भारतीय नौदलाने, उत्तर अरबी समुद्रातील अपघातग्रस्त जहाजावरील आग विझवण्याची आणि बचावकार्याची धाडसी व धोकादायक कामगिरी यशस्वीरित्या पार पाडत, आपली जलद कार्यक्षमता आणि सागरी नौसैनिकांच्या सुरक्षेप्रती असलेली अपार बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. ही कारवाई 29 जून 2025 रोजी, उत्तर अरबी समुद्रातील पलाऊ ध्वज असलेल्या MT Yi Cheng 6 या जहाजावर ही मोहिम राबवण्यात आली, ज्यामध्ये 14 भारतीय क्रू मेम्बर्सची सुरक्षितता सुनिश्चित केली गेली.
29 जूनच्या पहाटे, मिशनअंतर्गत तैनातीवर असलेल्या INS Tabar या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेला, ‘MT Yi Cheng 6’ जहाजाकडून एक ‘Mayday’ आपत्ती संदेश प्राप्त झाला. सदर जहाज फुजैराह (UAE) च्या सुमारे 80 सागरी मैल पूर्वेला कार्यरत असताना त्याच्या इंजिन खोलीत मोठी आग लागल्याची माहिती देण्यात आली.
INS Tabar ने अत्यंत जलद प्रतिसाद देत, पूर्ण वेगाने घटनास्थळी धाव घेतली. आग लागलेल्या जहाजाजवळ पोहोचताच नौदलाच्या अधिकाऱ्यांनी जहाजाच्या कॅप्टनशी संपर्क साधून तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, जहाजावरील सात कर्मचाऱ्यांना INS Tabar वरील बोटींच्या मदतीने तत्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नव्हती आणि सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नौदलाच्या डॉक्टरांनी केली. उर्वरित कर्मचाऱ्यांनी (ज्यात जहाजाचा मास्टरही होता) आग नियंत्रणात आणण्याच्या कामात मदत करण्यासाठी जहाजावरच थांबण्याचा निर्णय घेतला.
INS Tabar ने, एकूण 6 सदस्यांचे अग्निशमन आणि धोकादायक परिस्थिती नियंत्रण पथक, आवश्यक उपकरणांसह जहाजावर उतरवले. प्रारंभिक प्रयत्नांमध्ये भारतीय नौदलाच्या जवानांनी आणि जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आग आटोक्यात आणण्यास यश मिळवले आणि धुराचे प्रमाण केवळ इंजिन खोलीपुरते मर्यादित ठेवण्यात आले.
त्यानंतर नौदलाचे आणखी 13 अधिकारी (5 अधिकारी आणि 8 नौसैनिक) अग्निशमन मोहिमेत सामील झाले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. सध्या तिथले तापमान आणि अन्य घडामोडींचे सातत्याने निरीक्षण केले जात आहे. INS Tabar अजूनही घटनास्थळी तैनात असून आवश्यक ती मदत करत आहे.
भारतीय नौदलातील धाडसी जवानांच्या समर्पित प्रयत्नांमुळे, जहाज आणि सर्व भारतीय कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. ही घटना भारतीय नौदलाच्या जलद प्रतिसाद क्षमतेचे, सज्जतेचे, मानवी दृष्टिकोनातून समुद्र सुरक्षेप्रती असलेल्या भूमिकेचे प्रतीक असून, हिंद महासागर क्षेत्रात भारताची ‘प्रथम प्रतिसाद देणारा देश’ म्हणून असलेली भूमिका पुन्हा अधोरेखित करते.
टीम भारतशक्ती