाई म्हणून न पाहता, संपूर्ण ‘प्रणालींमधील स्पर्धा’ म्हणून पाहतो.

बीजिंगच्या संकल्पनेनुसार, IMDO प्रणाली लष्करी शक्तीसोबत विश्लेषण, आकलन आणि निर्णयक्षमता यांचा मेळ घडवून आणते. चिनी कम्युनिस्ट पक्ष (CCP) केवळ सशस्त्र दलांनाच नव्हे, तर कायदेशीर चौकट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, जनमत, उद्योग आणि तंत्रज्ञान यांनाही त्यांच्या युद्ध उद्दिष्टांशी जोडण्याचा प्रयत्न करतो.

“हे केवळ युद्धभूमीवक शत्रूचा पराभव करण्यापुरते मर्यादित नाही, तर दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात चीनची स्वतःची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था घट्टपणे समन्वयित ठेवण्याबद्दल आहे,” असे कोंडापल्ली यांनी नमूद केले.

या आराखड्यात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे केवळ रणांगणावरील एक साधन नसून, संघर्षाच्या सतत बदलणाऱ्या पटलावर निर्णय घेण्याचे वर्चस्व टिकवून ठेवणारे एक साधन आहे, जिथे शांतता आणि युद्ध यातील सीमा जाणूनबुजून धूसर केली जाते.

यांत्रिकी युद्धाकडून – बौद्धिक संघर्षाकडे

कोंडापल्ली यांनी पीएलएच्या युद्धविषयक विचारप्रक्रियेचा तीन टप्प्यांत आढावा घेतला. पहिला टप्पा ‘यांत्रिकी युद्ध’ आहे, ज्यामध्ये रणगाडे, जहाजे आणि मोठ्या प्रमाणावरील गोळीबाराचे वर्चस्व होते. दुसरा टप्पा ‘इन्फोर्मेटाइज्ड’ युद्ध आहे, जिथे सेन्सर, नेटवर्क आणि डेटा लिंक्सच्या माध्यमातून सैन्याला एकत्र जोडले जाते.

तिसरा आणि अजूनही उदयाला येत असलेला टप्पा म्हणजे ‘इंटेलिजेंटाइज्ड’ युद्ध; जिथे यंत्रे एकमेकांशी संवाद साधतात, अल्गोरिदमवर आधारित निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान करतात आणि कमांडर सेन्सिंग, प्लॅनिंग आणि टार्गेट निश्चितीसाठी AI-सक्षम प्रणालींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात, जरी अंतिम नियंत्रण हा माणसांकडेच असते.

या उत्क्रांतीमुळे 1980 च्या दशकाच्या मध्यापासून, पीएलएमध्ये सुधारणा होत आहेत. पारंपारिक पायदळ तुकड्या कमी करण्यात आल्या आहेत, तर नौदल, वायुदल आणि रॉकेट फोर्सचा विस्तार शक्ती प्रदर्शनाचे मुख्य साधन म्हणून करण्यात आला आहे. पीएलए लष्कराची संख्या आता सुमारे 9 लाख असून, आता त्याचे संयुक्त, बहु-आयामी कारवायांसाठी डिझाइन केलेल्या ‘कम्बाइंड-आर्म्स ब्रिगेड’मध्ये पुनर्गठन करण्यात आले आहे.

या “इंटेलिजंट” बदलाचा मुख्य स्तंभ म्हणजे पीएलएचा AI-सक्षम ‘स्वार्म वॉरफेअर’ वरील भर, तसेच मोठ्या संख्येने नेटवर्क केलेले ड्रोन्स, मानवरहित पृष्ठभावरील आणि पाणबुडी वाहने आणि स्वतंत्र प्रणालीऐवजी सहकार्याने काम करणारे रोबोटिक ग्राउंड प्लॅटफॉर्म्स यावर दिलेला भर आहे. याचे उद्दिष्ट, शत्रूची संरक्षण यंत्रणा निकामी करणे, शत्रूची लक्ष्य करण्याची प्रक्रिया अवघड करणे आणि वैयक्तिक प्लॅटफॉर्म गमावल्यानंतरही एकूण प्रणालीची कार्यक्षमता टिकवून ठेवणे हे आहे.

अचूक युद्धतंत्र: लष्करी प्रणालींमधील स्पर्धा

रिअर ॲडमिरल सुदर्शन श्रीखंडे (निवृत्त) यांनी यावर भर दिला की, चीनच्या लष्करी लेखनात भविष्यातील संघर्षाचे वर्णन “मल्टी-डोमेन प्रिसिजन वॉरफेअर” असे करण्यात आले आहे, जे वैयक्तिक सेवांऐवजी एकात्मिक प्रणालींमधील संघर्ष दर्शवते.

या मॉडेलमध्ये, PLA जमीन, समुद्र, आकाश, अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधील कमकुवत दुवे वेगाने ओळखण्यासाठी आणि अचूक हल्ले करण्यासाठी सर्व क्षेत्रांमधील C4ISR नेटवर्क एकत्र करण्याचा प्रयत्न करते. त्यांनी नमूद केले आहे की, पीएलए नौदल आधीच या ‘सिस्टम्स-ऑफ-सिस्टम्स’ दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, ज्याला निरंतर सिद्धांतांचा विकास आणि व्यापक सरावांचा आधार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, हा बौद्धिक प्रयत्न केवळ कागदावर नाही. बीजिंगने सिद्धांतांचे कार्यात्मक संकल्पनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून, सिद्धांतापासून ते युद्धक्षमतेपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी सराव आणि सिम्युलेशनद्वारे ‘इंटेलिजेंट मल्टी-डोमेन’ कल्पनांची चाचणी घेतली आहे.

माहिती क्षेत्र आणि पीएलएचे पुनर्गठन

तक्षशिला संस्थेच्या अनुष्का सक्सेना यांनी चीनच्या दृष्टिकोनातील ‘माहिती पैलूंवर’ लक्ष केंद्रित केले. त्यांनी युक्तिवाद केला की, पीएलएसाठी माहिती कारवाया या केवळ संदेशवहन किंवा प्रचाराच्या पलीकडे आहेत. यामध्ये तांत्रिक आणि कार्यात्मक अशा दोन्ही स्तरांवर प्रणालीगत फायदे मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा संकलन, प्रक्रिया आणि वापर समाविष्ट आहे.

त्यांनी याचा संबंध, एप्रिल 2024 मधील पीएलएच्या स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सच्या पुनर्गठनाशी जोडला, ज्याचे एरोस्पेस फोर्स, सायबरस्पेस फोर्स आणि इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स या तीन नवीन संस्थांमध्ये रूपांतर करण्यात आले असून, त्या सर्व सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या अंतर्गत आहेत. जॉइंट लॉजिस्टिक सपोर्ट फोर्ससह, हे आता पीएलएचे चार प्रमुख “विभाग” बनले आहेत.

ग्रुप आर्मी स्तरापर्यंत समाविष्ट केलेल्या माहिती समर्थन ब्रिगेडचे उद्दिष्ट, खऱ्या अर्थाने ‘नेटवर्क-केंद्रित’ युनिट्स तयार करणे हे आहे. सक्सेना यांनी नमूद केले की, “पीएलए रशिया-युक्रेन युद्धातील धड्यांपासून प्रेरित होऊन ट्रोजन-शैलीतील सायबर साधने, ऑफ-नेटवर्क संरक्षण प्रणाली आणि छलावरण (केमोफ्लाज) तंत्रांचाही प्रयोग करत आहे, जे शिकण्याच्या आणि जुळवून घेण्याच्या त्यांच्या निरंतर प्रक्रियेचे प्रतिबिंब आहे.”

भारत, LAC आणि बीजिंगचे गणित

या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्करी क्षमतेच्या चिनी मूल्यमापनासाठी एलएसी (LAC) हे एक महत्त्वाचे चाचणी क्षेत्र राहिले आहे. कोंडापल्ली यांनी निरीक्षण नोंदवले की, चीनने पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक सारख्या काही संघर्ष क्षेत्रांतून अंशतः माघार घेतली असली तरी, तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात आहे आणि अनेक वादाचे मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत.

या हालचाली मूलभूत बदलाऐवजी केवळ तात्पुरत्या विश्वास वाढवणाऱ्या उपाययोजना असू शकतात, असे त्यांनी सुचवले. सीमाभाग अजूनही मोठ्या प्रमाणावर लष्करी छावणीत रूपांतरित आहे आणि बीजिंग भारताच्या अचूक हल्ला क्षमता, संयुक्तता आणि बहु-आयामी एकात्मतेमधील प्रगतीकडे बारकाईने पाहत आहे.

पीएलएने ‘इंटेलिजेंटाइज्ड’ कारवायांच्या दिशेने कितीही महत्त्वाकांक्षी झेप घेतली असली, तरी कोंडापल्ली यांनी सावधानतेचा इशारा देत म्हटले की, “चीनचे हे परिवर्तन अजूनही अपूर्ण असून, एकत्रीकरण, संघटनात्मक अडथळे आणि सिद्धांताचे रणांगणावर सुरळीत अंमलबजावणीत रूपांतर करणे, ही मोठी आव्हाने अद्याप कायम आहेत.”

भारतासाठी याचा अर्थ स्पष्ट आहे की: ‘इंटेलिजेंट वॉरफेअर’वर पीएलएची वक्तव्ये प्रभावी वाटत असली, तरी LAC वरील आणि त्यापलीकडील संघर्ष, दोन्ही देश आपल्या संकल्पनांना किती प्रभावीपणे लवचिक आणि वास्तविक लष्करी शक्तीमध्ये रूपांतरित करतो, यावर अवलंबून असेल.

मूळ लेखिका- रेशम भंबानी

+ posts
Previous articleपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 17 वर्षांचा तुरुंगवास
Next articleभारतासोबतचे लष्करी, अण्विक, सागरी संबंध दृढ करणारा युएस संरक्षण कायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here