बांगलादेश निवडणुका: बीएनपी आघाडीवर, पण जमात पुन्हा सक्रिय

0
बीएनपी

बांगलादेशमधून आलेल्या बातम्यांनुसार, 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये बीएनपी अर्थात बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आघाडीवर आहे. मात्र 12 कोटी मतदारांच्या या देशात आतापर्यंत निवडणूक राजकारणाच्या परिघावर राहिलेल्या जमात-ए-इस्लामी या उजव्या विचारसरणीच्या, धर्मावर आधारित राजकीय संघटनेच्या पुनरुत्थानानेच बातम्यांमध्ये प्रमुख स्थान पटकावले आहे.

पूर्वी (2001-06 या काळात)  भागीदार असलेल्या बीएनपी आणि जमातच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यात या निवडणुकांमध्ये थेट लढत होत आहे. याचे कारण म्हणजे देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या अवामी लीगची अनुपस्थिती. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या उठावानंतर, अवामी लीगच्या नेत्या आणि बांगलादेशच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडल्यानंतर, सध्याच्या हंगामी प्रशासनाने अवामी लीगवर बंदी घातली आहे.

जमात, ही एक कार्यकर्त्यांवर आधारित, अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे, जी आतापर्यंत 1971 मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाला विरोध करण्यासाठी आणि याच काळात पाकिस्तानी सैन्याने सामान्य नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईदरम्यान त्यांना सहकार्य केल्याबद्दल अधिक ओळखली जात होती.

आता पंचावन्न वर्षांनंतर, अवामी लीगने गेल्या 15 वर्षांत केलेल्या अनेक चुका तर दुसरीकडे बांगलादेशातील सर्वाधिक आणि अस्वस्थ तरुण लोकसंख्येला सुरक्षित आणि समृद्ध भविष्य देण्याची आपली क्षमता याबद्दल पटवून देण्यात बीएनपीला आलेले अपयश यामुळे, बीएनपीसारख्या अधिक मध्यममार्गी आणि दीर्घकाळ प्रस्थापित राजकीय शक्तीला थेट पर्याय नसला तरी, एक व्यवहार्य दुसरी शक्ती म्हणून स्वतःची प्रतिमा यशस्वीपणे पुन्हा निर्माण करण्यात जमात यशस्वी झाला आहे.

या आठवड्यात ढाकामधील विविध मतकर्त्यांशी झालेल्या प्रदीर्घ संभाषणातून मला असे समजले की, जमातने आपल्या आकर्षक प्रचारमोहिमेद्वारे, घरोघरी जाऊन केलेल्या संपर्काद्वारे आणि प्रभावी मांडणीद्वारे तरुण पिढीच्या मनात स्थान मिळवले आहे. यामुळे अनुभवी आणि धर्मनिरपेक्ष बांगलादेशींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, जे जमातने प्रचार केलेल्या आणि आचरणात आणलेल्या इस्लामी तत्त्वांशी कधीही सहमत नव्हते.

2018 ते 2024 दरम्यान नोंदणी रद्द झालेला आणि थोडक्यात सांगायचे तर प्रतिबंधित असलेला जमात पक्ष, 5 ऑगस्ट 2024 च्या उठावानंतर लगेचच आपल्या पुनरागमनाच्या कामाला लागला. त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थी, महिला आणि गरिबांपर्यंत पोहोचून वैद्यकीय शिबिरे आयोजित केली, पूरग्रस्तांना मदत केली आणि तरुणांना एका नव्या प्रारंभाबद्दल पटवून दिले.

मतदारांनी आपल्याला एक संधी द्यावी असे ते आवाहन करत आहेत. तुम्ही इतर पक्षांचा अनुभव घेतला आहे, त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आणि  गैरकारभार अनुभवला आहे, असे जमातचे नेते सभांमधून जाहीरपणे सांगत आहेत. “आम्ही तुम्हाला एक स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख सरकार देऊ. आमचा घराणेशाहीवरील राजकारणावर विश्वास नाही, आणि ही जमातची  सध्या भूमिका आहे,” असे ढाक्यातील एका ज्येष्ठ राजकीय निरीक्षकाने नमूद केले.

तळागाळातील सुसंघटित आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी देशभरातील जनतेपर्यंत एकसमान संदेश पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे जमात एक बलाढ्य शक्ती बनली आहे.

निवडणूक शक्ती म्हणून जमातच्या पुनरागमनाचा एक संकेत गेल्या वर्षी मिळाला, जेव्हा तिच्या युवा शाखेने ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला. हे विद्यापीठ देशाच्या राजकीय वातावरणाचे सूचक मानले जाते. अर्थात, आपल्या भूतकाळातील पापांची जबाबदारीही त्यांना स्वीकारावी लागेल. वारंवार आवाहन करूनही, जमातने 1971 च्या नरसंहारातील आपल्या भूमिकेबद्दल बिनशर्त माफी मागितलेली नाही, जरी काही पक्षनेत्यांनी भूतकाळातील कोणत्याही चुकांसाठी माफी मागत असल्याचे म्हटले असले तरी.

शिवाय, गेल्या 30 वर्षांत दोन कणखर महिला पंतप्रधान पाहिलेल्या देशात, महिलांना नेतृत्वाची भूमिका नाकारण्याची जमातची भूमिका राजकीयदृष्ट्या अयोग्य मानली जाते. असे असूनही, तिचे ग्रामीण भागात असणारे जाळे आणि महिला तसेच वंचितांपर्यंत पद्धतशीरपणे पोहोचण्याची रणनीती पूर्वीपेक्षा अधिक यशस्वी होत आहे, ज्यामुळे हा पक्ष एक गंभीर आव्हान बनला आहे.

याची तुलना सत्तेचा प्रमुख दावेदार असलेल्या बीएनपीशी केली तर डिसेंबर 2025 मध्ये आपल्या आईच्या निधनानंतर आता राज्याभिषेकाच्या प्रतीक्षेत असलेले, पक्षाचे वारसदार तारिक रहमान, बांगलादेशच्या लोकांसाठी बीएनपी हा सर्वोत्तम पर्याय आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि जनतेला सुरक्षा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देत आहेत.

“जो कोणी कायदा मोडेल किंवा भ्रष्टाचाराच्या कारणास्तव विकास योजनांमध्ये अडथळा निर्माण करेल, त्याला सोडणार नाही,” असे ते चट्टोग्राम (चितगाव) येथील एका सभेत म्हणाले. हे तेच शहर आहे जिथे त्यांचे वडील, जनरल झियाउर रहमान, जे त्यावेळी पाकिस्तानी सैन्यात मेजर होते, त्यांनी 1971 मध्ये मुक्तियुद्ध सुरू होण्यापूर्वीच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची पहिली घोषणा केली होती.

आता बीएनपीचे अध्यक्ष असलेले रहमान, गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी ढाका येथे परत येईपर्यंत 17 वर्षे लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहिले होते.  त्यांचे ढाका येथे परत आल्यानंतर जोरदार स्वागत झाले. त्यांच्या सभांमध्ये दिसणारी मोठी गर्दी काही प्रमाणात उत्सुकतेमुळे आणि काही प्रमाणात त्यांनी दिलेल्या ‘न्यू डील’च्या आश्वासनामुळे आहे.

ढाका ना पिंडीचा (रावळपिंडी, पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय) ना नवी दिल्लीचा पक्ष घेईल, असे ते लोकांना सांगत असतात आणि एका संतुलित परराष्ट्र धोरणाबद्दल बोलत असतात, असे एका अन्य जाणकार विश्लेषकाने निरीक्षण नोंदवले. बहुतेक व्यावसायिक नेते आणि सामाजिक निरीक्षक अशी आशा बाळगून आहेत की, त्यांच्या जाहीर सभांमधील प्रचंड गर्दी रहमान यांच्या पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करेल.

रहमान यांच्या परतण्यापूर्वी, एका थकलेल्या आणि निरुत्साही जुन्या फळीद्वारे चालवला जाणारा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएनपीला देशभरातील विविध मतदारसंघांमध्ये अंतर्गत बंडाळीचाही सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नेतृत्वाची ऊर्जा असंतुष्ट इच्छुकांना आवर घालण्यात खर्च होत आहे. पक्षाला अशीही आशा आहे की, अवामी लीगच्या समर्थकांचा एक मोठा वर्ग आपोआप बीएनपीला मतदान करेल, कारण ते जमात-ए-इस्लामीला एक नको असलेला पर्याय मानतात.

अर्थात या सिद्धांताची दुसरी बाजूही आहे. ऑगस्ट 2024 च्या उठावानंतर, बीएनपीच्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांपासून खंडणी आणि राजकीय हिंसाचाराच्या आरोपाखाली अवामी लीगच्या ज्ञात समर्थकांविरुद्ध अनेक खटले दाखल केले आहेत. आता, जमात-ए-इस्लामी सत्तेवर आल्यास छळाचा सामना करणाऱ्या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे, ज्यामुळे अवामी लीगच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अवामी लीगचे कट्टर समर्थक कदाचित अशा उमेदवारांना पाठिंबा देतील, ज्यांना निवडणुकीनंतर संरक्षण ‘मिळवण्यासाठी’ त्यांच्या पक्षाशी संबंधित नसतानाही जिंकण्याची अधिक चांगली संधी आहे असे दिसते.
निवडणुकीला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना चुरस वाढत आहे, परंतु मला एक समान भावना ऐकायला मिळाली ती म्हणजे, पहिल्यांदाच बहुसंख्य मतदार आपले मत मुक्तपणे देऊ शकतील. याचा अर्थ असा की, मागील तीन निवडणुकांमध्ये हेराफेरी झाली होती आणि ती अन्यायकारक होती. हा एक असा आरोप आहे जो अवामी लीग अजूनही पुसून टाकू शकलेली नाही.

(भाग 2 – परकीय शक्तींचा हस्तक्षेप)

नितीन अ. गोखले

+ posts
Previous articleचीनसोबत नव्याने संबंध प्रस्थापित केल्यामुळे ट्रम्प यांचा स्टारमर यांना इशारा
Next articleमुदतपूर्व निवडणुकीत ताकाइची जिंकल्या तर चीनची खेळी काय असेल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here