रियाधमध्ये भारतीय सशस्त्र दलांतील नारीशक्तीचा आविष्कार

0

रियाध येथे नुकत्याच झालेल्या जागतिक संरक्षणविषयक प्रदर्शन (डब्ल्यूडीएस) 2024मध्ये तीनही भारतीय सेनादलांच्या महिला प्रतिनिधित्वाचे दर्शन घडले. स्क्वाड्रन लीडर भावना कांत, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी डब्ल्यूडीएस 2024मध्ये आयोजित विविध चर्चासत्रांमध्ये, विशेषतः ‘‘संरक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महिला’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्व केले. 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या पाच दिवसीय कार्यक्रमाचा उद्देश अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणे आणि सहभागी कंपन्यांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे असा होता.

“डब्ल्यूडीएस 2024मधील या तीन विशेष महिलांचा सहभाग म्हणजे संरक्षण क्षेत्रातील भारतीय महिलांच्या वाढत्या जबाबदारीचा पुरावा आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेतील सौदी राजदूत राजकुमारी रीमा बिंत बांदर अल-सौद यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केलेल्या ‘संरक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महिला – सर्वसमावेशक भविष्यामधील गुंतवणूक’ या संकल्पनेवर आधारित गटचर्चेत भारतीय हवाई दलातील वैमानिक स्क्वाड्रन लीडर भावना कांत यांनी विषयतज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला. स्क्वाड्रन लीडर भावना यांनी अडथळ्यांची बंधने तोडण्याचा, आकाशात उंच भरारी घेण्याचा आणि त्यातून भारतातील मान्यवर लढाऊ वैमानिकांच्या गटाचा भाग होण्याचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर मांडला. प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात (2021) सहभागी झालेल्या त्या पहिल्याच लढाऊ महिला वैमानिक आहेत. नेतृत्व, लवचिकता आणि आधुनिक युद्ध क्षेत्रात महिलांची भूमिका यासंदर्भात त्यांनी मांडलेले विचार तसेच त्यांच्या एकंदर प्रवासाने श्रोते प्रभावित झाले.

भारतीय लष्करात कार्यरत कर्नल पोनुंग डोमिंग या उत्तर भागात 15,000 फुटांहून अधिक उंचीवरील जगातील सर्वोच्च उंचावर असलेल्या सीमा कृती दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध उपक्रमांत अनेक प्रशंसनीय कामगाऱ्या केल्या आहेत. यातील काही उपक्रमांमध्ये त्या पहिल्यांदाच सहभागी झाल्या होत्या. अभियांत्रिकी अधिकारी म्हणून त्या अनेक आव्हानात्मक मोहिमांमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी सागरी सुरक्षा तसेच आघाडीवरील फळीत काम करण्यासंदर्भातील आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. भारताचा विशाल सागरकिनारा सुरक्षित ठेवण्यात तसेच प्रादेशातील वातावरण स्थिर ठेवण्यात महिला निभावत असलेली भूमिका त्यांच्या सहभागामुळे अधोरेखित झाली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रियाध येथील आंतरराष्ट्रीय भारतीय विद्यालय येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात या तिघींनी त्यांच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल चर्चा केली.

संरक्षण सेवेतील भारतीय महिलांची वैविध्यपूर्ण प्रतिभा आणि नेतृत्वगुण यांचे सादरीकरण करण्याच्या दृष्टीने एक प्लॅटफॉर्मच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध झाला. त्यातील चर्चेतून नव्या पिढीला आपापल्या स्वप्नांचा पाठलाग करून नव्या क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याची प्रेरणा मिळाली. डब्ल्यूडीएस 2024 या प्रदर्शनाची 08 फेब्रुवारी 2024 रोजी सांगता झाली. या कार्यक्रमासाठी भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी रियाधला भेट दिली.

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love
Previous articleZelensky Replaces Ukrainian Military Chief Gen Valerii Zaluzhnyi
Next articleUkraine War: Principles Of War, New Technologies And Industry Participation… Part II

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here