ऑपरेशन ब्रास्टॅक्स आणि ऑपरेशन पवन या भारतीय सैन्याच्या दोन महत्त्वपूर्ण कामगिऱ्यांमध्ये जनरल के. सुंदरजी हे प्रमुख होते. ऑपरेशन ब्रास्टॅक्स आपल्या देशाच्या पश्चिम सीमेवर झाले होते, आणि कदाचित भारतीय लष्कराने आतापर्यंत हाती घेतलेल्या कामगिऱ्यांपैकी लष्कराच्या क्षमतेची सर्वाधिक परीक्षा बघणारी ती कामगिरी होती. भारतीय लष्कराने श्रीलंकेतील सामुद्रधुनी ओलांडून ऑपरेशन पवन सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील के. सुंदरजी हॉट-सीटवर होते.
भारतातील अग्रगण्य लष्करी विचारवंतांपैकी एक असलेल्या जनरल के. सुंदरजी यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे भारतीय लष्कराने चौथे जनरल सुंदरजी स्मृती व्याख्यान आयोजित केले होते. मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल (MIC&S) आणि सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज (CLAWS) यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला तिन्ही सशस्त्र दलांतील सेवारत आणि निवृत्त अधिकारी, साहित्यिक आणि विविध विचारवंत उपस्थित होते. या व्याख्यानात 13 वे लष्करप्रमुख – ज्यांची ओळख गतिशील आणि दूरदर्शी म्हणून आहे अशा – जनरल के. सुंदरजी यांचे स्मरण करण्यात आले. ‘यांत्रिक पायदळ रेजिमेंटचे जनक’ असेही त्यांना म्हटले जाते.
लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल मनोज पांडे यांनी यावेळी केलेल्या मुख्य भाषणात जनरल सुंदरजी यांची दूरदृष्टी अधोरेखित केली. युद्धभूमीचे डिजिटायझेशन, माहिती युद्ध, तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक धोरणे आणि सैन्याची रचना या क्षेत्रातील जनरल सुंदरजींच्या दूरदृष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला, जे त्यांच्या ‘व्हिजन 2100’ या कार्यात प्रतिबिंबित होते.
परिवर्तनासंदर्भात जनरल सुंदरजी यांचे विचार अधोरेखित करताना लष्करप्रमुखांनी ठामपणे सांगितले की, “भारतीय सैन्य परिवर्तनाच्या अनिवार्यतेमुळेच टिकून आहे आणि केवळ बदलायचे म्हणून नाही तर चांगल्या गतीने बदलायचे आहे त्यासाठी पुरोगामी दृष्टीकोन आवश्यक आहे. भारतीय लष्कराचे आम्ही दोन वर्षांपूर्वी अंमलात आणलेले सर्वांगीण परिवर्तन, हे आधुनिक, चपळ, अनुकूल, तंत्रज्ञान सक्षम आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी सज्ज करण्याच्या, सैन्याला नवा आकार देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
प्रख्यात वक्ते, जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी जनरल सुंदरजी यांच्यासोबतचे त्यांचे अनुभव सांगताना ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची गरज’ या विषयावर आपले विचारही व्यक्त केले, तर माजी लष्कर उपप्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे (एनएसएबी) सदस्य लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांनी ‘भारताच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरणः जनरल के. सुंदरजी यांच्याकडून धडे’ या विषयावर व्याख्यान दिले. या माहितीपूर्ण चर्चेनंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला.
एक कुशल सैनिक आणि एक दूरदर्शी योद्धा असणारे जनरल सुंदरजी हे त्यांच्या सखोल अंतर्दृष्टी आणि भविष्यातील युद्ध आणि सुरक्षा पॅराडाइम्समधील धोरणात्मक दूरदृष्टीसाठी ओळखले जातात. ‘ऑलिव्ह ग्रीन्स’ मध्ये असणाऱ्या युनिफॉर्मशी संबंधित त्यांच्या विशिष्ट सेवेच्या पलीकडेचे त्यांचे योगदान आहे. माजी लष्करप्रमुखांच्या स्मरणार्थ असणारे हे व्याख्यान आजच्या काळाला अतिशय साजेसे होते.
टीम भारतशक्ती