पाच हजार किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंगतीत स्थान मिळवताना भारताने सोमवारी ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची बहुलक्ष्यभेदी प्रक्षेपकाच्या (एमआयआरव्ही) साह्याने ‘मिशन दिव्यास्त्र’ नावाने यशस्वी चाचणी घेतली. या मोहिमेचे नेतृत्व केले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) आर. शीना राणी या महिलेने.
मिसाईल राणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या शीना यांनी यापूर्वी इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये आठ वर्षे काम केले आहे. १९९८ मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर लगेचच त्या १९९९ मध्ये DRDO मध्ये रुजू झाल्या. तेव्हापासून सातत्याने त्या अग्नी क्षेपणास्त्र प्रकल्पावर काम करत आहे. क्षेपणास्त्र कार्यक्रमांतर्गत अग्नीचे अनेक प्रकार त्यांच्या नेतृत्वाअंतर्गत विकसित करण्यात आले आहेत. तसेच हे क्षेपणास्त्र सैन्यात समाविष्ट देखील करण्यात आले आहेत.
शीना त्यांच्या टीममध्ये अनेक महिला शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. अग्नीच्या यशस्वी चाचणीनंतर माध्यमांशी बोलताना शीना म्हणाल्या, “अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा आपण एक भाग असल्याचा मला खरोखर अभिमान आहे. कारण ही क्षेपणास्त्रे देशाच्या सीमांचे सक्षमपणे रक्षण करत आहेत.”
थिरुवनंतपूरममध्ये जन्म झालेल्या शीना यांचे संगोपन त्यांच्या आईने केले आहे. दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. ‘माझी आई माझ्या आणि माझ्या बहिणीच्या आयुष्यातील आधारस्तंभ आहे,’ असे त्या सांगतात. शीना यांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग त्रिवेंद्रम (सीईटी) येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. अग्नी क्षेपणास्त्राशी संबंधित डीआडीओच्या विविध विभागांत त्यांनी काम केले आहे. मात्र त्यांचे प्रमुख काम आहे ते, क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याआधी त्याची व्यवस्थित तपासणी करून ते प्रक्षेपणास योग्य आहे की नाही ते ठरवणे.
“अग्नी क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची तयारी करताना माझ्या पोटात गोळा आला होता. मात्र मला ती भीती सर्वांसमोर व्यक्त करायची नव्हती,’ असे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
शीना यांचे पती पीएस आर एस शास्त्री हे देखील डीआरडीओमध्ये क्षेपणास्त्राचे काम बघतात. डीआरडीओमध्ये कार्यरत असताना शीना अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. २०१६मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून गौरवण्यात आले आहे.