तिबेटमधून भारतात वाहत येणाऱ्या यारलुंग झांग्बो नदीवर जलविद्युत धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेबद्दल नवी दिल्लीने बीजिंगकडे आपली चिंता व्यक्त केली असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.
चीनचा दृष्टीकोन
तिबेटमधील या जलविद्युत प्रकल्पाचा पर्यावरणावर किंवा खाली वाहत जाणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यावर फार मोठा परिणाम होणार नसल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र भारत आणि बांगलादेशने तरीही या धरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
यारलुंग झांग्बो ही भारतात आल्यावर ब्रह्मपुत्रा नदी बनते. ती तिबेटच्या दक्षिणेकडील भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यातून शेवटी बांगलादेशात वाहत जाते.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, ब्रह्मपुत्रेच्या खालच्या भागातील राज्यांच्या हितसंबंधांना वरच्या भागातील या हालचालींमुळे हानी पोहोचणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन चीनला करण्यात आले आहे.
“आम्ही आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत राहू आणि त्यावर लक्ष ठेवत राहू,” असे ते म्हणाले.
दरवर्षी अंदाजे 300 अब्ज किलोवॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या धरणाच्या बांधकामाला गेल्याच महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे.
भारताची चिंता
जयस्वाल म्हणाले की, नवी दिल्लीने गेल्या महिन्यात बीजिंगकडे दोन नवीन परगण्यांच्या निर्मितीविरोधात “गंभीर निषेध” नोंदवला होता-ज्यापैकी एकामध्ये भारताने दावा केलेल्या वादग्रस्त क्षेत्राचा समावेश आहे.
ते म्हणाले, “नवीन परगण्यांच्या निर्मितीचा या क्षेत्रावरील आपल्या सार्वभौमत्वासंदर्भात भारताच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण भूमिकेवर परिणाम होणार नाही किंवा चीनच्या बेकायदेशीर आणि जबरदस्तीने केलेल्या या निर्मितीला कायदेशीर मंजुरी मिळणार नाही.
2020 मध्ये LAC झालेल्या प्राणघातक लष्करी चकमकीनंतर आशियातील दोन दिग्गज देश भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले होते. ऑक्टोबरमध्ये पश्चिम हिमालयातील त्यांच्या शेवटच्या दोन फ्रिक्शन पॉइंट्सवरून सैन्य मागे घेण्याच्या करारानंतर या संबंधांमध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे.
या करारानंतर दोन्ही बाजूच्या सैन्याने माघार घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात पाच वर्षांत पहिल्यांदाच औपचारिक चर्चा केली, ज्यात त्यांनी संबंधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी हळूहळू पावले उचलण्यावर सहमती दर्शवली.
अनुकृती
(रॉयटर्स)