युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दमित्रो कुलेबा यांचे भारतात आगमन झाले आहे. गेल्या आठवड्यात रशियातील मॉस्को येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप रशियाकडून वारंवार केला जात असताना हा दौरा होण्याची ही योग्य वेळ आहे का? असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला आहे.
एक वरिष्ठ माजी डिप्लोमॅट स्ट्रॅटन्यूज ग्लोबलशी बोलताना म्हणाले की, “दौरा स्थगित करणे योग्य ठरले असते मात्र त्यामुळे नवीनच वाद निर्माण झाला असता, कारण मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यात युक्रेनचा सहभाग असू शकतो हे आपणही मान्य केले आहे असा त्यातून अर्थ निघेल. दौरा पुढे ढकलणे हा सर्वोत्तम उपाय ठरेल पण त्यासाठी द्यावे लागणारे कारण वाजवी असायला हवे.
आणखी एक माजी डिप्लोमॅट म्हणाले की, “दौरा रद्द करणे किंवा नव्या तारखा जाहीर केल्याने आणखी गुंतागुंत निर्माण झाली असती ती म्हणजे आपण एक बाजू घेत आहोत हे सूचित करणे.”
कुलेबा यांच्या या भेटीबद्दल रशियाला काय वाटत असेल? भारत आणि युक्रेन यांच्यात होणारा हा काही पहिलाच राजनैतिक संवाद नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये युक्रेनचे उपविदेश मंत्री एमीन झपारोवा दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्यावेळी झपारोव अधिकृतपणे भारतीय जागतिक व्यवहार परिषदेच्या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तरी, त्यांनी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्री यांची भेट घेतल्याने तो दौरा पुरेसा “अधिकृत” ठरला.
मात्र जर एखाद्याला यापेक्षाही आधीच्या इतिहासात डोकावून बघायचे असेल तर सप्टेंबर 2022 मध्ये उझबेकिस्तानमधील एससीओ शिखर परिषदेत, जिथे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सांगितले होते, “आजचे युग युद्धाचे नाही.” हा संदर्भ सहज मिळेल.
गेल्याच आठवड्यात जेव्हा मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बोलले, त्याच दिवशी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे त्यांच्या निवडणुकीतल्या विजयाबद्दल आणि विक्रमी सहाव्या कार्यकाळासाठी वैयक्तिकरित्या फोनवरून अभिनंदन केले.
त्यावेळी मोदींनी मांडलेला एक मुद्दा दोन्ही नेत्यांसाठी समान होताः झेलेन्स्की यांना त्यांनी “यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आवाहन केले.”
तर पुतीन यांच्याशी बोलताना त्यांनी “यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारत सातत्याने उभा असेल,” याचा पुनरुच्चार केला.
“दोन्ही देशांमधील सर्व समस्यांवर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे. शांततापूर्ण तोडग्याला पाठिंबा देण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत राहील,” असे आश्वासन मोदींनी झेलेन्स्की यांना दिले.
भारत रशिया आणि युक्रेन यांच्यात मध्यस्थी करत आहे का? अर्थात साऊथ ब्लॉककडून हा शब्द कधीही वापरला गेला नसला तरी घटनाक्रम आणि अधिकृत घोषणा यातून तसे संकेत मिळू शकतात. मध्यस्थावर दोन्ही बाजूंनी विश्वास ठेवणे आवश्यक आहे. अमेरिका किंवा युरोप हे दोन्ही देश पुतीन यांच्यासोबत चर्चा करू शकत नाहीत. चीन खूप प्रयत्न करत आहे परंतु त्यात कितपत यश मिळत आहे हे स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे रशियाचा भारतावर विश्वास आहे. युक्रेन रशियाइतके विश्वास ठेवत नसले तरी कीव साऊथ ब्लॉकमध्ये स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. गुरुवारी दिल्लीत येण्यापूर्वी कुलेब यांचे वक्तव्य लक्षात घ्याः “युक्रेन भारताकडे एक शक्तिशाली आंतरराष्ट्रीय आवाज असलेली एक महत्त्वाची जागतिक शक्ती म्हणून पाहतो.”
सूर्या गंगाधरन