कारवार येथील नौदल तळावर पार पडलेल्या ऐतिहासिक समारंभात, भारतीय नौदलाने INSV Kaundinya या प्राचीन आणि हस्तकलेवर आधारित नौकेचे, पुनरुज्जीवन करणार असल्याचे औपचारिकपणे घोषित केले. हा निर्णय भारताच्या सागरी परंपरेच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री- गजेंद्र सिंह शेखावत, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, केवळ पारंपारिक जहाजबांधणीचा उल्लेखनीय पराक्रमच दाखवण्यात आला नाही तर, भारताच्या वैभवशाली सागरी प्रवासाच्या भूतकाळाला सांस्कृतिक आदरांजली देखील दाखवण्यात आली.
INSV Kaundinya
आधुनिक जहाजांपेक्षा ही नौका खूपच वेगळी आहे. पाचव्या शतकातील अजिंठा लेण्यांमधील भित्तिचित्रांमधून प्रेरणा घेऊन ही नौका पूर्णपणे प्राचीन तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. कोणतेही खिळे किंवा वेल्डिंग न करता, लाकडी पट्ट्यांना नारळाच्या दोऱ्यांनी, नारळाच्या शेंड्यांनी आणि नैसर्गिक राळेने एकत्र शिवले गेले आहे. हा संपूर्ण प्रकल्प केरळमधील पारंपरिक नौकानिर्माते आणि मास्टर क्राफ्ट्समन बाबू शंकरन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
भारतीय नौदल व शैक्षणिक संस्थांची भूमिका
या नौकेच्या निर्मितीत, भारतीय नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्या काळातील कोणतेही आराखडे किंवा जहाजे रेफरन्सकरिता शिल्लक नसल्याने, नौदलाने पुरातत्त्ववेत्ते, इतिहासकार आणि नौकानिर्माते यांच्यासह सहयोग करत, भित्तिचित्रे आणि प्रतिकात्मक माहिती यावरून रचना निश्चित केली.
IIT मद्रास येथे झालेल्या, हायड्रोडायनामिक चाचण्या आणि कठोर संरचनात्मक मूल्यांकनांमुळे, हे जहाज ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित आणि समुद्रात वापरण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित झाले. या जहाजावर चौरस आकाराच्या कपड्याची पताका आणि मागच्या बाजूला- trailing oars आणि flexible hull बसवलेले आहेत. हे सर्व, प्राचीन तंत्रज्ञानानुसार नेव्हिगेशनसाठीचे अत्यंत महत्त्वाचे पण आजकाल दुर्मिळ असलेले घटक आहेत.
सांस्कृतिक संदर्भ
या प्रकल्पाची प्रेरणा आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सान्याल म्हणाले की, “कौण्डिन्य हा पहिला भारतीय नाविक होता, ज्याचे नाव आपल्याला परिचीत आहे आणि ज्याने दक्षिण आशियायी समुद्र पार करून, इतिहासावर एक मोठा प्रभाव टाकला होता.”
आपल्या भाषणात, सान्याल यांनी जहाजाच्या नावामागील आख्यायिका सांगितली, “भारतीय खलाशी कौंडिन्य यांनी स्थानिक लढवय्या- राणी सोमा यांच्यासोबत सध्याच्या कंबोडियामध्ये फुनानचे प्राचीन राज्य स्थापन केले असे म्हटले जाते. भारतात कांस्ययुगाची जुनी सागरी संस्कृती असली तरी, आम्हाला त्या खलाशांची नावे माहित नाहीत. मात्र, कौण्डिन्य हा पहिला खलाशी आहे हे निश्चीत. त्याचे जहाज कसे दिसायचे हे आम्हाला माहित नाही. परंतु त्या काळातील जहाजे आम्ही बांधलेल्या जहाजांसारखी दिसत होती,” असे सान्याल यांनी स्पष्ट केले.
आंतरमहासागरी प्रवास
ही नौका केवळ एक सांस्कृतिक प्रतिक नाही. INSV Kaundinya लवकरच गुजरात ते ओमान या प्राचीन समुद्री व्यापार मार्गावर, एक आंतरमहासागरी प्रवास करणार आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतीय व्यापारी व शोधकांनी या मार्गांवर प्रवास केला होता.
भारतीय नौदलाच्या निवेदनात सांगण्यात आले की, “ही नौका केवळ एक जहाज नसून, तिच्यावर कदंब वंशाच्या दोन डोक्यांच्या गरुड ‘गण्डभेरुंडा’, सूर्याचे चिन्ह, शिंह-याळी (Simha Yali) शिल्प, व हडप्पा शैलीतील दगडी नांगर यांचा समावेश आहे. हे घटक जहाजाच्या भारतीय सागरी परंपरेतील खोल मूळांचा संकेत देतात.”
संस्कृती मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत म्हणाले की, “हा प्रकल्प फक्त एक जहाज पुनरुज्जीवित करण्याचा नाही, तर एक संपूर्ण वारसा – संशोधनाचा, व्यापाराचा आणि आपल्या पूर्वजांच्या समुद्रातील कौशल्याला जिवंत ठेवण्याचा आहे.”
INSV Kaundinya च्या समावेशाने, भारतीय नौदल आणि सांस्कृतिक मंत्रालयाने भारताच्या सागरी परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय पुन्हा जागवला आहे. भूतकाळाशी वर्तमानाला जोडत, इतिहासाच्या लाटांवर भविष्यातील एक ऐतिहासिक प्रवास सुरू केला आहे.
– टीम भारतशक्ती