इराणमधील आंदोलने सुरूच ठेवा; ट्रम्प यांचे चिथवणीखोर आवाहन

0
ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणी नागरिकांना त्यांच्या देशात सुरू असलेली धार्मिक राज्यकर्त्यांविरुद्धची आंदोलने तशीच सुरू ठेवण्याचे आवाहन केले असून, “लवकरच मदत पोहचेल” असे आश्वासन दिले आहे. इराण सरकारने, गेल्या काही वर्षांतील या सर्वात मोठ्या आंदोलनांविरुद्ध आपली कारवाई अधिक तीव्र केली असताना, ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

इराण सरकारने तात्काळ, ट्रम्प यांच्यावर अस्थिरता निर्माण केल्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “इराणी देशभक्तांनो, आंदोलने अशीच सुरू ठेवा, तुमच्या संस्थांचा ताबा घ्या, मदत लवकरच पोहोचत आहे.” मात्र, इथे ते नेमत्या कोणत्या प्रकारच्या मदतीचा संदर्भ देत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आंदोलकांची “अमानुष हत्या” थांबत नाही तोपर्यंत, इराणी अधिकाऱ्यांसोबतच्या सर्व बैठका रद्द केल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले आहे, तसेच नागरिकांना “हत्या आणि अत्याचार करणाऱ्यांची नावे लक्षात ठेवा,” असे आवाहनही केले.

कारवाईदरम्यान मृतांचा आकडा वाढला

एका इराणी अधिकाऱ्याने आतापर्यंत सुमारे 2,000 लोकांचा मृत्यू झाल्याचा खुलासा केला असून, प्रथमच मृतांचा आकडा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकास्थित ‘ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी’ने (HRANA) दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी 1,850 जण हे आंदोलक होते, तर 16,784 लोकांना ताब्यात घेण्यात आले. हा आकडा आधीच्या आकडेवारीपेक्षा कित्येक पटीने वाढला आहे.

“मदत लवकरच पोहोचत आहे” या वक्तव्याबाबत ट्रम्प यांना विचारले असता, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “याचा अंदाज लावावा तुम्हालाच लागेल.” लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डेट्रॉईटवरून परतल्यावर ट्रम्प म्हणाले की, “हत्त्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, मात्र अद्याप त्याविषयी आम्हाला निश्चित माहिती नाही. संपूर्ण अहवाल मिळाल्यावर आम्ही त्यानुसार कारवाई करू.”

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सर्व अमेरिकन नागरिकांना तातडीने इराण सोडण्याचे आवाहन केले असून, तुर्की किंवा आर्मेनियामार्गे बाहेर पडण्याची शिफारस केली आहे.

तेहरान आणि मित्रराष्ट्रांकडून वॉशिंग्टनचा निषेध

इराणचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत अमीर सईद इरवानी, यांनी ट्रम्प यांच्यावर “हिंसाचाराला प्रोत्साहन” दिल्याचा आणि “इराणचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका” निर्माण केल्याचा आरोप केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले की, “निष्पाप लोकांच्या मृत्यूंसाठी अमेरिका आणि इस्रायल निर्विवादपणे आणि कायदेशीररित्या जबाबदार आहेत.”

रशियानेही इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये “विध्वंसक बाह्य हस्तक्षेप” झाल्याचा आरोप करत निषेध नोंदवला आहे, आणि अमेरिकेची कोणतीही लष्करी कारवाई संपूर्ण प्रदेशात “विनाशकारी परिणाम” घडवू शकते, असा इशारा दिला आहे.

वाढत्या तणावाच्या दरम्यानही, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराक्ची यांनी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी संवाद सुरू असल्याची पुष्टी केली असून, तेहरान वॉशिंग्टनने मांडलेल्या प्रस्तावांचे पुनरावलोकन करत असल्याचे सांगितले.

आंदोलकांना फाशी दिल्यास कडक कारवाई करू: ट्रम्प यांचा इशारा

सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इशारा दिला की, “इराणने जर आंदोलकांना फाशी देण्यास सुरुवात केली, तर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.” नॉर्वेस्थित ‘इराण ह्युमन राइट्स सोसायटी’ने नमूद केले आहे की, इराणच्या तुरुंगात फाशी देणे ही अजूनही सामान्य बाब आहे. कुर्दिश मानवाधिकार गट ‘हेंगाव’ने दिलेल्या अहवालानुसार, करज येथील आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय इरफान सुलतानीला फाशी मिळण्याची शक्यता आहे, मात्र रॉयटर्सने अद्याप या अहवालाची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.

इराणमधील इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आल्यामुळे, माहितीचा ओघ अजूनही विस्कळीत आहे, दरम्यान फोन सेवा पूर्ववत झाल्याचे वृत्त आहे. संयुक्त राष्ट्रांनी ऑनलाइन निर्बंध कायम असल्याची पुष्टी केली आहे, तर अमेरिकास्थित ‘होलिस्टिक रेझिलिअन्स’ने म्हटले आहे की, एलोन मस्क यांची ‘स्टारलिंक’ सेवा आता इराणमध्ये मुक्तपणे उपलब्ध आहे.

इराणच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान

आर्थिक टंचाई आणि कोसळते चलन यामुळे भडकलेली ही अराजकता, किमान गेल्या तीन वर्षांतील इराणच्या नेतृत्वासमोरील सर्वात गंभीर आव्हान आहे. ही आंदोलने गेल्या वर्षी झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर आणि इराणशी व्यापार करणाऱ्या देशांच्या आयातीवर 25% शुल्क लादल्यानंतर, अमेरिकेने आपला दबाव पुन्हा वाढवला आहे. इराणी तेलाचा प्रमुख खरेदीदार असलेल्या चीनने या निर्णयावर टीका केली आहे.

युरोपीय देशांनीही, मृतांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली असून ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीने निषेध नोंदवण्यासाठी इराणच्या राजदूतांना पाचारण केले आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयेन यांनी वाढत्या मृतांच्या संख्येचे वर्णन “भयानक” असे केले आहे.

जर्मन चॅन्सेलर फ्रीड्रिच मर्झ यांनी मत व्यक्त केले की इराणचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी टिप्पणी केली की, “जर सरकारला हिंसाचाराच्या जोरावर सत्ता टिकवून ठेवावी लागत असेल, तर त्यांचा अंत जवळ आला आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पारंपरिक युद्धक्षेत्राचा विस्तार: लष्करप्रमुख
Next articleपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते BRICS 2026 च्या लोगोचे अनावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here