भारत आणि संयुक्त अरब अमिराती संयुक्त संरक्षण प्रकल्प सुरू करणार

0
भारत

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 8 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याबरोबर बैठक घेतली. या चर्चेमध्ये द्विपक्षीय लष्करी सहकार्य बळकट करणे आणि प्रमुख संरक्षण क्षेत्रांमध्ये सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला.

दोन्ही नेत्यांनी संस्थात्मक यंत्रणा, लष्करी सराव, प्रशिक्षण कार्यक्रमांची देवाणघेवाण इत्यादींद्वारे दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याबद्दल आनंद‌ व्यक्त केला. त्यांनी संरक्षण औद्योगिक भागीदारी, कौशल्य विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यासह सहकार्यासाठी अनेक नवीन क्षेत्रांमध्येही सहकार्य व्हायला हवे अशी भावना व्यक्त केली.

दुबई सरकारच्या माध्यम कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “दोन्ही बाजूंनी त्यांच्या सामायिक धोरणात्मक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने संयुक्त संरक्षण प्रकल्प सुरू करण्यावरही चर्चा केली.”

भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक सुरक्षेची आव्हाने हे मुद्दे या चर्चेत ठळकपणे दिसून आले. दोन्ही मंत्र्यांनी संघर्ष सोडवण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या महत्त्वावर भर दिला. याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची भूमिका अधोरेखित केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान या नेत्यांच्या दृष्टिकोन आणि दृढनिश्चयानुसार व्यापार आणि व्यवसाय यासारख्या इतर क्षेत्रात झालेल्या प्रगतीची बरोबरी साधण्यासाठी संरक्षण सहकार्य वाढवणे आवश्यक आहे, हे या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.

प्रशिक्षण देवाणघेवाण हे संरक्षण सहकार्याचे एक प्रमुख क्षेत्र असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगीतले. या देवाणघेवाणीमुळे एकमेकांच्या संरक्षण परिसंस्थांची समज वाढेल आणि द्विपक्षीय संरक्षण संबंधांना बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही नेत्यांनी तटरक्षक दलांमधल्या सक्रिय सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सामंजस्य कराराद्वारे या सहकार्याला औपचारिक रुप देत ते आणखी दृढ करण्याचे वचन दिले. एकमेकांनी आयोजित केलेल्या इतर प्रदर्शनांमध्ये आणि सोबतच संरक्षण प्रदर्शनांमध्ये दोन्ही बाजूंच्या सक्रिय सहभागाचे मंत्र्यांनी आश्वासन दिले आणि भारत- संयुक्त अरब अमिरात संरक्षण भागीदारी मंचाचे स्वागत केले.

दोन्ही देशांचा फायदा होईल अशा धोरणात्मक संयुक्त उपक्रमांना आणि सह-उत्पादन प्रकल्पांना चालना देण्याची क्षमता या मंचात आहे. मेक-इन-इंडिया आणि मेक-इन-एमिरेट्स उपक्रमांमध्ये दोन्ही देशांच्या पूरकतेवर लक्ष केंद्रित करण्यासही त्यांनी सहमती दर्शविली.

या बैठकीनंतर एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात संरक्षण मंत्री म्हणाले की, संयुक्त अरब अमिराती सोबतच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीला भारताने नेहमीच प्राधान्य दिले आहे. “येत्या काही वर्षांत, आम्ही संरक्षण सहकार्य, सह-उत्पादन आणि सह-विकास प्रकल्प, तसेच नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्रित  काम करण्यास उत्सुक आहोत. भारत आणि संयुक्त अरब अमिरात हे दोन्ही देश या क्षेत्रात शांतता आणि समृद्धीसाठी काम करण्यास वचनबद्ध आहेत,” असेही ते म्हणाले.


भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने 2003 मध्ये संरक्षण सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या, त्यानंतर 2017 मध्ये संरक्षण उद्योग सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक जवळीक आणि मजबूत आर्थिक संबंधांमध्ये खोलवर रुजलेले ऐतिहासिक संबंध आहेत.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleबदलत्या भूराजकीय परिस्थितीत भारत-सौदी अरेबिया संरक्षण सहकार्याची नांदी
Next articleनियंत्रण रेषेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख श्रीनगरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here