भारतीय नौदलाचा दक्षिण चीन समुद्रात प्रवेश; बीजिंगला सामरिक संदेश

0

भारत आणि मनिला (फिलिपिन्स) यांच्यातील वाढत्या धोरणात्मक संबंधांचे संकेत देत, तीन भारतीय नौदलाची जहाजे मनिला बंदरात दाखल झाली आहेत. पश्चिम फिलीपिन्स समुद्रात आयोजित (West Philippine Sea – WPS) संयुक्त सागरी उपक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. भारतीय नौदलाचा दक्षिण चीनच्या या वादग्रस्त जलक्षेत्रात अशाप्रकारचा हा पहिलाच प्रवेश आहे.

भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचा भाग असलेली जहाजे- INS Delhi, INS Shakti, आणि INS Kiltan, भारतीय नौदलाच्या दक्षिण-पूर्व आशियातील सुरू असलेल्या तैनातीचा भाग म्हणून फिलिपिन्समध्ये दाखल झाली आहेत. ही जहाजे 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या, फिलिपिन्सच्या सशस्त्र दलांसोबततच्या (AFP) सागरी सहकारी उपक्रमात (Maritime Cooperative Activity – MCA) भाग घेत आहेत, ज्यामुळे भारताची संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याची आणि प्रादेशिक सागरी उपस्थिती वाढवण्याची इच्छा स्पष्ट होते.

नौदलाची ही भेट आणि संयुक्त कवायत, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांच्या पहिल्या भारत भेटीपूर्वी झाली आहे. राष्ट्राध्यक्ष मार्कोस हे नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील प्रमुख व्यावसायिकांना भेटणार असून, या भेटीमुळे संरक्षण, व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षेत आणखी सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे.

पूर्वेकडील ताफ्याचे प्रमुख, रिअर ॲडमिरल सुशील मेनन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाच्या या तैनातीमुळे ‘मुक्त, खुले आणि नियमांवर आधारित हिंदी-प्रशांत क्षेत्र’ (Indo-Pacific) या भारताच्या भूमिकेला बळकटी मिळते. दक्षिण चीन समुद्रात बीजिंगसोबतचा तणाव वाढत असताना मनिलाचीही हीच भूमिका आहे.

AFP चे प्रमुख- जनरल रोमियो ब्रॉर्नर ज्युनिअर यांनी INS Shakti वर बोलताना सांगितले की, “हे केवळ एक औपचारिक स्वागत नाही. तर समुद्राचे रक्षण करण्याची आणि आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे पालन करण्याची दोन्ही राष्ट्रांची दृढ इच्छाशक्ती हे स्पष्टपणे दर्शवते.” ब्रॉर्नर यांनी पुष्टी केली की, संयुक्त सागरी कवायतीची कल्पना या वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्लीमध्ये झालेल्या रायसीना डायलॉग 2025 मध्ये उदयास आली होती, जिथे दोन्ही देशांच्या लष्करी नेत्यांनी हिंदी-प्रशांत क्षेत्रातील धोरणात्मक सहकार्यावर चर्चा केली होती. “चार महिन्यांनंतर, आम्ही हा उपक्रम प्रत्यक्षात आणत आहोत,” ते म्हणाले.

वादग्रस्त पाण्यात संयुक्त कवायतीमुळे बीजिंगला संदेश

पश्चिम फिलीपिन्स समुद्रात, जो फिलीपिन्सच्या मालकीचा असूनही चीन त्याला आव्हान देतो, तिथे एकत्र कवायत करण्याचा निर्णय हा एक हेतुपुरस्सर भू-राजकीय संदेश मानला जात आहे. जरी स्पष्टपणे सांगितले गेले नसले तरी, ही कृती चीनच्या विस्तारवादी सागरी दाव्यांना आव्हान देते आणि भारताला बीजिंगच्या आक्रमकतेला विरोध करणाऱ्या प्रादेशिक शक्तींच्या अधिक जवळ आणते.

फिलिपिन्सचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एडुआर्डो आनो, यांनी या सहभागाचे व्यापक महत्त्व अधोरेखित केले. द मनिला टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, “हे सागरी सहकार्य, क्षमता-निर्माण प्रयत्न आणि व्यावसायिक लष्करी देवाणघेवाण अधिक सखोल झाल्याचे दर्शवते. कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आणि सागरी सुव्यवस्था राखण्यासाठी भारत एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे.”

अलीकडच्या वर्षांत, भारत आणि फिलिपिन्समध्ये वाढते धोरणात्मक हितसंबंध दिसून आले आहेत, कारण दोन्ही राष्ट्रे चीनच्या आक्रमकतेच्या आव्हानांना तोंड देत आहेत आणि संरक्षण भागीदारीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 2003–04 मध्ये सुरू झालेल्या सागरी संवाद यंत्रणांचे पुनरुज्जीवन, सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी सुरक्षा चिंतांवर आधारित द्विपक्षीय संबंध अधिक परिपक्व होत असल्याचे दर्शवते.

भारताची हिंदी-प्रशांत क्षेत्रातील उपस्थिती विस्तारत आहे

भारताची इंडो-पॅसिफीक नौदल उपस्थिती अलिकडच्या वर्षांत दक्षिण-पूर्व आशियामध्ये विस्तारली आहे, जी त्याच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि या प्रदेशात ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ (Net Security Provider) बनण्याच्या वचनबद्धतेचा भाग आहे. पूर्वेकडील ताफ्याच्या तैनातीमध्ये इतर प्रादेशिक नौदलांसोबत बंदरांना भेटी आणि कवायतींचा समावेश होता, परंतु भारतीय जहाजे फिलिपिन्सच्या हक्काच्या पाण्यात सक्रियपणे प्रथमच दाखल झाली आहेत.

मनिलासाठी, या सहभागामुळे अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबतच्या वाढत्या सागरी भागीदारीच्या जाळ्याला राजनैतिक आणि कार्यात्मक बळकटी मिळते. नवी दिल्लीसाठी, हे भारताला प्रादेशिक स्थैर्यामध्ये एक विश्वासार्ह आणि इच्छुक भागीदार म्हणून स्थान देते.

राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर नवी दिल्लीत येण्याची तयारी करत असताना, फिलिपिन्सच्या जहाजांसोबत WPS मध्ये भारतीय युद्धनौका प्रवास करत असल्याचे प्रतीकात्मकता एक स्पष्ट संदेश देते की इंडो-पॅसिफिक व्यवस्था केवळ महासत्तेच्या प्रतिस्पर्ध्यानेच नव्हे तर सामायिक नियम आणि मूल्यांचे रक्षण करणाऱ्या समान विचारसरणीच्या राष्ट्रांच्या युतीद्वारे आकार घेत आहे.

– रवी शंकर

+ posts
Previous articleट्रम्प यांचा भारताविरुद्धचा कडवटपणा देशांतर्गत असुरक्षिततेचे प्रतिबिंब
Next articleट्रम्प यांच्या निर्बंधांना न जुमानता, भारत रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here