भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी तिच्यासोबत बुच विल्मोर असणार आहे. नासाचे हे दोन अनुभवी अंतराळवीर बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानातून अंतराळात झेपावणार आहेत. 7 मे रोजी हे पहिले मानवयुक्त अंतराळ उड्डाण होणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हे अंतराळयान 7 मे रोजी सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाईल.
या उड्डाणाबद्दल पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली की मी थोडी नर्व्हस आहे. पण नवीन अंतराळयानातून उड्डाण करण्याबद्दल मला कोणतीही अस्वस्थता नाही. “जेव्हा मी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल, तेव्हा मी घरी परत जाण्यासारखे असेल,” अशी भावना सुनीताने प्रक्षेपण केंद्रावर व्यक्त केली.
डॉ. दीपक पांड्या आणि बोनी पांड्या यांच्या पोटी जन्मलेल्या सुनीता विल्यम्सने 2006 आणि 2012 मध्ये दोनदा अंतराळात प्रवास केला आहे. सुनीताने या दोन मोहिमांमध्ये एकूण 322 दिवस अंतराळात घालवले आहेत. हा एक विक्रम मानला जातो. तीच सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. मानवाचा समावेश असलेल्या अंतराळयानाच्या पहिल्या मोहिमेसाठी उड्डाण करणारी ती पहिली महिला ठरणार आहे.
कोणत्याही महिला अंतराळवीराने सर्वाधिक स्पेसवॉक करण्याचा पहिला विक्रम तिच्या नावावर आहे. तिने सात स्पेसवॉकमध्ये एकूण 50 तास आणि 40 मिनिटे घालवली होती. त्यानंतर 14 जुलै 2012 रोजी तिने दुसरे अंतराळ उड्डाण केले. त्यावेळी ती चार महिने अंतराळात होती. तेव्हा सुनीताने एकूण सातवेळा स्पेसवॉक करून नवा विक्रम केला. अर्थात नंतर पेगी व्हिटसनने 10 स्पेसवॉकसह तिचा विक्रम मोडला.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्सने अंतराळ प्रवासात गणेशाची मूर्ती, उपनिषद तसेच समोसे नेले होते. तिची दुसरी मोहीम 18 नोव्हेंबर 2012 रोजी संपली.
सुनीता विल्यम्सचे वडील पेशाने न्यूरोॲनाटॉमिस्ट होते. त्यांचा जन्म गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन येथे झाला. पण नंतर ते अमेरिकेत गेले आणि बोनी पांड्याशी विवाह केला. त्यांची मुलगी असणारी सुनीता सध्या बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानावर क्रू फ्लाइट टेस्ट मिशन चालवण्याची तयारी करत आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये तिची जून 1998 मध्ये निवड झाली. 9 डिसेंबर 2006 रोजी ती पहिल्यांदा अंतराळात गेली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलेल्या डिस्कव्हरी या 14 व्या शटलबरोबर सुनीताचा पहिला अंतराळ प्रवास पार पडला. त्यानंतर 2012 मध्ये ती दुसऱ्यांदा अंतराळात गेली. त्यावेळी तिने कझाकस्तानच्या बैकोनूर येथून रशियन रॉकेट सोयुझ टी. एम. ए.-05. एम.मधून उड्डाण केले.
आता तिसऱ्यांदा उड्डाण करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सुनीताने सांगितले की ती गणेशाची मूर्ती घेऊन जाणार आहे. तिच्या मते, गणेश तिच्यासाठी भाग्यवान आहे. यापूर्वी सुनीता आपल्याबरोबर भगवद्गीता अंतराळात घेऊन गेली होती. समोसे आपल्याला खूप आवडतात असेही तिने सांगितले.
याशिवाय ती एक उत्तम धावपटू देखील आहे. आयएसएसमध्ये असताना ती मॅरेथॉनमध्ये धावली आहे.
सुनीता विल्यम्सचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी युक्लिड, ओहायो येथे झाला. 1987 मध्ये तिने अमेरिकन नेव्हल अकॅडमीमधून भौतिकशास्त्र विषयातील पदवी मिळवली. त्यानंतर अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. नासामध्ये सामील होण्यापूर्वी ती अमेरिकन नौदलात काम करत होती. त्यावेळी 30हून अधिक वेगवेगळ्या विमानांमधून 3हजारहून अधिक उड्डाण तासांची तिच्या नावाने नोंद झाली होती. सुनीता विल्यम्स सध्या तिच्या तिसऱ्या अंतराळ मोहिमेची तयारी करत आहे.
भारतीय वंशाच्या सुनीताला अनेक देशांच्या सरकारने सन्मानित केले आहे. भारत सरकारने 2008 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. रशियन सरकारकडून स्पेस एक्सप्लोरेशनमधील मेडल ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी, स्लोव्हेनिया सरकारने तिला गोल्डन ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केला. नासाकडून ‘नासा स्पेसफ्लाइट मेडल’ प्रदान केले गेले. अंतराळ मोहिमेतील महत्त्वपूर्ण कामगिरी किंवा सेवेसाठी हे मेडल दिले जाते.
नासाने नवीन अंतराळ यान तयार करण्यासाठी स्पेसएक्स आणि बोईंग या कंपन्यांची निवड केली. हे यान अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि तेथून अंतराळात घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स 2020 पासून ने आण करत आहे. बोईंगच्या स्टारलाइनरला बऱ्याच कारणांनी विलंब झाला आहे. मात्र मंगळवारी सकाळी पहिल्या क्रूला घेऊन उड्डाण करण्यासाठी ते सज्ज आहे. एकीकडे हा उशीर तर दुसरीकडे बोईंगला त्यांच्या विमानांमध्ये उद्भवलेल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपनी वादात सापडली आहे.
आराधना जोशी