इतिहातील चुकांपासून दूर राहण्याचा सल्ला
दि. १६ जून: आपल्या अणुकार्यक्रमावर ‘जी-७’ राष्ट्रासमुहाकडून करण्यात आलेल्या टीकेवर इराणने ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर इतिहासातील विध्वंसक धोरणांपासून दूर राहण्याचा सल्लाही इराणने ‘जी-७’ राष्ट्रसमूहाला दिला आहे. इटलीमध्ये झालेल्या ग-७ राष्ट्रसमूहाच्या बैठकीत इराणच्या अणुकार्यक्रमात होत असलेल्या वाढीबद्दल टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कानांनी यांनी हा सल्ला दिला आहे.
इराणकडून त्यांचा अणुकार्यक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर इटलीतील ही-७ राष्ट्रसमूहाच्या बैठकीत शुक्रवारी इराणवर टीका करण्यात आली होती आणि इराणने आपला अणुकार्यक्रम पुढे नेल्यास आणि आपली क्षेपणास्त्रे रशियाकडे हस्तांतरित केल्यास इराणला नव्या प्रतिबंधांना अमोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यावर बोलताना इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कानांनी यांनी इराणला धमकी दिल्याबद्दल जी-७ राष्ट्रसमूहाची चांगलीच खरडपट्टी काढली. युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध आणि इराण व रशियातील द्विपक्षीय संबंध यांचा विनाकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न म्हणजे पक्षपाती राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेली खेळी आहे, असे कानांनी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर इराणवरील निर्बंध कायम राहावेत या उद्देशाने काही देशांकडून हे आरोप करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोगाने इराणला आयोगाच्या निरीक्षक पथकाशी सहकार्य वाढविण्याचा सल्ला दिला होता. अशा आशयाचा ठरावही ३५ देशांचा समावेश असलेल्या आयोगाच्या नियामक मंडळाने पारित केला होता. त्याला इराणने आपल्या फोर्दोव येथील अणुप्रकल्पात युरेनियम समृद्ध करण्यासाठी अधिक यंत्रणा बसवून प्रतिसाद दिला होता. अणु उर्जा आयोगाच्या मते इराणकडून त्यांचा अणुकार्यक्रम वेगाने पुढे नेण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना कानांनी म्हणाले, की इराण अणुउर्जा आयोगाबरोबर सकारात्मक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी तयार आहे. मात्र, आयोगाने केलेला ठराव राजकीय पक्षपात दर्शविणारा आहे. इराण त्यांच्या अणुप्रकल्पातून ६० टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध करू शकतो. अण्वस्त्रे बनविण्यासाठी लागणारी ९० टक्के क्षमता त्यांनी प्राप्त केली आहे. त्यांच्याकडे समृध्द युरेनियमचा पुरेसा साठा असून, याहून अधिक युरेनियम समृद्ध केल्यास इराण तीन अण्वस्त्रे बनवू शकतो, असे अणुउर्जा आयोगाचे म्हणणे आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)