भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या भेटीत सागरी सुरक्षा, समन्वयावर भर
दि. २४ मे: दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग म्हणून फिलिपिन्सच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील युद्धनौकांनी गुरुवारी फिलिपिन्सला निरोप दिला. भारतीय नौदलाच्या या ‘पोर्ट कॉल’ दरम्यान उभय देशांच्या नौदलांत सागरी सुरक्षा आणि समन्वयावर प्रामुख्याने भर देण्यात आला. फिलिपिन्सच्या संरक्षण विभाग, तटरक्षकदल आणि नौदलाने भारतीय बनावटीच्या ‘ॲडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर’ ध्रुवबद्दल जाणून घेण्यातही रस दाखविला, त्यामुळे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ आणि ‘सागर’ धोरणातील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून फिलिपिन्सकडे पहिले जात आहे.
भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील ‘आयएनएस शक्ती,’ ‘आयएनएस दिल्ली’ आणि ‘आयएनएस किल्तन या युद्धनौकांनी सामरिक तैनातीचा भाग म्हणून दक्षिण चीन समुद्राच्या किनारपट्टीवरील देशाचा दौरा सुरु केला आहे. या प्रवासात भारतीय युद्धनौकांनी सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्सला भेट दिली. या भेटींमध्ये संबंधित नौदलांबरोबर द्विपक्षीय सागरी सराव आणि अंतरपरिचालन संबंधातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच युद्धनौकांना भेटीचे (डेक व्हिजीट) कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुख रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्या नेतृत्त्वाखाली नौदलाचा हा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात भारत आणि फिलिपिन्समधील दीर्घ आणि मजबूत द्विपक्षीय संबंधांची प्रचीती आली.
रिअर ॲडमिरल राजेश धनकर आणि भारतीय युद्धनौकांच्या ‘कमांडिंग ऑफिसर’नी फिलिपिनो फ्लीटचे कमांडर रिअर ॲडमिरल रेनाटो डेव्हिड आणि तटरक्षक दलाचे उपकमांडंट, व्हाइस ॲडमिरल रोलान्डो लिझर पन्झालान (ज्यु) यांच्याशी संवाद साधला. रिअर ॲडमिरल यांनी फ्लॅग ऑफिसर इन कमांड व्हाईस ॲडमिरल टोरीबीओ ड्यूलीनयन अदासी जेटी, यांच्याशी सहकार्याच्या संधी, परस्पर हिताच्या बाबी आणि प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील सध्याची सुरक्षा स्थिती यावर विस्तृत चर्चा केली. या भेटीमुळे भारत आणि फिलीपिन्सच्या नौदलांमधील नौदल सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता यांचा विकास करण्यावर चर्चा करण्याची संधी मिळाली.
भारतीय नौदलाकडे हिंदी महासागर तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रातील एक प्रबळ नौदल (नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर) म्हणून पाहिले जाते. बदलत्या भूराजकीय परिस्थितीत दक्षिण चीन समुद्रही जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे या भागातील भारतीय नौदलाची उपस्थितीही महत्त्वाची मानली जाते. भारताने आपल्या ‘लूक ईस्ट’ धोरणानुसार या भागातील आणि आग्नेय आशियातील देशांशी (आसियान) संबंध वाढविण्यास सुरुवात केली होती. त्यातून पुढे भारताने आपल्या ‘ॲक्ट ईस्ट’ आणि ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ (सागर) या बहुपक्षीय भागीदारीच्या धोरणाचे सुतोवाच केले. या भागातील चीनच्या दादागिरीमुळे त्रस्त असलेल्या देशांना द्विपक्षीय संबंधांच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे आणि शस्त्रप्रणालीही भारताने देऊ केली आहे. फिलिपिन्सने नुकतीच भारताकडून ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची खरेदी केली आहे. चीनला शाह देण्यासाठी केलेली हे मोठी खेळी मानली जात आहे. तसेच, या व्यवहारामुळे संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील एक निर्यातदार देश म्हणूनही भारताचे स्थान अधोरेखित झाले आहे. म्हणूनच फिलिपिन्स-भारत संबंध भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचे फलित मानले जात आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)