गुजरातमधील गांधीनगर येथे येत्या 18 ते 22 ऑक्टोबर 2022 दरम्यान 12व्या संरक्षण सामग्री प्रदर्शनाचे (DefExpo) आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच एकाच वेळी चार ठिकाणी हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त होण्याच्या दृष्टीने ते नागरिकांना एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देईल, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी 10 ते 14 मार्च 2022 या कालावधीत डेफएक्स्पोचे (DefExpo 2022) आयोजन करण्यात येणार होते. पण त्यावेळी सहभागी झालेल्यांना भेडसावणाऱ्या लॉजिस्टिक आव्हानांमुळे ते पुढे ढकलण्यात आले. 8 ऑगस्ट 2022 रोजी एक्स्पोची नवीन तारीख (18 ते 22 ऑक्टोबर 2022) जाहीर करण्यात आली. हे प्रदर्शन प्रथमच केवळ भारतीय कंपन्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. डेफएक्स्पो-2022साठी भारतीय कंपन्या, मूळ उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या भारतीय उपकंपन्या (OEM), भारतात नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांचे विभाग, भारतीय कंपन्यांसह ज्यांचे संयुक्त प्रकल्प आहेत, असे सर्व यात सहभागी होणार आहेत.
डेफएक्स्पो 2022ची संकल्पना ‘पाथ टू प्राइड’ (Path to Pride – एक अभिमानास्पद वाटचाल) आहे. भारतीय तसेच विदेशी ग्राहकांबरोबर एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये भागीदारी करून, प्रदर्शन तसेच पाठबळ देऊन भारताला एक सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाशी ही संकल्पना सुसंगत आहे. स्वदेशी संरक्षण उद्योगाचे सामर्थ्य दाखविणे, हा यामागचा उद्देश असून तो आता केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला पुष्टी देत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अनुसरून, डेफएक्स्पो 2022 हे मागील प्रदर्शनापेक्षा अधिक सरस करण्याचा मानस आहे. म्हणूनच 1 लाखांहून अधिक चौरस मीटर (मागील वेळी 76,000 चौ.मी.) इतक्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भूखंडांवर आयोजित करण्यात आले आहे. महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अॅण्ड एक्झिबिशन सेंटर (MMCEC) येथे याचे उद्घाटन आणि परिसंवाद होणार असून, प्रदर्शन हेलिपॅड एक्झिबिशन सेंटर येथे, तर साबरमतीच्या किनारपट्टीवर (SRF) पाचही दिवस थेट प्रात्यक्षिके तसेच पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाकडून जनतेसाठी जहाजावरील भेटी आयोजित केल्या जातील. आयआयटी, दिल्ली येथील स्वदेशी स्टार्ट-अप, मेसर्स बोटलॅब्ज (M/s Botlabs – एक iDEX विजेता) यांच्याद्वारे सर्वात मोठा ड्रोन शो देखील होणार असून तो या भव्य प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रदर्शनासाठी 15 ऑगस्ट 2022पासून स्टॉल्सच्या नोंदणीला सुरूवात झाली होती आणि आतापर्यंत त्यासाठी एक हजाराहून अधिक नोंदणी झाली आहे आणि डेफएक्पोच्या मागील प्रदर्शनाच्या तुलनेत ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंदवलेली संख्या असेल, असा अंदाज आहे.
या कार्यक्रमात, स्वदेशी संरक्षण उत्पादनांना पाठबळ देण्यासाठी विविध राज्यांना पॅव्हेलियन उभारण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. अनेक राज्यांनी आपल्या राज्याचा पॅव्हेलियन उभारण्यासाठी सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. आपापल्या राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यास निमंत्रित करण्याची तसेच आपापल्या राज्यांना प्रमोट करण्याची संधी संबंधित मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, मुख्य सचिव इत्यादींना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. अशा प्रकारे देशांतर्गत स्वदेशी एरोस्पेस आणि संरक्षण सामग्री उत्पादनासाठी अधिक केंद्रे देशभरात विकसित होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सचा यातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने जागेच्या शुल्कावर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाचे (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड), 100 टक्के सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. या कंपन्या यावेळी आपली वर्षपूर्ती साजरी करीत असताना पहिल्यांदाच डेफएक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत.
(संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर आधारित हा लेख आहे)