संपादकीय टिप्पणी
पाकिस्तानच्या भारतविरोधी छुप्या युद्धासंदर्भात विशेष लेखमाला सुरू केली आहे. या लेखात काश्मीरमध्ये झालेल्या काही अतिरेकी कारवायांच्या मोडस ऑपरेंडीवर (कारवाईची पद्धत) प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भारतशक्तीला उपलब्ध झालेल्या अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर अतिरेकी कारवायांशी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते.
——————————
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाला पाकिस्तानकडूनच खतपाणी घातले जाते. या भागातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानने कायमच पाठबळ दिले आहे. डिसेंबर 2020मधील जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुकीला लोकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आणि म्हणूनच या निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी लष्कर ए तैयबा (LeT) आणि जैश ए मोहम्मद (JeM) या दोन दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांना जम्मू भागात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी पूंछ जिल्ह्यातील सुरणकोटमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी अतिरेकी ठार झाले. तर एका स्थानिक मदतनीसास ताब्यात घेण्यात आले.
भारतशक्तीला उपलब्ध झालेल्या एफआयआर क्र. 0190/2020नुसार खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्यांकडून दोन एके-47 रायफल्स, एक अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचर आणि एक सॅटेलाइट फोन, पाकिस्तान बनावटीचे हातबॉम्ब, थुराया सेट (IMEI No 352384001034690), मोबाइल फोन्स, जीपीएस आणि डायरी हस्तगत करण्यात आली. मोबाइल फोन्सच्या तपासणीत 203 फोटो सापडले. स्फोटके कशी तयार करायची, डिटोनेटर्स, केमिकल्स आणि टाइम फ्युज यांचा वापर कसा करायचा हे दर्शवणारे ते फोटो होते. तर, नेव्हिगेशन, नकाशा वाचन तसेच दुर्बिणीसह स्निपर रायफल व इतर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा वापर करणे; सांकेतिक शब्दांचा वापर करून संपर्क साधणे, आरडीएक्स, पेट्रोल बॉम्ब यासह स्फोटके, केमिकल्सचा वापर करणे, याबाबतची सविस्तर माहिती डायरीमध्ये आहे.
या घटनेच्या तीन आठवडे आधी, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नागरोटाजवळ 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मदचे (JeM) चार अतिरेकी मारले गेले. या अतिरेक्यांना घेऊन जाणार ट्रक तपासणीसाठी रोखल्यानंतर ही चकमक झाली. मुंबईतील 26/11 अतिरेकी हल्ल्याच्याच दिवशी पुन्हा एकदा मोठा घातपात घडवून आणण्याचा मनसुबा या अतिरेक्यांचा होता, असा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. काश्मीर खोऱ्यात मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने हे अतिरेकी पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती रऊफ असगर आणि कारी झरार यांच्या संपर्कात असल्याचे त्यांच्याकडील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) डिव्हाइस आणि मोबाइल फोन्सच्या डेटावरून गुप्तचर यंत्रणेला समजले होते. मुफ्ती असगर, हा संयुक्त राष्ट्रांनी (UN) आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरचा लहान भाऊ आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केले होते. पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खात्मा करून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. यावरून स्पष्ट होते की, मोठा विद्ध्वंस घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो पुन्हा एकदा उधळून लावण्यात आला, असे पंतप्रधानांनी या ट्वीटमध्ये म्हटले होते.
या अतिरेक्यांकडून एके श्रृंखलेतील 11 रायफल्स, 30 चिनी ग्रेनेड्स, 16 एके अॅम्युनेशन क्लिप्स आणि 20 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले. पाकिस्तानमध्ये तयार झालेले स्मार्टफोन्स, क्यूमोबाइलचा डिजिटल मोबाइल रेडिओ आणि सांकेतिक संदेश असलेले मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स देखील त्याच्याकडे सापडले. याशिवाय, पाकिस्तानमध्ये तयार झालेली औषधे, जीपीएस डिव्हाइस आणि एक वायरलेस सेटही त्यांच्याकडे आढळला. हे रेडिओ सेट पाकिस्तानचे सुरक्षा यंत्रणा तसेच सरकारी यंत्रणा वापरते.
तर, पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा येथे 20 ऑक्टोबर 2020 झालेल्या अन्य एका चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या तिघांत दोघे पाकिस्तानी नागरिक होते. या तिघांकडून रेडिओ सेट, मॅट्रिक्स शीट्स आणि एक डायरी हस्तगत करण्यात आली. या अतिरेक्यांनी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मिनिमार्ग (MT 8290) येथून भारतीय हद्दीतील बडगाम (MT 6303) येथे घुसखोरी केल्याचे त्या डायरीतील नोंदींचे विश्लेषण केल्यानंतर उघड झाले. एफआयआर क्रमांक 243/20 अनुसार या तीन अतिरेक्यांकडील दोन एके-47 रायफल्स, एक एके-56 रायफल, सहा एके-47 मॅगझिन्स, तीन एके-56 मॅगझिन्स आणि 159 एके राऊंड्स जप्त करण्यात आले.
सुरक्षा दलांनी 2021मध्ये केलेल्या दहशतवादविरोधी 100 मोहिमांमध्ये एकूण 182 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात 44 टॉप कमांडर आणि 24 विदेशी अतिरेकी होते, अशी अधिकृत नोंद आहे. या 44 टॉप कमांडरमध्ये 26 लष्कर ए तैयबाचे (LeT) आणि 10 जैश ए मोहम्मदचे (JeM) आणि सात हिज्बुल मुजाहिद्दीनचे (HM) आणि एक अल-बद्रचा होता.
यावर्षी सुरक्षा दलांनी आतापर्यंत 39 अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. त्यात 10 पाकिस्तानी होते. गेल्या दोन महिन्यांत पूंछ, उरी, नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये एकूण 15 पाकिस्तानी घुसखोर ठार झाले. तर मार्च महिन्यात जैश ए मोहम्मदच्या एका पाकिस्तानी कमांडरसह चार अतिरेकी ठार झाले. 12 मार्च रोजी काश्मीर खोऱ्यातील पुलवामा, गंदेरबल आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये चकमकी झाल्या. श्रीनगर जिल्ह्यातील नौगाम परिसरात 16 मार्च रोजी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. श्रीनगरच्या खानमोह परिसरातील सरपंचाच्या हत्येत या तिघांचा सहभाग होता. ते पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दी रेझिस्टन्स फ्रंटशी (TRF) संबंधित होते.
सीमेपलिकडील दहशतवादाचा मुद्दा भारत वारंवार आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उपस्थित करत आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीत पाकिस्तान असून काळ्या यादीत गेल्यास त्यांना आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल. पाकिस्तानी धोरणकर्त्यांवर नियंत्रण असलेल्यांकडून जम्मू आणि काश्मीरला लक्ष्य केले जात आहे. त्यासाठी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या माध्यमातून सीमेपलिकडून आत्मघाती अतिरेक्यांना पाठवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून ते अयशस्वी ठरत आहेत.
(अनुवाद – मनोज जोशी)