डोमिनिकन रिपब्लिकच्या राजधानीतील, एका लोकप्रिय नाईटक्लबचे चे छत कोसळून, त्यामध्ये किमान 184 जणांचा मृत्यू झाला असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत असले तरी ते सापडण्याची आशा आता मावळत चालली आहेत.
मंगळवारी रात्री, सॅंटो डोमिंगोमधील जेट सेट Nightclub चे छत कोसळले आणि या घटनेनंतर गेले दोन दिवस याच क्लबच्या ढिगाऱ्यासमोर अनेक लोक आपल्या प्रियजनांचा शोध घेण्यासाठी जमले आहेत. ते पोलिसांना आपल्या बेपत्ता आप्तजनांचे फोटो दाखवत आहेत.
दरम्यान, “आम्ही कुणालाही मागे सोडणार नाही,” असे देशाच्या आपत्कालीन संचालन केंद्राचे प्रमुख- जुआन मॅन्युएल मेंडेस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आशा मावळत चालल्या आहेत
“आपत्कालीन पथक शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत बचावकार्य सुरू ठेवेल, मात्र गेल्या 24 तासांत कुणालाही जिवंत बाहेर काढण्यात न आल्याने, ढिगाऱ्याखाली अजून कोणी जिवंत राहिले असण्याची शक्यता फारच कमी आहे,” असे मेंडेस यांनी सांगितले.
“येणाऱ्या काही तासांत सध्या सुरू असलेले शोध आणि बचावकार्य – हे मृतदेहांची पुनर्प्राप्ती या टप्प्याकडे संक्रमित होईल,” असे राष्ट्रपतींचे प्रवक्ते होमेरो फिगुएरोआ यांनी एका निवेदनात सांगितले.
कुटुंबीय मात्र अजूनही आशेवर टिकून आहेत. इतर अनेक लोकांसह अॅलेक्स दे लिऑन देखील, येथे आपल्या माजी पत्नीचा शोध घेत होते, जी त्यांच्या दोन मुलांची आई आहे आणि सोबतच त्यांची एक चांगली मैत्रिण देखील.
“दुर्दैवाने, मला अजूनही कळू शकलेले नाही की त्या कुठे आहेत” असे लिऑन यांनी सांगितले. “या घटनेमुळे माझा १५ वर्षांचा मुलगा पूर्णपणे खचून गेला आहे आणि ९ वर्षाचा माझा लहानगा अजून शांत आहे, कारण आम्ही त्याला आई कामावर गेली असल्याचे सांगितले आहे,” अशी संवेदनशील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ज्यांचे आप्तजन अजूनही बेपत्ता आहेत, असे नातेवाईक व मित्र त्यांचे फोटो घेऊन घटनास्थळी फिरत आहेत, तसेच दुर्घटनेच्या वेळी त्यांनी काय कपडे घातले होते याचं वर्णन पोलिसांना देत आहेत, जेणेकरून मृतदेह जर ओळखण्या योग्य असतील, तर त्यांची ओळख पटण्यात मदत होऊ शकेल.
बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आतापर्यंत, सुमारे 155 लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेच्या वेळी क्लबमध्ये नक्की किती लोक होते, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शोधकार्य अद्याप सुरू आहे.”
सेलिब्रेशन ते शोकांतिका
ही दुर्घटना, प्रसिद्ध डोमिनिकन गायक रुबी पेरेझ यांच्या कॉन्सर्टदरम्यान घडली. अनेक राजकारणी, खेळाडू आणि इतर मान्यवरांची उपस्थिती असलेला, हा कार्यक्रम रंगात आलेला असताना, मध्यरात्री अचानक नाईटक्लबचे छप्पर कोसळले आणि एकाकी सेलिब्रेशनचे रुपांतर भयावह शोकांतिकेत झाले.
पेरेझ हेदेखील या दुर्घटनेत मृत्यू पावले. त्यांच्या स्मरणार्थ, ते “देशाच्या कला आणि मेरेंग शैलीतील एक थोर व्यक्तिमत्त्व” असल्याचे सांगत, संस्कृती मंत्रालयाने गुरुवारी एक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे.
ज्यांच्या पार्थिवाची ओळख पटली आहे, अशा मृतांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार सुरू केले आहेत.
राष्ट्राध्यक्ष लुईस अबिनादेर यांनी, बुधवारी नेल्सी क्रूझ यांच्या अंत्यविधीस उपस्थिती लावली. त्या उत्तरेतील मॉन्टे क्रिस्ती प्रांताच्या राज्यपाल होत्या आणि माजी एमएलबी खेळाडू नेल्सन क्रूझ यांच्या त्या बहिण होत्या.
“आपल्याला क्रूझ यांच्यासह इतर सर्व मृतांविषयी दु:ख आहे,” असे अबिनादेर यांनी अंत्यविधीच्यावेळी सांगितले.
माजी मेजर लीग बेसबॉल खेळाडू- पिचर ऑक्टावियो डोटेल आणि टोनी ब्लांको हेदेखील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले.
या दुर्घटनेत सार्वजनिक बांधकाम व दळणवळण मंत्र्यांचा मुलगाही मरण पावला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)