संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 16 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीत स्वदेशी बनावटीची उपकरणे आणि प्रणाली भारतीय लष्कराला सुपूर्द केली. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर होत असलेल्या प्रदीर्घ संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लष्कराची तयारी वाढवण्याच्या दृष्टीने या उपकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सीमारेषेवर तैनात जवान कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम झाले आहेत.
यात, एफ आय एन एस ए एस, मानव-रोधी आधुनिक भूसुरुंग ‘निपुण’, खडकाळ पृष्ठभागासाठी वाढीव क्षमता असलेली स्वयंचलित संवाद प्रणाली, रणगाड्यांमध्ये उच्च श्रेणीची दृष्टी प्रणाली, थर्मल इमेजर, अत्याधुनिक वेगवान पायदळ, सुरक्षा वाहने आणि हल्लेखोर बोटीचा यात समावेश आहे. यापैकी भारतीय खासगी क्षेत्रातील उद्योगाने उत्पादित केलेली सुमारे 7 लाख उत्पादने लष्कराला पुरविली जातील.
ही उपकरण प्रणाली भारतीय लष्कर, संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तसेच उद्योगजगत यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नवीन नौकांवर – लँडिंग क्राफ्ट असॉल्ट (LCA) – पाळत ठेवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असून या नौका पूर्व लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवरावर कडक नजर ठेवण्यासाठी लवकरच तैनात करण्यात येणार आहेत. मागील वर्षी, लष्कराने 12 LCA नौकांची मागणी केली होती, ज्यामुळे त्यांच्या सध्याच्या जहाजांच्या ताफ्याला बळकटी मिळेल. “एलसीए अधिक बहुआयामी आहे आणि प्रक्षेपण, वेग आणि क्षमतेच्या मर्यादांवर मात केली आहे. पूर्व लडाखमधील पाण्याच्या अडथळ्यांवर काम करण्याची क्षमता वाढवली आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ही उपकरणे आणि प्रणालीमुळे भारतीय लष्कराची युद्धजन्य सुसज्जता वाढीस लागेल तसंच कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. पायदळ सुरक्षा वेगवान वाहने आणि आक्रमण करू शकणाऱ्या नौका सीमेवर तैनात सैन्याला कोणत्याही आव्हानांचा योग्य प्रकारे सामना करण्यासाठी सक्षम बनवतील, तसेच यामुळे पूर्व लडाखमध्ये तैनात सैन्याची गतिशीलता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देशाच्या वाढत्या स्वयंपूर्ण क्षमतेचे हे लखलखते उदाहरण असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. खासगी क्षेत्र आणि इतर संस्थांच्या माध्यमातून संरक्षण दलाच्या पायाभूत सुविधाच्या गरजांमध्ये बदलत्या वेळेनुसार वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यकालीन आव्हानांचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे आवश्यक आहे. संरक्षण दलांनी अलौकिक कामगिरी करत राष्ट्र उभारणीसाठी कायम समर्पित राहिले पाहिजे, असेही संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.