भारत आणि चीनमध्ये थेट प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे, परंतु अद्याप कोणत्याही तारखा निश्चित झालेल्या नाहीत, असे नवी दिल्लीने सोमवारी सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध 2020च्या सीमावादानंतर काहीसे दुरावले होते, मात्र आता ते हळूहळू सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत.
जानेवारीमध्ये शेजारी राष्ट्रांनी, व्यापार आणि आर्थिक मतभेद दूर करण्याच्या उद्देशाने एकत्रित काम करण्याचे मान्य केले, ज्यामुळे त्यांच्या विमान वाहतूक क्षेत्रांना, विशेषतः कोविडच्या नुकसानीतून बाहेर पडण्यात इतर देशांपेक्षा मागे राहिलेल्या चीनला, यामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
“नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि चीनमधील आमच्या समकक्षांनी हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत,” असे नागरी विमान वाहतूक सचिव वुमलुनमांग वुअलनम यांनी, नवी दिल्ली येथे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या परिषदेत सांगितले.
अधिक खोल तपशीलात न जाता वुअलनम यांनी सांगितले की, ‘याबाबत अजूनही काही मुद्दे सोडवणे बाकी आहे’.
2020 मध्ये हिमालयातील भारत-चीन सीमेवर झालेल्या लष्करी चकमकीत, किमान 20 भारतीय सैनिक आणि 4 चिनी लोक मारले गेले होते, ज्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध बिघडले होते.
परिणामत: भारताने देशात गुंतवणूक करणाऱ्या चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले, शेकडो लोकप्रिय अॅप्सवर बंदी घातली आणि प्रवासी मार्गही बंद केले, मात्र थेट मालवाहू उड्डाणे तशीच सुरूच ठेवली.
ऑक्टोबरमध्ये पर्वतीय सीमेवरील लष्करी संघर्ष कमी करण्यासाठी झालेल्या करारानंतर, दोन्ही देशातील संबंध सुधारले आहेत. त्याच महिन्यात, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देखील रशियामध्ये सकारात्मक चर्चा झाली होती.
उन्हाळ्याच्या काळात, हिमालयीन पर्वतरांगांतील काही बंद असलेले मार्ग खुले होतात, त्यामुळे आता सीमारेषेवरील स्थिती कशी असेल यावर खूप काही अवलंबून आहे. या हंगामात अग्रभागी असलेल्या चौक्यांची देखभाल करणे सोपे होते, मात्र याचवेळी वाहतुकीस अडथळा ठरणारे भागही खुले होतात.
थेट हवाई सेवा ही दोन्ही देशांतील व्यापार आणि पर्यटनासाठी अत्यावश्यक मानली जाते. सीमापार गुंतवणूक आणि आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी, प्रवासाची सोय सुधारणे ही प्राथमिक गरज आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक समानता आणि भौगोलिक जवळीक लक्षात घेता, हवाई पर्यटनासही पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या माहितीसह)