हमास प्रवक्त्याची मागणी: इस्त्राईलला राजी करण्याची जबाबदरी अमेरिकेने घ्यावी
दि. ११ जून: इस्त्राईल आणि हमास या दहशतवादी संघटनेदरम्यान गाझापट्टीत सुरु असलेला रक्तरंजित संघर्ष थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्राने (युनायटेड नेशन्स) केलेल्या युद्धबंदीच्या ठरावाला हमासने होकार दिला आहे. मात्र, इस्त्राईलकडून ही युद्धबंदी पाळली जाईल, याची जबाबदारी अमेरिकेने घ्यावी, असे आवाहन हमासचा प्रवक्ता अबू झुहरी याने केले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने दिलेला युद्धबंदी ठराव आणि त्यातील युद्धबंदी, इस्त्राईलच्या सैन्याची माघार व युद्धकैद्यांच्या बदल्यात ओलिसांची सुटका करणे या कलामांना आमची मान्यता आहे. हा ठराव तातडीने लागू व्हावा यासाठी इस्त्राईलला राजी करण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. त्यासाठी अमेरिकी प्रशासनाला आपले कौशल्य पणाला लावावे लागेल, असे झुहरी म्हणाला. इस्त्राईल आणि हमासच्या संघर्षात पोळून निघालेल्या गाझापट्टीत युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने जोराचे प्रयत्न सरू केले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी यासाठी सोमवारी इजिप्तला भेट दिली होती. गाझामधील संघर्ष शेजारील लेबनॉनमध्ये पोहोचू नये, यासाठीही अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर हल्ला करून १२०० ज्यू नागरिकांची कत्तल आणि २५० अपहरण केल्यानंतर इस्त्राईलने हमासविरोधात गाझापट्टीत आघाडी उघडली होती. या संघर्षात आत्तापर्यंत ३७ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला असून, काही लाख नागरिक जखमी आणि विस्थापित झाले आहे. अशा परिस्थितीतही या संघर्षाची धग दिवसेंदिवस वाढतच आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांनी इस्त्राईलला धमकाविणे सुरु केल्यामुळे त्याचा फटका आता शेजारील लेबनॉनमध्येही बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ब्लिंकेन यांनी युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी तीन टप्प्यातील युद्धबंदी प्रस्ताव ३१ मे रोजी मांडला होता. त्यानुसार या भागातील संघर्षातून कायमचा मार्ग काढणे, इस्त्राईली ओलिसांची तातडीने सुटका करणे व पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करणे आणि गाझाची पुनर्बांधणी करणे, याचा त्यात समावेश होता.
हमास आणि इस्त्राईलच्या संघर्षात आता लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांनी उडी घेतली आहे. इस्त्राईलच्या संरक्षण दलांबरोबर त्यांच्या चकमकी उडत आहेत. त्यात सीमेच्या दोन्ही बाजूंनी बळींची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उभय देशांत संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता अमेरिकेकडून युद्धबंदीसाठी निकराचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)