हिजबुल्लाने निःशस्त्रीकरण करावे यासाठी सुरू असणाऱ्या वाढत्या आवाहनादरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतली आणि आपले हल्ले थांबवले तर हा गट लेबनॉनच्या अध्यक्षांशी त्याच्या शस्त्रसंधीवर चर्चा करण्यास तयार आहे.
अमेरिकेचा पाठिंबा असलेले राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन – ज्यांनी जानेवारीत पदभार स्वीकारताना शस्त्रास्त्रांच्या नियंत्रणावर राज्याची मक्तेदारी प्रस्थापित करण्याचे वचन दिले होते – लवकरच हिजबुल्लाहशी त्याच्या शस्त्रांवर चर्चा सुरू करण्याचा विचार करत आहेत, असे तीन लेबनॉनच्या राजकीय सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षी इस्रायलशी झालेल्या युद्धामुळे आणि हिजबुल्लाचे सीरियन सहकारी, माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची हकालपट्टी झाल्यापासून सत्तेचा समतोल बिघडल्यामुळे शस्त्रसंधीच्या वाटाघाटी तीव्र झाल्या आहेत.
कमकुवत हिजबुल्ला
इस्रायलबरोबरच्या 2024 च्या संघर्षामुळे हिजबुल्लाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे अनेक प्रमुख नेते आणि हजारो अतिरेकी मारले गेले असून बरीचशी रॉकेट्स आणि इतर शस्त्रास्त्रे नष्ट झाली आहेत.
हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की हा गट राष्ट्रीय संरक्षण धोरणाच्या संदर्भात आपल्या शस्त्रांबाबत चर्चा करण्यास तयार आहे, परंतु हे इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील पाच टेकड्यांवरून आपले सैन्य मागे घेण्यावर अवलंबून असेल.
“इस्रायलने पाच जागांवरून माघार घेतली आणि लेबनॉनवरील आक्रमण थांबवले तर हिजबुल्ला आपल्या शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे,” असे वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.
आपल्या शस्त्रांविषयीच्या संभाव्य चर्चेबाबत हिजबुल्लाच्या भूमिकेबद्दल यापूर्वी कुठेही चर्चा झालेली नाही. राजकीय संवेदनशीलतेमुळे नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी ही माहिती दिली.
हिजबुल्लाच्या माध्यम कार्यालयाने प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही. अध्यक्षांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
युद्धादरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये पायदळ पाठवणाऱ्या इस्रायलने मोठ्या प्रमाणात माघार घेतली आहे, परंतु फेब्रुवारीमध्ये पाच डोंगराळ ठिकाणे न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा परिस्थिती नियंत्रणात आहे याची खात्री झाल्यानंतर ती ठिकाणे लेबनॉनच्या सैन्याच्या ताब्यात देण्याचा त्यांचा हेतू असल्याचे म्हटले जाते.
हिजबुल्लाच्या शस्त्रांवर नव्याने लक्ष केंद्रित
नोव्हेंबरपासून युद्धविराम होऊनही इस्रायली हवाई हल्ल्यांनी या गटावर दबाव कायम ठेवला आहे, तर वॉशिंग्टनने हिजबुल्लाहला निःशस्त्र होण्याची मागणी केली आहे आणि हिजबुल्लाच्या इराणी समर्थकांशी आण्विक चर्चेची तयारी करत आहे.
इराणने संपूर्ण प्रदेशात पाठिंबा दिलेल्या निमलष्करी गटांपैकी हिजबुल्ला हा सर्वात शक्तिशाली गट आहे, मात्र असाद यांच्या हकालपट्टीमुळे सीरियामार्गे इराणला होणारा त्याचा पुरवठा खंडित झाला आहे.
रॉयटर्सने सोमवारी वृत्त दिले की इराकमधील अनेक इराणी समर्थित मिलिशिया गट ट्रम्प प्रशासनाशी वाढणाऱ्या संघर्षाचा धोका टाळण्यासाठी प्रथमच निःशस्त्र होण्यास तयार आहेत.
निःशस्त्रीकरणाचे आवाहन
इस्रायलपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी आपली शस्त्रे महत्त्वाची असल्याचे सांगून, लेबनॉनमधील आपल्या टीकाकारांचे निःशस्त्र होण्याचे आवाहन हिजबुल्लाने बऱ्याच काळापासून नाकारले आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या शस्त्रसाठ्यावरून निर्माण झालेले मतभेद 2008 मध्ये एका छोट्या गृहयुद्धात बदलले.
टीकाकारांच्या मते या गटाने एकतर्फी लेबनॉनला संघर्षात ओढले आहे आणि सरकारी नियंत्रणाबाहेर त्याच्या मोठ्या शस्त्रागारामुळे राज्य कमकुवत झाले आहे.
निःशस्त्रीकरणाचे वेळापत्रक
औन यांच्या मते हिजबुल्लाची शस्त्रे संवादाद्वारे हाताळली गेली पाहिजेत कारण बळजबरीने गटाला निःशस्त्र करण्याचा कोणताही प्रयत्न संघर्षास कारणीभूत ठरेल.
लेबनॉनच्या मॅरोनाइट चर्चचे प्रमुख पेट्रियाक बेचारा बुट्रोस अल-राय यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की सर्व शस्त्रे राज्याच्या हातात असण्याची वेळ आली आहे परंतु यासाठी वेळ आणि मुत्सद्देगिरीची आवश्यकता असेल कारण “लेबनॉन नवीन युद्ध सहन करू शकत नाही.”
सैन्य आणि सुरक्षा सेवांनी संपूर्ण लेबनॉनमध्ये आपले अधिकार वाढवल्यानंतर, राज्य नियंत्रणासाठी “शस्त्रांच्या हस्तांतरणाचा अभ्यास सुरू करण्यासाठी” संबंधित भागधारकांसह संवाद वाहिन्या उघडल्या जात आहेत, असे लेबनॉनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
या मुद्द्यावर संसदेचे अध्यक्ष नबीह बेरी यांच्याशीही चर्चा केली जात आहे, जे हिजबुल्लाचे एक महत्त्वाचे सहकारी आहेत आणि मतभेद कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आठवड्याच्या शेवटी बैरूतला भेट देणारे अमेरिकेचे राजदूत मॉर्गन ऑर्टागस यांनी वॉशिंग्टनच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली की हिजबुल्ला आणि इतर सशस्त्र गटांना शक्य तितक्या लवकर निःशस्त्र केले पाहिजे आणि लेबनॉनच्या सैन्याने हे काम करणे अपेक्षित होते.
6 एप्रिल रोजी लेबनॉनच्या एलबीसीआय टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत ऑर्टागस म्हणाले, “हे स्पष्ट आहे की हिजबुल्लाहला निःशस्त्र करावे लागेल आणि इस्रायल या दहशतवाद्यांना त्यांच्या देशात, त्यांच्यावर गोळीबार करण्यासाठी स्वीकारणार नाही आणि ही स्थिती आम्हाला समजते.”
लेबनॉनच्या अनेक सरकारी मंत्र्यांना निःशस्त्रीकरणाचे वेळापत्रक हवे आहे, असे हिझबुल्लाह विरोधी लेबनॉन फोर्सेस पार्टीशी संबंधित मंत्री कमाल शहादी यांनी सांगितले. शहादी यांनी रॉयटर्सला सांगितले की निशःस्त्रीकरणास सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागू नये.
एक वेळापत्रक-जे कदाचित प्रक्रियेवर कालमर्यादा लादेल-ते म्हणाले, “आपल्या नागरिकांना वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. या हल्ल्यांमुळे जीव गमवावे लागत आहेत, अर्थव्यवस्थेला किंमत मोजावी लागत आहे आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.”
अलीकडील संघर्ष
ऑक्टोबर 2023 मध्ये गाझा युद्धाच्या सुरुवातीला हिजबुल्लाने हमासच्या समर्थनार्थ गोळीबार केला तेव्हा संघर्ष सुरू झाला.
हिजबुल्लाचा नेता नईम कासिमने 29 मार्च रोजी केलेल्या भाषणात सांगितले की त्याच्या गटाची आता लिटानीच्या दक्षिणेस कोणतीही सशस्त्र उपस्थिती नाही आणि इस्रायल “दररोज” त्याचे उल्लंघन करत असताना तो युद्धबंदी करारावर ठाम राहिला आहे. इस्रायलने हिजबुल्लाहवर दक्षिणेत लष्करी पायाभूत सुविधा राखल्याचा आरोप केला आहे.
इस्रायलने माघार घ्यावी आणि आपले हल्ले थांबवावेत यासाठी हिजबुल्लाने लेबनॉन राज्यावर जबाबदारी टाकली आहे. राजनैतिक तोडगा काढण्यासाठी अजूनही वेळ आहे, असे कासिम म्हणाले. परंतु त्यांनी इशारा दिला की “प्रतिकार करण्यास उपस्थित आणि तयार आहे” तसेच इस्रायलने कराराचे पालन न केल्यास ते “इतर पर्यायांचा” अवलंब करू शकतात असे संकेत दिले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)