डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार चर्चेचे स्पष्ट संकेत दिले

0
डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, 13 फेब्रुवारी 2025 रोजी व्हाईट हाऊसमधील, संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होत असताना हस्तांदोलन केले. सौजन्य: रॉयटर्स/केविन लामार्क (फाइल फोटो)

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमधील तणाव ओसरत असल्याचे संकेत देत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “दोन्ही देश सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेत, यशस्वी निष्कर्षापर्यंत सहज पोहोचतील याची त्यांना पूर्ण खात्री आहे.” त्यांनी हेही सांगितले की, “त्यांचे प्रिय मित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच त्यांचा संवाद होणार आहे, ज्याची ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.”

पंतप्रधान मोदींनी, ट्रम्प यांच्या या सकारात्मक वक्तव्याचे स्वागत केले आणि विश्वास व्यक्त केला की, “सध्याच्या व्यापार चर्चा, दोन्ही देशांतील सहकार्याच्या अवाढव्य आणि अद्याप न उलगडलेल्या संधींचे दरवाजे उघडतील.”

‘खूप चांगला मित्र’

9 सप्टेंबर रोजी, ट्रम्प यांनी Truth Social प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “माझे खूप चांगले मित्र-पंतप्रधान मोदी यांच्याशी मी पुढील काही आठवड्यांत बोलणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरूच आहे आणि मला खात्री आहे की, चर्चेअंती यशस्वी निष्कर्ष मिळेल.”

मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर, ट्रम्प यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे समर्थन करत, भारत आणि अमेरिका यांना “नैसर्गिक सहयोगी आणि घनिष्ठ मित्र” म्हटले. त्यांनी असेही नमूद केले की, “या व्यापार चर्चेला लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत.”

मोदी म्हणाले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या संवादाची मला देखील उत्सुकता आहे. आम्ही दोघे मिळून दोन्ही देशांच्या लोकांसाठी एक उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.”

ही दुसरी वेळ आहे, जिथे ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांची आणि मोदींच्या व्यक्तिगत नेतृत्वाची प्रशंसा केली आणि मोदींनीही त्या कौतुकाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

तणावातील शिथिलता

ट्रम्प यांचे हे नवे विधान अशा काळात समोर आहे, जेव्हा भारत-अमेरिका संबंध मागील दोन दशकांतील सर्वात तणावपूर्ण अवस्थेत पोहोचले होते – यामागे मुख्यतः व्यापार शुल्कावरील वाद आणि भारताचे रशियाकडून होणारे तेल आयात कारणीभूत होते.

ट्रम्प प्रशासनाने भारताच्या अनेक उत्पादनांवर दुप्पट आयात शुल्क (50%) लावले होते, ज्यामध्ये 25% अतिरिक्त शुल्क हे थेट रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीशी संबंधित होते.

भारताने वॉशिंग्टनच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता आणि हे निर्णय “अन्यायकारक, अवास्तव आणि अयोग्य” असल्याचे म्हटले होते.

मात्र मागील आठवड्यात, ट्रम्प यांनी आपली भूमिका सौम्य करत म्हटले की, “भारत आणि अमेरिका यांचे नाते विशेष आहे, अशा क्षणिक तणावांना फारसे महत्त्व देऊ नये.”

“माझी मोदींसोबतची मैत्री कायम राहील. ते एक उत्कृष्ट पंतप्रधान आहेत. मला सध्याचे त्यांचे काही निर्णय पटत नाहीयेत, पण आमचे नाते कायम आहे,” असे त्यांनी ओव्हल ऑफिसमधून शुक्रवारी सांगितले.

‘मूल्यवान प्रशंसा’

मोदींनी, ट्रम्प यांच्या सकारात्मक पुनर्मूल्यांकनाचे खूपच कौतुक केले आणि दोन्ही देशांमधील संबंध “सर्वांगीण आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी” असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबाबत त्यांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना प्रतिसाद देतो,” असे मोदी म्हणाले.

रशियन तेलावरून अजूनही मतभेद

तरीही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियन तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली.

“मला हे अजिबात आवडलेले नाही की, भारत अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. मी याविषयी स्पष्टपणे सांगितले असून, आम्ही भारतावर 50% शुल्क लावले आहे. मात्र, मी मोदींसोबतचे संबंध कायम चांगले ठेवू इच्छितो, ते महान राज्यकर्ते आहेत,” असे ट्रम्प म्हणाले.

भारताने मात्र आपल्या ऊर्जा धोरणाचे समर्थन करत, स्पष्टपणे सांगितले आहे की: “रशियन तेलाची खरेदी ही बाजारातील वास्तव आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे.”

फेब्रुवारी 2022 मध्ये, युक्रेनवर झालेल्या रशियाच्या आक्रमणानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर निर्बंध घातले, आणि त्या पार्श्वभूमीवर भारताने सवलतीच्या दरात रशियन कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत आणि युरोपियन युनियन(EU)ची, व्यापार कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
Next articleनेपाळच्या राजकारण्यांची विश्वासार्हता शून्य आहे; तज्ज्ञांचे विश्लेषण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here