ट्रम्प यांच्या निर्बंधांना न जुमानता, भारत रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवणार

0

‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी निर्बंधांची धमकी दिली असली तरीही, भारत रशियाकडून तेल आयात सुरुच ठेवणार आहे’ अशी माहिती, या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दोन भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

एका सूत्राने सांगितले की, “हे सर्व तेल खरेदी करार दीर्घ मुदतीचे आहेत, ते असे रातोरात थांबवणे इतके सोपे नाही.”

गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी, ट्रुथ सोशल (Truth Social) प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे संकेत दिले होते की, रशियन शस्त्रे आणि तेल खरेदी केल्याबद्दल भारताला अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. शुक्रवारी, ट्रम्प यांनी पत्रकारांना असेही सांगितले की, ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केल्याचे त्यांच्या कानावर आले आहे.’

शनिवारी, द न्यूयॉर्क टाइम्सने दोन निनावी वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मात्र, भारत सरकारच्या रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “भारत सरकारने अद्याप तेल कंपन्यांना रशियाकडून आयात कमी करण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.”

रॉयटर्सने या आठवड्यात दिलेल्या वृत्तानुसार, जुलैमध्ये सवलती कमी झाल्यामुळे भारत सरकारच्या अख्त्यारीतील रिफायनरीजनी, गेल्या आठवड्यात रशियन तेल खरेदी करणे थांबवले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल, यांनी शुक्रवारी एका नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, “आमच्या ऊर्जा स्रोतांच्या गरजांबाबत.. जसे की बाजारपेठेत काय उपलब्ध आहे, काय ऑफर्स आहेत आणि सध्याची जागतिक परिस्थिती काय आहे, याकडे लक्ष ठेवून असतो.”

‘विश्वासार्ह भागीदारी’ (Time-Tested Partnership)

जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, “भारताची रशियासोबत ‘स्थिर आणि दीर्घकालीन भागीदारी’ आहे. विविध देशांसोबतचे नवी दिल्लीचे संबंध हे त्यांच्यात्यांच्या योग्यतेवर (merit) आधारित आहेत. त्यामुळे त्याकडे कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहता कामा नये.”

दरम्यान, वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसने यावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

या आठवड्याच्या सुरुवातीस सूत्रांनी सांगितले की, “रशियन निर्यात कमी झाल्यामुळे आणि मागणी स्थिर असल्यामुळे, पाश्चात्त्य देशांनी मॉस्कोवर पहिल्यांदा निर्बंध लादले तेव्हा, 2022 पासून आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर सवलती आल्याने भारतीय रिफायनर्स रशियन कच्च्या तेलापासून दूर जात आहेत.”

रिफायनर्सच्या खरेदी योजनांची माहिती असलेल्या चार सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, “देशाच्या सरकारी रिफायनर्सनी – इंडियन ऑइल कॉर्प (Indian Oil Corp), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्प (Hindustan Petroleum Corp), भारत पेट्रोलियम कॉर्प (Bharat Petroleum Corp) आणि मंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड (Mangalore Refinery Petrochemical Ltd) यांनी गेल्या आठवड्यात रशियन कच्च्या तेलाची मागणी केलेली नाही.”

ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकी

14 जुलै रोजी, ट्रम्प यांनी युक्रेनसोबत शांतता करार झाल्याशिवाय रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% शुल्क लावण्याची धमकी दिली होती. रशिया हा भारतासाठी तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार असून, भारताच्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे 35% पुरवठा रशिया करतो.

यावर्षी जानेवारी ते जून, या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीतही रशिया भारताचा प्रमुख तेल पुरवठादार राहिला, जो भारताच्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे 35% होता. त्यानंतर इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा क्रमांक लागतो.

सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या आकडेवारीनुसार, जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक असलेल्या भारताने यावर्षी जानेवारी ते जूनमध्ये, दररोज सुमारे 1.75 दशलक्ष बॅरल रशियन तेल आयात केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 1% जास्त आहे.

रशियन तेल खरेदीदार असलेल्या नयारा एनर्जी (Nayara Energy) या कंपनीवर, युरोपियन युनियनने नुकतेच निर्बंध लादले आहेत, कारण या रिफायनरीमध्ये तेल कंपनी रोसनेफ्ट (Rosneft) सह रशियन संस्थांची मुख्य भागीदारी आहे.

गेल्या महिन्यात, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, युरोपियन युनियनने निर्बंध लादल्यानंतर नयाराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) राजीनामा दिला आणि कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी सर्गेई डेनिसोव्ह (Sergey Denisov) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

गेल्या महिन्याच्या अखेरीस, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार:  रशिया-समर्थित रिफायनरीवरील नवीन युरोपियन युनियन निर्बंधांमुळे, नयारा एनर्जीची तेल उत्पादनांनी भरलेली तीन जहाजे अजूनही त्यांचा माल उतरवू शकलेली नाहीत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारतीय नौदलाचा दक्षिण चीन समुद्रात प्रवेश; बीजिंगला सामरिक संदेश
Next articleसौर ऊर्जेच्या वाढीमुळे चीनने केली नोकऱ्यांमध्ये मोठी कपात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here