मोदी आणि जिनपिंग यांच्यात पाच वर्षांत पहिली औपचारिक चर्चा

0
मोदी आणि

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज (बुधवारी) औपचारिक चर्चा झाली. गेल्या पाच वर्षांतील ही पहिली चर्चा असल्याने सगळ्या जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. 2020 च्या हिंसक लष्करी चकमकीनंतर उभय देशांमधील संबंधांमध्ये मोठी उलथापालथ झाली. अनेक वर्षांच्या तणावानंतर एक पाऊल पुढे टाकण्याचे संकेत देत, रशियाच्या कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली.

भारत आणि चीनमध्ये विवादित सीमेवर चार वर्षांच्या लष्करी स्टॅण्ड ऑफचे निराकरण करण्यासाठी करार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी ही बैठक पार पडली आहे, या  समस्येमुळे दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. 2020 मध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय आणि 4 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला. राजनैतिक पातळीवर यासंदर्भात प्रयत्न सुरू असताना दोन नेत्यांमध्ये बैठक होणे ही एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे.

सीमा करार आणि लष्करी तणाव कमी करणे

लडाख चकमकीपासून भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण आहेत, दोन्ही देशांनी बर्फाच्छादित, विवादित सीमेवरील त्यांच्या सैन्यात लक्षणीय वाढ केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी करार होत असतानाच मोदी आणि शी यांच्यातील चर्चा म्हणजे सीमावर्ती वाटाघाटींना आलेले यश असंच म्हणावं लागेल.

सीमा कराराचा तपशील  अद्याप गोपनीय असला तरी, एका भारतीय लष्करी स्रोताने सूचित केले आहे की दोन्ही देश आता पुढील संघर्ष रोखण्याच्या उद्देशाने एका मान्य केलेल्या वेळापत्रकानुसार सीमेवरील वादग्रस्त ठिकाणांवर गस्त घालतील. लष्करी तणाव कमी करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. याशिवाय राजकीय आणि आर्थिक संबंधांमध्ये आणखी सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

राजनैतिक आणि आर्थिक प्रभाव

दोन्ही नेत्यांमधील अनेक वर्षांच्या मर्यादित संवादानंतर आज बुधवारी चर्चा झाली. त्याआधी हे दोन्ही नेते औपचारिकपणे  2019 मधील शिखर परिषदेला शेवटचे समोरासमोर आले होते. 2022 मधील जी20 शिखर परिषद आणि 2023 मधील ब्रिक्स शिखर परिषदेसह इतर जागतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची संक्षिप्त भेट झाली, परंतु सविस्तर बैठका झाल्या नाहीत त्यामुळे त्या संबंधांमधील सुधारणा या दृष्टीने कोणत्याही मोठ्या प्रगतीचा संकेत देणाऱ्या ठरल्या नाहीत.

भारताने सीमाप्रश्नी तोडगा काढल्यावर व्यापक राजकीय आणि आर्थिक संबंध सुधारले होते. परिणामी, मोदी आणि शी यांच्यात आज झालेल्या बैठकीमुळे भारतात नवीन चिनी गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडले जाऊ शकतात. लडाखमधील संघर्षानंतर भारताने चीनकडून होणाऱ्या गुंतवणुकीवर निर्बंध घातले होते, थेट उड्डाणे रोखली होती आणि चिनी नागरिकांना मर्यादित व्हिसा जारी करण्यात आला होता.

सीमा कराराचे अधिक तपशील अद्याप उघड झाले नसले तरी, दोन्ही नेत्यांमधील चर्चा पुन्हा सुरू होणे हा जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील संबंधांसाठी एक निर्णायक टप्पा असू शकतो.

रेशम
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleModi-Xi Summit In Kazan: Steps Toward Lasting Border Peace, Strategic Ties
Next articleदहशतवादी हल्ल्यांच्या इशाऱ्यामुळे श्रीलंका हाय अलर्टवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here