रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयए नोवोस्तीने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार, हमासचा पॉलिटब्युरो सदस्य मौसा अबू मारझोक नियोजित भेटीसाठी मॉस्को येथे पोहोचला आहे. राजनैतिक स्रोतांचा हवाल देत वृत्तात असे सूचित करण्यात आले आहे की अबू मारझोकच्या रशियन अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका होणार आहेत, मात्र या बैठकांमध्ये होणाऱ्या चर्चेबद्दल कोणताही जास्तीचा तपशील देण्यात आलेला नाही. 2021नंतर पहिल्यांदाच या बैठकीच्या निमित्ताने ते एकमेकांसमोर येणार आहेत.
रशियाचे मध्यपूर्वेतील राजनैतिक संबंध
रशियाचे इस्रायल, इराण, लेबनॉन, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि हमाससह मध्यपूर्वेतील इतर अनेक प्रमुख देशांशी राजनैतिक संबंध आहेत. रशियाने स्वतःला या प्रदेशात मध्यस्थ म्हणून उभे केले आहे आणि मध्यपूर्वेतील मुत्सद्देगिरीबाबत अमेरिकेच्या हाताळणीवर अनेकदा टीका केली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संकटादरम्यान, रशियाने युद्धबंदी आणि शांततामय मार्गाने तोडगा काढण्याच्या उद्देशाने चर्चा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने 2007 पासून गाझावर राज्य करायला सुरुवात केली आहे. अमेरिका, इस्रायल आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांकडून ही दहशतवादी संघटना मानली जाते. रशियासह काही देश मात्र त्याला तसे मानत नाहीत. रशियाने हमासला दहशतवादी संघटना म्हणून काळ्या यादीत टाकलेले नाही, उलट 2006च्या पॅलेस्टिनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या गटाच्या प्रतिनिधींचे मॉस्कोमध्ये स्वागत करण्यात आले आणि त्यांना एक वैध राजकीय शक्ती म्हणून वागणूक दिली.
गाझा-इस्रायल सीमेवर रॉकेट हल्ले आणि चकमकी यांमुळे इस्रायलविरुद्ध नियमितपणे लष्करी संघर्षात गुंतलेला हमास सशस्त्र प्रतिकारासाठी ओळखला जातो. ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने त्याला लष्करी प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली ज्यामुळे गाझामधील संकटात वाढ झाली. या संघर्षामुळे गाझामध्ये लक्षणीय जीवितहानी आणि मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले आहे. यासाठी युद्धबंदी आणि शांतता चर्चेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून आवाहनाला सुरूवात झाली आहे. इस्रायलने गाझाची नाकाबंदी केली, जी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यामुळे या प्रदेशातील समस्या वाढतच चालल्या आहेत आणि दीर्घकालीन तोडगा काढण्याचे प्रयत्न आणखी गुंतागुंतीचे होत आहेत.
रेशम
(रॉयटर्स)